नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीला आज जोधपूर येथे प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ देशातील संघ प्रचारकांचीही बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकांमध्ये संघपरिवारातील अन्य संघटनांबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बैठकांमधील चर्चा बाहेर येणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह सारे वरिष्ठ संघनेते या बैठकांना उपस्थित असल्याचे सांगितले जाते. संघ व परिवारातील संघटनांच्या गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा व भावी कार्यक्रम ठरविण्याबरोबरच 7, 8 व 9 जुलैला होणाऱ्या देशभरातील संघ प्रचारकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीची रूपरेषा ठरविणे हाही या बैठकीचा अधिकृत अजेंडा आहे. प्रसारमाध्यमांना बैठकीपासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले आहे. त्यामागे "मीडिया शूड नॉट फिक्स आरएसएस'अजेंडा' हा विचार असल्याचे सांगितले जाते.
जोधपूरच्या चिंतन-मंथनामध्ये भाजपचाही विषय अपरिहार्यपणे चर्चेला येणार, हे निश्चित आहे. विशेषतः भाजपवर अध्यक्ष लादल्यानंतर संघाच्या अपेक्षेनुसार काम होते की नाही, याकडे संघाचे लक्ष आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार, संघ भाजप नेतृत्वाबाबत फारसा समाधानी नाही. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतही संघनेते व भाजप नेते यांची गोपनीय बैठक झाली. त्या बैठकीत संघनियुक्त भाजप अध्यक्षांसह जेटलीवगळता अडवानी गटाच्या सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, अनंतकुमार हे नेते, तसेच भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्ताजी होसबळे, मदनदास देवी व सुरेश सोनी हे संघनेते यांच्यात बंद दरवाजाआड भाजपच्या आगामी वाटचालीबाबतचा खल झाल्याचे सांगितले जाते.
भाजपमध्ये अडलेले जबाबदारी वाटपाचे घोडे, जातीनिहाय जनगणनेवर संघाच्या मताच्या विरोधात जाण्याचे पक्षाने दाखविलेले धाडस, जसवंतसिंह यांचा पुनर्प्रवेश, झारखंडमध्ये भाजपची झालेली शोभा आदी मुद्द्यांचाही ऊहापोह त्या बैठकीत झाल्याचे समजते. त्याशिवाय, भाजप अध्यक्षांची राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये मलिन होत चाललेल्या प्रतिमेवरही गांभीर्याने खल झाला. त्यांच्याकडून विरोधी पक्षनेत्यांना मध्यंतरी झालेल्या शिवीगाळीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीकडून "वाणीसंयम' आवश्यकच असल्याचा घरचा आहेरही गडकरींना मिळाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीतील, तसेच प्रचारकांकडून मिळालेला "फॉलो-अप' जोधपूरला घेण्यात येईल व त्यानंतर भाजपचा आगामी "रोड मॅप' तसेच "व्हीजन-2014' ठरवण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Follow
Us on
Twitter