Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भाजप, शिवसेनेचे स्वतंत्र आंदोलन
-
Sunday, June 27, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: pune,   pimpri,   bjp,   shivsena,   petrol,   diesel,   rally

पिंपरी - केंद्रातील आघाडी सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 26) पुणे-मुंबई महामार्गावर वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले, तर शिवसेनेने आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा सोडून दिले.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात शुक्रवारी वाढ केली आहे. या निर्णयाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने सायंकाळी पाच वाजता रस्त्यावर उतरून इंधन दरवाढीचा निषेध केला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुणे-मुंबई महामार्गावर ठिय्या मांडून "रास्ता रोको' आंदोलन केले. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. या वेळी केंद्रातील आघाडी सरकार तसेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय पेट्रोलियममंत्री मुरली देवरा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

आंदोलकांनी मुंबईकडून पुण्याकडे जाणारा मार्ग रोखून धरल्याने मोरवाडी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनाची माहिती नसल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. सुमारे दहा मिनिटे "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पक्षाचे नगरसेवक एकनाथ पवार, भीमा बोबडे, उमा खापरे, कांता मोंढे, अपर्णा मणेरीकर, बाळासाहेब गव्हाणे, मधुकर बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेना कार्यकर्ते व पोलिसांत झटापट
शहर शिवसेनेने पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन चौकात आंदोलन केले. पक्षाचे खासदार गजानन बाबर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी आंदोलकांनी केंद्रातील आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांकडून पुतळा हिसकावून घेतला. त्यास आंदोलकांनी विरोध केल्याने त्यांची पोलिसांबरोबर जोरदार झटापट झाली. त्यामध्ये पुतळ्याचे दोन भाग झाले. अर्धा भाग पोलिसांनी नेला, तर उर्वरित भाग आंदोलकांनी जाळला.

पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता चव्हाण, नगरसेवक प्रकाश बाबर, भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर संघटक अजय पाताडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. या दोन वेगवेगळ्या आंदोलनातील आंदोलकांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा सोडून दिले.

खासदार बाबर म्हणाले, ""केंद्रातील आघाडी सरकारने चौथ्यांदा एकतर्फी इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्‍कील होणार आहे. आघाडी सरकारमधील अनेक सहकारी पक्ष या दरवाढीच्या विरोधात आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा सरकारने पुनर्विचार करावा.''

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले, ""सामान्य जनता अगोदरच महागाईने होरपळून निघत असताना केंद्रातील आघाडी सरकारने इंधनाच्या दरात आणखी वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीमुळे महागाईत भरमसाट वाढ होणार आहे.''
प्रतिक्रिया
On 7/25/2010 8:03 AM tirkus.baan said:
उपरोध हा कि दुसर्या दिवशी आम्ही हेलीकोप्तेर मधून वारीचे फोटो काढतो ! वाढदिवस साजरे करतो - जोरदार. परवा तर ice cream च्या दुकानावर पण ही गर्दी दिसली. तसेच पुलाखाली पिपे मध्ये राहणारे कुटुंब पण दिसले. थोडक्यात - प्रत्येक जन आपापल्या मार्गाने चालत आहे. कुणी दुसर्यासाठी काही करत नाहीये !


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: