नवी दिल्ली - जीवघेण्या महागाईविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीसह विरोधकांनी पुकारलेला "भारत बंद' ही केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या विरोधातील लढाईची केवळ सुरवात आहे. रस्त्यारस्त्यांवर सुरू झालेली ही लढाई थेट संसदेत घेऊन जाण्याचा इशारा भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक शरद यादव यांनीही तोच सूर आळवला.
आजच्या आंदोलनापासून धडा घेऊन पेट्रोल, डिझेल, रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसची प्रचंड भाववाढ सरकारने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही भाजप आघाडीने केली. या "बंद'ला दिल्लीसह देशभरात जो अद्भुत व उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आम्ही जनतेपुढे नतमस्तक झालो आहोत, असे शरद यादव यांनी सांगितले. दुसरीकडे, भाजप आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांनीही "बंद'च्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल देशवासीयांचे आभार मानले. हा "बंद' ऐतिहासिक ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
आजच्या "बंद'मुळे 70 च्या दशकातील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण ताजी झाली, असे यादव यांनी नमूद केले. "बंद'च्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेला यादव व गडकरी यांच्यासह अकाली दलाच्या हरसिमरत कौर, भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह, खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. ज्यांनी "बंद'मध्ये सहभाग घेतला त्या सर्व पक्षांचे अभिनंदन करतानाच ही एकजूट यापुढेही कायम राहील, असेही यादव यांनी सूचकपणे सांगितले. ते म्हणाले, की महागाईच्या आगीत गोरगरीब जनता होरपळत असताना कॉंग्रेस आघाडीचे सरकार पूर्णपणे संवेदनाहीन बनले होते. मात्र, आता हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जनतेच्या भावनांची दखल यापुढेही सरकारने घेतली नाही, तर या जनताविरोधी सरकारला सत्तेतूनच "बेदखल' व्हावे लागेल.
गडकरी यांनीही केंद्रावर जोरदार हल्ला चढविताना, आता ही लढाई रस्त्यावरून संसदेत पोचेल, असा इशारा दिला. जीवघेणी महागाई हा कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नसून, तो सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणूनच आज जनता पुढे आणि आंदोलक मागे, असे अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. या "बंद'मध्ये भाजपशासित राज्यांतील सरकारे सहभागी झाली होती, हा कॉंग्रेसचा आरोप बेजबाबदारपणाचा असल्याचे सांगून ते म्हणाले, की आपण स्वतः भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने आंदोलनात थेट सहभागी होऊ नये, असे सांगितले होते. हा आरोप म्हणजे कॉंग्रेस सरकारची चुकीची आर्थिक धोरणे व भ्रष्ट प्रशासन यांच्यावर पांघरूण घालण्याचा प्रकार आहे, अशीही टीका गडकरी यांनी केली. "बंद'मध्ये सहभागी न झालेल्या मायावती यांच्या पक्षाचा समाचार घेताना गडकरी यांनी, "स्वतःची स्मारके उभारण्यापेक्षा दर वर्षी उघड्यावर सडणारे धान्य वाचविण्यासाठी शीतगृहे उभारा', असा बोचरा सल्ला दिला.
संसद होणार ठप्प?भाजप आघाडीची बैठक बोलावून संसदेतील रणनीती निश्चित करण्याचा निर्णयही शरद यादव यांनी जाहीर केला. दिल्लीत लवकरच ही बैठक होईल, असे त्यांनी सांगितले. अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे या महिन्याच्या 15 ते 20 तारखेदरम्यान अडवानी यांच्या निवासस्थानी ती होण्याची चिन्हे आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही महागाईचाच मुद्दा गाजणार असून, निदान पहिल्या आठवड्यात तरी यावरून संसदेचे कामकाज चालणे कठीण असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter