नवी दिल्ली - प्रादेशिक चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने चित्रपट तंत्रज्ञांना कामानिमित्त देशभर प्रवास करण्यासाठी विशेष सवलत योजना जाहीर केली. द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी 75 टक्के आणि प्रथम वर्ग, वातानुकूलित आसनव्यवस्था (चेअर-कार), वातानुकूलित दुसरा आणि तिसऱ्या वर्गासाठी 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली. 1 जुलैपासून ही सवलत लागू होईल.
ही सवलत सर्व दूरच्या रेल्वे प्रवासाबरोबरच राजधानी, शताब्दी आणि जनशताब्दीला लागू असेल. दुरंतो, युवा आणि गरीब रथ या गाड्यांना मात्र ती लागू नसेल. 1 जुलैपासून खरेदी केल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरच ही सवलत लागू असणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले.
मराठी, गुजराती, बंगाली, तमीळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, कोकणी, पंजाबी, भोजपुरी आदी 31 भाषांतील चित्रपट तंत्रज्ञांना ही सवलत मिळेल. नोंदणीकृत चित्रपटनिर्मिती संस्थांनाच हा लाभ मिळणार असून, चित्रपटनिर्मिती प्रमाणपत्र दाखवून ही सवलत घेता येईल. सिनेमेटोग्राफर, एडिटर, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार, आउटडोअर युनिट लाइनमन, आउटडोअर युनिट तंत्रज्ञ, सुतार, स्टील फोटोग्राफर, स्टंट आर्टिस्ट, कॅमेरामन, संगीत दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, साऊंड रेकॉर्डिस्ट, कलामंच दिग्दर्शक यांना ही सवलत मिळणार आहे.
Follow
Us on
Twitter