Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

टीनेजर्स...! ('तनिष्का'चा खास अंक)
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 03, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: madhurangan,   tanishka,   woman,   teenage,   mother,   father,   family
सकाळ माध्यम समुहाच्या खास महिलांसाठीच्या 'तनिष्का' मासिकाचा जुलैचा अंक आहे, टीनेजर्स मुलांवर. वयात येणाऱया मुलांना पालक म्हणून कसं समजावून घ्यायचं, याबद्दल विशेष मार्गदर्शन 'तनिष्का'ने केले आहे. त्याचबरोबर अशा वयातल्या यशस्वी आणि प्रसिद्ध मुलांची ओळखही अंकात आहे. या अंकातील लेख 'ई सकाळ'च्या वाचकांसाठी...

मुलांचे मित्र बना !
- डॉ. सुमन नवलकर
---------------
'काय म्हणावं या मुलाला? दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालला आहे, पाहिलंस?'' अभयच्या या बोलण्यावर अंजलीने मान डोलावली पटल्यासारखी. म्हणजे पटलं होतं ते तिला आतूनच. मान आपोआपच डुलली होती.

अमित हल्ली खरंच हाताबाहेर जात चाललाय. काही समजावून सांगायला लागलं तर ऐकायची तयारीच नसते त्याची. "मला कळतं आई. लहान नाहीये मी आता!' असं तोंडाने तर म्हणतो, पण मग कधी कधी हटूनच बसतो एखाद्या गोष्टीसाठी. परवा "मोबाइल हवा' म्हणाला. 'कॉलेजात गेलास की घेऊ अमित.'' अंजलीने म्हटलं, तर म्हणाला, 'आत्ताच हवा. सगळ्या मित्रांकडे आहे.'' शेवटी दिला आणून त्याला. तर आता आपला दोन्ही कानांत ते इयरप्लग अडकवून असतो डुलत. हाका मारल्या तरी ऐकू येत नाहीत.

'अरे अभय, आपल्या लहानपणी होतेच कुठे मोबाइल? शिवाय आपल्या लहानपणी भावंडं होती. तुलाही आणि मलाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत, सणावाराला आपण आपल्या भावंडांबरोबर धमाल करायचो, खेळायचो, गप्पागोष्टी करायचो. कसले ताण-तणाव असले मनात, तर तेही सांगितले जायचे एकमेकांना. अर्धे प्रश्‍न तर आई-वडिलांकडे पोहोचण्यापूर्वी एकमेकांच्या मदतीने सुटायचे आपले.''

'खरंच अंजली, कुठला पेपर अवघड गेला तर, कोणाबरोबर भांडण झालं तर, कोणी काही अपमानास्पद बोललं तर, आधी एकमेकांनाच सांगितलं जायचं भावंडांत. तसाच गहन प्रश्‍न वाटला तरच तो आईपर्यंत जायचा, आणि प्रश्न सोडवायला आईही असायची घरात. अंजली, तू आणि मी दोघंही नोकरी करतोय, त्यामुळे अमित तसा एकटाच पडतो घरात. आपल्या दोघांपैकी कोणी घरी येईपर्यंत फक्त तो प्रश्‍नच असतो मग त्याच्या सोबतीला.''

'लहानपणी बरं होतं रे. त्याला पाळणाघरातल्या काकूंवर सोपवलं की मोकळे असायचो आपण. तेव्हा वाटायचं, की जरा मोठा झाला अमित की मोकळे होऊ आपण. पण अमित मोठा होतोय तसे जास्त जास्तच अडकत चाललो आहोत आपण. प्रश्‍न कमी न होता उलट वाढतच चाललेत. ''

'अंजली, अगं आपण वेळच देऊ शकत नाही आहोत त्याला हल्ली. वरच्या बढत्या मिळत गेल्या आणि त्यातच गुरफटत गेलो आपण.''

'अरे, पण सुट्टीच्या दिवशी आपण घरात असलो तरी कुठे असतो तो आपल्याबरोबर? कुठे लग्नाला चल म्हटलं तर "तुम्हीच जाऊन या' म्हणतो. कुठे खरेदीला चल म्हटलं तर "बोअर' होतं त्याला. काही चांगलं सांगायला गेलो तर आपल्यालाच टांगायला होतं. आता त्या दिवशीचीच गोष्ट बघ. कधीचा "केप्री-केप्री' करत होता. म्हटलं, कसलं रे ते अर्धवट? धड ना फुल, धड ना हाफ. "घेऊ या, घेऊ या' म्हणत जरा चालढकल केली तर पाहिलंस ना काय केलं ते? सरळ जीन्सचे दोन्ही पाय आपले आपणच कापून बनवली त्याची केप्री. चांगली नवी जीन्स होती रे तयाची. कापली आपली सरळ.''

'जाऊ दे अंजली. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आपण. मीही नाही का मधे दोन जाड्या कापडाच्या फुलशर्टांचे हाफशर्ट बनवले? आणि तू तर किती तरी साड्यांचे सलवार-कमीज बनवतेस.'' अंजलीची मान पुन्हा डुलली पटल्यासारखी. खरं आहे म्हटल्यावर पटणारच ना!
मनही कार्यरत झालं... खरंच, आपण दोघंही आपल्याला जे काही करावंसं वाटतं ते करतो आणि अमितला मात्र सगळ्या बाबतीत आडकाठी करतो. हे खाऊ नको, ते करू नको, असं बोलू नको, तसले कपडे घालू नको. सगळ्यालाच नको-नको म्हणायला लागलो तर बंड करणारच ना त्याचं मन एखाद्या दिवशी!

सुट्टीत त्याला कराटेच्या क्‍लासला जायचं होतं. अभय म्हणाला, 'कशाला ते हात-पाय तोडायचे धंदे? त्यापेक्षा योगासनांच्या क्‍लासला जा. सुट्टीत आजीही जायची योगासनांच्या क्‍लासला.'' मग अमित म्हणाला, 'आजीकडूनच शिकीन मी.'' झालंच मग! योगासनंही राहिली आणि कराटेही राहिले. नाही म्हणायला योगासनं शिकायच्या निमित्ताने अमित आजीकडे राहून आला. खूष होता. आजीने सकाळ-संध्याकाळ काय काय छान छान करून खाऊ घातलं नातवाला. पण झालं असं, की घरी परत आल्यावर आईच्या हातचं गोड लागेना. अंजलीला तेवढा वेळच कुठे असतो छान छान पदार्थ करत बसायला? दोन वेळचं जेवण आणि नोकरी यातच बाद होते ती. बरं, नोकरी सोडावी तर घराचे हप्ते फेडणं चालूच आहे ना अजून! शिवाय आणखी दोन-चार वर्षांनी तर अमितलाही तिची अजिबात गरज भासायची नाही. मग त्या वेळी घरी बसून काय करेल अंजली? शिवाय अंजलीची नोकरी म्हणजे काही शोभेची कुंडी नाही. खत-पाणी घालून वाढीस लावलेलं रोप आहे ते! आता कुठे त्याला फुलं-फळं यायला लागलीत. आता त्याला मुळासकट छाटून टाकायचं म्हणजे...

रिझल्टच्या दिवशीची गोष्ट. त्या पाठच्या कॉलनीतल्या नववीतल्या मुलाने आत्महत्या केली. पेपरात फोटोसकट छापून आली होती बातमी. परीक्षेचा निकाल घेऊन घरी आला. आई-बाबाही पाठून येतच होते. तेवढ्यात हा पटकन पुढे झाला. घरात जाऊन दरवाजा घालून कडी घातली आणि आई-बाबा घरापर्यंत पोहोचायच्या आत हा गळफास लावून पार. का- तर म्हणे पास झालो नाही. हे असलं काही ऐकलं, वाचलं की अभय-अंजलीच्या जिवाचं पाणी पाणी होतं. इतक्‍या लाडाकोडांनी, कष्टांनी वाढवलेला जीव असा क्षणात घालवून बसायचं? पण हल्ली हे तर फारच झालंय. कोणी काही बोललं, ओरडलं, मनाविरुद्ध झालं की सोपा उपाय- आत्महत्या. बरं, या आत्महत्या करण्यामध्ये जास्त प्रमाण पौंगडांवस्थेतल्या मुलांचंच आहे- अमितच्या वयाच्या आसपासची मुलं. मग काय करायचं? ही मुलं चुकीची वागताहेत असं दिसलं तरी गप्प बसायचं? समजा दुर्लक्ष केलं आणि मुलं वाईट मार्गाला लागली तर? "धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशीच अवस्था नाही का ही?

'मग करायचं तरी काय?'' अभयने अंजलीला विचारलं.

'हे बघ अभय, मोठी नाजूक अवस्था असते ही. फार काळजीपूर्वक हाताळावी लागते. मुलं लहान राहिलेली नसतात, पण धड मोठीही झालेली नसतात. मारून-मुटकून चूप बसवण्याचं वय त्यांनी ओलांडलेलं असतं, पण पूर्ण जबाबदारीने वागण्याच्या वयातही अजून पदार्पण केलेलं नसतं.''

'अंजली, आपणही गेलोय ना गं या अवस्थेतून? कोणती खास वागणूक तेव्हा मिळाली होती आपल्याला?''

'अभय, अरे आपल्याला जाणवली नसेल ती, पण दिली गेली असणार खासच. त्याशिवाय का सहीसलामत बाहेर पडलो आपण त्या अवस्थेतून? आठव, तुझे बाबा घालत होते का जीन्स? तू घातल्यास ना? आता अमित केप्री घालतोय. तुझे बाबा बस-ट्रेनने प्रवास करायचे. आई घर सांभाळायची. आता आपण दोघंही नोकरी करतो. टॅक्‍सीने, गाडीने फिरतो. ए.सी.च्या थंड हवेचा सुखद अनुभव घेतो. त्या सुखसोयी मिळवण्याच्या मागे मुलाकडे द्यावं तेवढं लक्ष द्यायला आपल्याला वेळ मिळत नाहीये- आणि सध्याच्या त्याच्या अवस्थेत आपण त्याला वेळ देणंच महत्त्वाचं आहे.''

'मग काय करायचं? आळीपाळीने सुट्टी घेऊन घरी बसायचं?''

'अरे, असं केलं तर वैतागेल तो. म्हणेल, काय वॉच ठेवताय काय माझ्यावर?''

'मग तूच सांग अंजली, करायचं तरी काय आपण?''

'आपण कमीत कमी रात्रीच्या जेवणाच्या वेळी तरी टेबलापाशी एकत्र यायला हवं. एकमेकांशी मनमोकळं बोलायला हवं. आपल्यामध्ये आणि अमितमध्ये खेळीमेळीचं वातावरण टिकून राहायला हवं, तरच त्याचे कोंडलेले प्रश्‍न मांडले जातील आपल्यापुढे. मोकळा होईल तो. टोकाचं पाऊल ऊठसूट उचलायला लागलेल्या या नव्या पिढीत टिकून राहील तो.''

'अगं, पण तो टेबलापाशी जेवायला येतोच कुठे? टीव्हीच्या पुढ्यातच बसून जेवतो तो.''

'या प्रकाराची सुरुवात पण आपणच केली ना अभय? आपल्याकडेही जेवण आणि टीव्ही यासाठी वेगळा वेगळा वेळ नव्हता. मग घातली आपण त्याची सांगड. झालं काय, की एकमेकांबरोबर सुसंवाद साधण्यासाठी वेळच नाहीसा झालाय आपल्याकडे.''

'मग आता गं? आता काय करायचं आपण?''

'काही नाही. सवंग करमणुकीपेक्षा ज्ञानवर्धक असे डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिकसारखे चॅनेल लावायचे. पाहून झाल्यावर कार्यक्रमांवर चर्चा करायची. वर्तमानपत्रांमधल्या अमितने वाचाव्या अशा बातम्या आवर्जून त्याच्या कानावर घालायच्या. त्याच्याशीच नव्हे, तर त्याच्यासमोर बोलतानाही त्याला संवादात भाग घ्यावासा वाटेल असं बोलायचं. त्यालाही बोलतं करायचं.''

'कठीणच दिसतंय एकंदरीत सगळं.''

'कठीण आहे, पण अशक्‍य तर नाही ना? स्पर्धेच्या आजच्या युगात आपल्या अमितने टिकाव धरावा यासाठी आपल्याला त्याचं जीवन, त्याचं व्यक्तिमत्त्व फुलवलं पाहिजे. आई-वडिलांच्या वात्सल्याबरोबर भावंडांचं साहचर्यही आपल्याकडूनच मिळायला हवं त्याला. आपण त्याच्या वयाचे असताना पत्ते, कॅरम, अशी धमाल करायचो आपण सुट्टीत. तू निदान शनिवारी-रविवारी तरी एखादा बुद्धिबळाचा डाव मांडला पाहिजे त्याच्याबरोबर.''

'खरंय अंजली. आणि तू निदान तुझ्या सुट्टीच्या दिवशी तरी त्याच्या आवडीचा खास पदार्थ केला पाहिजेस त्याच्यासाठी.''

'ठरलं तर मग. उद्याच आहे शनिवार. बुद्धिबळाचा पट शोधून ठेव कुठेय तो. आणि प्यादी, उंट, घोडे, हत्ती- आहेत ना सगळे, तेही पाहून ठेव.''

'आणि तूही उद्या कोणता खास पदार्थ करणार असशील तर त्याची तयारी करून ठेव.''

'ते तर मी करतेच. पण आधी हाक तर मार त्याला एकत्र कार्यक्रम पाहू आणि नंतर जेवताना त्यावर चर्चाही करु. "डिस्कव्हरी" लाव टी.व्ही.वर.''

'पण मग तुझी ती आवडती सीरियल?''

'सीरियल को मारो गोली!''
----------------------------------
'तनिष्का'च्या या खास अंकात आहे...
* शंभर चुका माफ
मुले वयात येतात. या टीन एज मुलांना आपलं वेगळ आयुष्य आहे असं वाटतं असतं. यातून अनेकदा मुलं काय करतील त्याला पालक विरोध करतात. त्यातून वाढतो ताण-तणाव. अनेक गोष्टी अशा असतात ज्या पालकांनी दुर्लक्षित केल्या तरी फारसं बिघडत नाही.
- रजनी सुनील करंदीकर

---------------
* वयात येतोच...
प्रत्येकाचा वयात येण्याचा एक टप्पा असतो. अनेकजण त्यातून निभावूनही जातात. पण आपला मुलगा अधिक चांगल्या पद्धतीने त्यातून बाहेर पडावा, किंवा त्याच्याकडे फक्त या काळातल्या लक्षात ठेवाव्यात अशाच आठवणी असाव्यात, असं वाटत असेल तर आपल्या वयात आलेल्या मुलाकडे मैत्रीचा हात पुढे करायलाच हवा. मुलांत टीनएज मध्ये अनेक भावनिक बदल होतात. त्यांना मुलींबद्दल आकर्षण वाटू लागतं. यातून त्यांना चांगली कोणती वाट हे पालकांनीच सांगायला हवं.
- वरद लघाटे
---------------
* हे वयच असं असतं...
पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. लहानपणीच तो काय करणार आहे हे लक्षात येतं. पण यौवनावस्था ही अशी असते की ती या "दिसण्याला" आकार देते. या वयात तो त्याचं वेगळेपण सिद्धही करतो. कारण ते वयच तसं असतं. टिंग्या चित्रपटात मुख्य भूमिका केलेला शरद गोयेकर, जलतरणात विविध विक्रम गाजवलेला वीरधवल खाडे, सहल कौशिक असी काही मुलं यौवनावस्थेतच काही अद्वितीय करून गेलेली, इतरांसमोर आदर्श ठरलेली आहेत.
- मंजिरी फडणीस
---------------
* मुलगा
लहानपणापासून आपलं मूल हे आपण "आपलं, माझं ' म्हणून वाढवलेलं असताना, तरुण झालेला तोच मुलगा किंवा मुलगी ही "आजकालची पोरं' म्हणून आपण त्या पिढीला दान करून मोकळे होतो! आणि इथेच गडबड होते. कितीही बिथरलं तरी ते आपलं मूल आहे हे लक्षात ठेवायला हवं, तरच मुलांबरोबरचा संवाद अधिक सशक्त होऊ शकेल.
- डॉ. सरिता वैद्य
---------------

अंकासाठी संपर्क करा tanishka@esakal.com
'तनिष्का'ची ऑर्कुट कम्युनिटी जॉईन करा...!
---------------

प्रतिक्रिया
On 7/4/2010 9:15 AM su said:
खरच विचार करायला लावणारा लेख आहे.........................
On 03/07/2010 22:58 ek sakhi said:
बापरे........हे सगळा वाचला कि टेन्शन वाढायला च लागता,मुलांना जन्माला घालणा सोप्पय पण आज काल मुलांना वाढवणं,मोठा करणं जाम अवघड झालाय असं वाटायला लागलाय.
On 7/3/2010 7:10 PM kiran said:
लहानपणापासून आपलं मूल हे आपलं होतं आणि आहे. मुलांचे मित्र बना आणि काळजीपूर्वक काय लक्षात ठेवायला हवं हे सांगा. ..............v v v v v v nice...nice....nice....nice.
On 7/3/2010 6:43 PM ajit vartak said:
सध्या घरात काय आणि बाहेर काय कुठेही रोल मोडेल नाही नवीन पिढी पुढे आदर्श नाही. आणि ह्याला जवाबदार कोण , तर आपणच. त्याचीच हि फळे. नवीन पिढी ला काय म्हणून नावे ठेवायची.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: