
पुणे - शुल्कवाढीबाबत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत रोझरीच्या शाळांनी गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क घ्यावे, असे आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांनी गुरुवारी दिले. दरम्यान, शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे पत्र पालकांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिले आहे.
रोझरीच्या विमाननगर, वारजे व लष्कर येथील शाळांमधील पालकांनी आज शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी शिक्षण उपसंचालक सुनील मगर, महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी भेट दिली. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा परेरा यांनाही शुल्कवाढ स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, शुल्कवाढ स्थगित ठेवण्याबाबत त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. संस्थेच्या तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांचे सुमारे पाचशे पालक संस्थेच्या कॅम्पमधील कार्यालयासमोर सकाळी जमले होते.
दरम्यान, विमाननगर येथील शाळेच्या पालकांनी गांधीगिरी आंदोलन केले. या वेळी शाळेच्या प्रशासनाला फुलांचा गुच्छ भेट दिला आणि आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. पोलिसांनी मध्यस्थी करून शाळेच्या व्यवस्थापनाला त्यांची बाजू मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार मोठ्या संख्येने जमलेल्या पालकांसमोर रोझरी शाळेचे व्यवस्थापक आश्विन कामत प्रथमच समोर आले. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नाही.
मुख्याध्यापिकांचे उत्तर विमाननगर रोझरी शाळेच्या मुख्याध्यापिका भेटत नाहीत, भेटल्या तर व्यवस्थित बोलत नाहीत, अशा तक्रारी पालकांच्या आहेत. याचा अनुभव पत्रकारांनाही आला. एका पत्रकाराने शाळेतील विद्यार्थी संख्या विचारल्यावर "तुम्हाला का सांगू. तुम्ही पालकांना जाऊन विचारा,' असे उत्तर त्याला मिळाले.