आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...
मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सीच्या रोजच्या व्यापातून वेळ काढून संदीप कडवे दुबईहून थेट अमेरिका गाठतात आणि अल्बामामध्ये स्पेस अॅन्ड रॉकेट सेन्टरमध्ये असा आनंदही घेतात. जिद्द, चिकाटी, एकाग्रता आणि वेळेची किंमत. यशासाठी ही चार सूत्रे. मी काही 'सक्सेस फॉर्म्युला' थाटाच्या पुस्तकातील गुळगुळीत वाक्ये सांगत नाहीय. स्वतः अनुभवलेली, आचरणात आणलेली आणि अंगी मुरवलेली ही चार सूत्रे. ही चार सूत्रे आणि स्वयंप्रेरणा असेल, तर यशाला गवसणी घालता येते. झेपावता येते. अनोळखी प्रदेशात पाय घट्ट रोवता येतात. इतकेच नव्हे तर धडपडणाऱ्या साथीदारांना मदतीचा हातही देता येतो. शिक्षण घेताना आणि गेल्या दशकभरात दुबईत स्थिरावताना हे सूत्र मला गवसले.
मी काही ठरवून, प्लॅन करून दुबईत आलो नाही. चार-सहा महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी म्हणून या आखाती प्रदेशाकडे आलो. वाटले होते, प्रोजेक्ट संपला की बहुधा युरोपला जाऊ. पण, नियतिच्या मनात काही वेगळेच होते. आजपर्यंतच्या घटनांकडे पाहिले, तर जाणवते की खूपशा संधी अतिशय छोट्या स्वरुपात समोर आल्या. तरीही प्रयत्नांची कास सोडली नाही. मग, यशानेही हुलकावणी दिली नाही.
शाळेत आठवीला असताना टेक्निकल विषय घेतला, तेव्हाच मी इंजिनिअरिंगला जाणार हे निश्चित झाले. सुरुवातीला धुळे शहरात डिप्लोमा, मग पुण्यात मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. वयाच्या चौदाव्या वर्षापासून शिक्षणासाठी घर सोडले. घरून पैसे जरूर मिळत, पण मागच्या महिन्याचा सविस्तर हिशेब दिल्यावरच! कदाचित त्यामुळेच 'बार्गेनिंग' करून कमीत कमी खर्चात 'सर्व्हिस' मिळविण्याची सवय लागली !! हॉटेलवाल्याशी बोलणी करून पन्नास पैशाचा चहा ३५ पैशात मिळवणे असो किंवा मेसचे ३० कुपन्स ४० दिवस वापरणे असो, ही सवय अंगी भिनली. बचत होत नसेच, त्यामुळे मनी ऑर्डर उशीरा आली, तर पंचाईत व्हायची! पुण्यात बीई एमबीए करेपर्यंत रोजच्या हिशेबावर शिक्षण पूर्ण केले. तीन वर्षांच्या डिप्लोमाचा माझा खर्च होता साडे चार हजार रुपये. आता आकडे छोटे वाटतात, पण त्यावेळी त्याची किंमत मोठी होती. पैश्याची किंमत ठेवण्याची, हिशेब लिहिण्याची, काटकसर करण्याची, विविध स्वभावाच्या मित्रांशी जुळवून घेण्याची, मैत्री व व्यवहार यातील फरक कळण्याची सवय मात्र या शिक्षणाने नक्की दिली.
औरंगाबाद, अलिबाग, महाड, नाशिक, धुळे, पुणे, मुंबई, दुबई असा आतापर्यंतचा प्रवास. १९८७ मध्ये पुण्याला आलो, तेव्हा 'पुणेकर' मित्रांशी कसे निभावले जाईल, हा प्रश्न मनात होता. फक्त अभ्यास एके अभ्यास हा निर्णय घेतला. तो अंमलात आणला. फर्स्ट क्लास मिळाला. नोकरीत पैश्यापेक्षा अनुभव घेण्यास महत्व दिले. याच अनुभवाच्या जोरावर आता मोठ-मोठे प्रोजेक्टस् हाताळतो. जगभर हिंडतो. अनेक परदेशी सहकाऱ्यांबरोबरही काम करतो. शिक्षणाच्या व नोकरीच्या काळात चिकाटीचे, जिद्दीचे, एकाग्रतेचे महत्व लक्षात आले. वेळेची किंमत काम करताना समजत गेली. या गोष्टी मी कधीही विसरत नाही. स्वतःची ओळख निर्माण करण्यास याच गोष्टी महत्वाच्या ठरल्या.
संदीप कडवे आपल्या फॅमिलीसह. नोकरीच्या टप्प्यावर मिळालेला आणखी एक गुण म्हणजे स्वयंप्रेरणा. पुण्यात चांगला जॉब होता. पण अजून मोठ्या स्तरावर जाऊन काम करण्याची इच्छा होती. चांगला जॉब सोडला आणि आयडीबीआय जॉईन केले. त्यात धोका होता, पण तेच एक आव्हान होते. ते आव्हान पेलले. यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. कोणी सांगितले म्हणून काम करण्यापेक्षा जबाबदारी ओळखून स्वयंप्रेरणेने काम केले. अजून मोठ्या जबाबदारी व मोठ्या पगाराच्या अपेक्षेने आयडीबीआयची नोकरी सोडली. नंतर ज्या डॉट कॉम कंपनीमध्ये ई स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जॉईन झालो, ते ऑफीस अतिशय छोटे. पुन्हा तेच सूत्र वापरले. स्थिरावलो. अचानक दुबईची ऑफर आली व मुंबई सोडली.
परदेशात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव. विविध देशातल्या लोकांबरोबर काम केले, प्रोजेक्ट्स केले. अमेरिकेतील ९/११ नंतर कंपनीचे मोठे प्रोजेक्टस् गेले. कंपनी बंद करायचे ठरले. दरम्यान लग्न झाले होते. भारतात परत येण्यापेक्षा व इतर ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचे नक्की केले. मी सगळी पुंजी गोळा केली. कमीत कमी खर्चात दुबईत स्वतःची मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग कंपनी सुरू केली. अनोळखी देश, अनोळखी लोक. सुरुवातीला प्रोजेक्टस्च्या अपेक्षेने कंपन्यांना कन्सल्टिंग सपोर्ट फुकटात देऊ केला. पण, हळू हळू लक्षात आले, फसवला जातोय. तरीही काम करत राहिलो. १८ महिन्यांनी एका मित्राच्या मदतीने चांगला प्रोजेक्ट मिळाला. रेफरलने दुसरा. थोडेफार पैसे मिळाले. हुरूप वाढला. मार्केटमध्ये नाव झाले. थकलेली वीजेची बिले भरली. घरात थोडे फर्निचर आणले. दोन वर्षे खूप मेहनत घेतली. एक कंपनीचा आयपीओ प्लेस केला. कंपनी सुव्यवस्थित होऊ लागली. उद्योजकतेची सुरुवातीची ही परीक्षाच असते. ती पास झालो. माझ्या अनुभवाचा इतरांना पण उपयोग व्हावा म्हणून गेल्या चार वर्षांत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम (जीएमबीएफ) सारखे उपक्रम सुरू केले. अजून बरेच काही करायचे आहे. वाटचाल चालू आहे.
यशस्वी होण्याबरोबर एक गोष्ट येते, ती म्हणजे द्वेष. तुमच्या यशाने काहींना द्वेष वाटू लागतो. पाय ओढण्यासाठीही लोक सरसावतात. त्यात अनोळखी असतात, तसेच आप्त स्वकियही असतात. माझा एकच सल्ला. अशा लोकांकडे शक्यतो दुर्लक्ष करा. आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही यशस्वी झाला, की त्यांचे तोंड बंद होते. यशस्वी होण्यासाठी हे लोक एकप्रकारे हातभारच लावतात असे समजावे आणि आपले काम करत राहावे!
* संदीप कडवेंविषयी थोडक्यात:>> संदीप कडवे हे मिटकॉन इंटरनॅशनलचे संचालक आणि व्यवस्थापकीय सल्लागार आहेत.
>> व्यवस्थापन, इनव्हेस्टमेंट बॅंकिंग, कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान सल्ला आदी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
>> गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) आणि भारतातील तेल आणि वायू उद्योग, अवजड आणि लघू आभियांत्रिकी उद्योग, रासायनिक उद्योग, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, पर्यटन, कृषी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादी विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी त्यांनी तंत्रज्ञानविषयक सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
>> संदीप कडवे यांनी भारतात आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स, प्राज फायनान्स, किर्लोस्कर कन्सल्टंट आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक्समध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
>> गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) आणि भारतात २० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक गुंतवणूकीच्या प्रकल्पांसाठी सध्या ते सल्लागार म्हणून काम पाहात आहेत.
>> आभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेतलेल्या संदीप कडवे यांनी विपणन आणि वित्तपुरवठा या दोन्ही क्षेत्रांत एमबीए केले आहे. सध्या ते पीएच.डीही करीत आहेत.
>> एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कॅपिटल मार्केट्सवर पुस्तकही लिहिले आहे.