Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

औरंगाबादप्रकरणी युतीत नरमाईचे धोरण
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 25, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - औरंगाबाद येथील शिवसेना-भाजपमधील वादाप्रकरणी युती ठेवायची की नाही, यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकारांना सांगितले. शिवसेनेने मारहाणीबद्दल माफी मागितली किंवा नगरसेवकांवर कारवाई केली, तर युतीबाबत तडजोड होऊ शकते, अशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. तसेच वरिष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेतल्याचे मानले जात असून शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होऊन युतीबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेना-भाजपमध्ये औरंगाबादला वाद पेटला आहे. युती ठेवायची की नाही, यावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदींची बैठक खडसे यांच्या निवासस्थानी आज झाली. खडसे आणि राजेंद्र फडके यांनी औरंगाबादचा दौरा केल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व भूमिका सांगितली. राजू शिंदे यांना पक्षाने राजीनामा देण्याचा आदेश दिला असताना त्यांनी तो मानला नाही. तरी, शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली. त्यामुळे हे खपवून घ्यायचे नाही. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय किंवा त्यांनी माफी मागितल्याशिवाय युती सुरू ठेवायची नाही, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.
पण पक्षनेतृत्व सध्या तरी औरंगाबादमधील युती तोडण्याच्या मनस्थितीत नाही. काही राज्यात अन्य पक्षांबरोबरची युती तुटली, तर बिहारमध्ये तुटण्याच्या मार्गावर असताना महाराष्ट्रात युतीला धक्का पोचेल, असे काहीही करू नये. स्थानिक पातळीवर युती तोडली, तरी त्याचे पडसाद प्रदेश पातळीवर उमटतील, असा वरिष्ठ नेत्यांचा मतप्रवाह आहे. त्यामुळे भाजपने कितीही आक्रमक प्रतिक्रिया व भूमिका घेतली, तरी युती तोडण्याचा निर्णय आज होऊ शकला नाही. मुंडेंसारखे ज्येष्ठ नेते आजच्या बैठकीला हजर असताना वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावयाची आहे, असे निर्णय न घेण्यामागचे कारण प्रदेशाध्यक्षांनी सांगितले; पण पक्षाध्यक्ष नितीन गडकरी व शिवसेनेच्या नेत्यांशीही चर्चा करून तोडगा काढण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने युतीबाबतचा निर्णय दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांना आजच्या बैठकीत देण्यात आले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: