Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
-
Wednesday, July 07, 2010 AT 12:35 AM (IST)
Tags: rain,  gadchiroli,  vidarbha

गडचिरोली - जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी (ता. पाच) रात्री व आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. आज सकाळी गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी व कुरखेडा तालुक्‍यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते. मात्र, दोन तासांनंतर पावसाने विश्रांती दिल्यानंतर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कुरखेडा तालुक्‍यात सर्वाधिक 96.0 मिमी पाऊस पडला.

जिल्ह्यात गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने सोमवारी रात्री हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी आठच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ झाली. सकाळी सतत दोन तास पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यंदा गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अहेरी व मुलचेरा या तालुक्‍यात तर पेरणीची कामेही पावसाने खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची प्रतीक्षा होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आज सकाळी गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची व भामरागड या तालुक्‍यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी आदल्या रात्रीही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी पडल्याने अजूनही नदी, नाले कोरडेच आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. गडचिरोलीनजीक एका शेतकऱ्याने शहरातील गटारातून वाहणाऱ्या पाण्याचा सदुपयोग करीत धान शेती फुलविली असून, सध्या या शेतात धान रोवणीच्या कामाला सुरवात झाली आहे. आज झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या, तर अनेक ठिकाणी नाल्या साफ न करण्यात आल्याने पाणी साचले होते.

जिल्ह्यात पडलेला पाऊस
गडचिरोली 7.0 मिमी, धानोरा 2.0, कुरखेडा 70.1, देसाईगंज 96.0, भामरागड 6.07, आरमोरी 54.9, चामोर्शी 2.05, मूलचेरा 19.07, कोरची 54.0, अहेरी 1.02, एटापल्ली 14.0 तर सिरोंचा येथे 4.0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नदी, नाले कोरडेच
जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत असतानाही जिल्ह्यातील जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. याशिवाय जुलै महिन्यात दुथडी भरून वाहणारी वैनगंगा, कठाणी, प्राणहिता, पर्लकोटा, सतीनदी व खोब्रागडी नद्यांचे पात्र अजूनही कोरडेच असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्‍त केली जात आहे. नदीला मुबलक पाणी नसल्याने शहरात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी प्रमाणात मिळत आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: