नक्षलग्रस्त भागात रस्त्यांसाठी हवा विशेष निधी
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Sunday, July 04, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधणीच्या कामांना केंद्रीय ग्रामविकास खात्याने विशेष बाब समजून भरीव योगदान द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय ग्रामविकासमंत्री सी. पी. जोशी यांच्याशी आज महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी चर्चा केली.
नक्षलग्रस्त भागातील समस्या लक्षात घेता, कंत्राटदार बांधकाम सुरू करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे विशेष बाब म्हणून केंद्राने राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसारख्या अभियानांमधून रस्ते बांधणीसाठी अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. महाराष्ट्राची समस्या लक्षात घेऊन निधी देण्याचे धोरण लवचिक कसे करता येईल, यावर नियोजन आयोगाशी चर्चा करण्याचे आश्वासन जोशी यांनी या वेळी दिल्याचे समजते. गावात वापरलेले सांडपाणी साठवून त्यावर फेरप्रक्रिया करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याने सादर केला आहे. सिंगापूर येथे जयंत पाटील यांनी खात्याच्या काही अधिकाऱ्यांसह सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली होती. ही योजना भारतात राबवणे सहज शक्य असून, महाराष्ट्रात तसा प्रयोग होऊ शकतो, हे या वेळी लक्षात आणून देण्यात आले.