Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा...
-
Friday, July 09, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: rain,  gadchiroli,   vidarbha

मिलिंद उमरे - सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली -  "घन ओथंबून येती, वनात राघू घिरती, पंखावरती सर ओघळती, झाडातून झडझडती'. निसर्गकवी ना. धो. महानोरांच्या गीतांचे हे बोल कानी पडताच मनात चिंब पावसाच्या ओल्या आठवणी ताज्या होतात. यंदाच्या विक्रमी उन्हाळ्याची काहीली शांतवणाऱ्या पावसाने मनामनांत असाच गारवा पेरत पाऊसवेड्या आठवणींना अंकुरीत केले आहे.

तसा मृग उलटत असताना आढेवेढे घेत पावसाने एंट्री घेतली. कधी आला आणि कधी गेला हे कळलेसुद्धा नाही. मागील दोन वर्षांत पावसाचा लहरीपणा अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हृदयातही धडकी भरली होती. पण, कालपरवापासून पाऊस जरा स्थिरावला आहे. आज तर पावसाने सकाळपासून ठाण मांडले. ज्येष्ठाचा हा पाऊस अगदी सेवानिवृत्त ज्येष्ठ माणसासारखाच मायेची पखरण करीत सर्वांना हळूवार भिजवत आहे. आता सोमवारपासून (ता. 12) आषाढाच्या धसमुसळ्या सरींना प्रारंभ होईल. म्हणजे काहीसा वृद्धासारखा भासणारा पाऊस सोमवारपासून तरुण होणार आहे. कवी कालिदासाच्या "मेघदुतम्‌'मधील "आषाढस्य प्रथम दिवसे' या ओळीची आठवण देत, पावसाने प्रामाणिकपणे बरसावे, हीच माफक अपेक्षा.

मागील दोन वर्षांपासून पावसाचा लपंडाव अनुभवणाऱ्यांना आताचा गारवा पुन्हा उन्हात परिवर्तित तर होणार नाही ना? अशीही एक धास्ती आहेच. सध्याच्या पावसाने मात्र "आला आला वारा, संगे पावसाच्या धारा' या गीतांच्या ओळी ओठी आणल्या आहेत. अनेकांना पूर्वीच्या पावसाच्या आठवणी येत आहेत. पावसाची आठवण देणारा, मिलिंद इंगळेच्या स्वरांनी सजलेला आणि कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदमच्या पावसाळी शब्दांचा "गारवा' अल्बम घराघरांत वाजविला जात आहे. "गारवा.....वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा', "झाडाखाली बसलेले... कोणी कोठे रूसलेले'," पुन्हा पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे', अशी अनेक गीते पावसाला साथ देत आहेत. "अल्ला मेघ दे पाणी दे' म्हणणारा बळीराजा शेतीकामांत दंग आहे. आता पावसाने जरा मुक्‍काम ठोकावा. पाऊस जमिनीत झिरपावा; आणि मनातमनांत शिरावा. तो असा बरसावा की, कवयित्री इंदिरा संत यांच्या शब्दांत प्रत्येकाने म्हणावे,"नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी अन्‌ दारात रांगोळी'

गेले ते दिन गेले...
सध्याचा पाऊस चांगला असला तरी पूर्वीसारखी पावसाची झड आता दुर्मिळ झाली आहे. पूर्वी दहा-दहा दिवस संततधार पावसाची झड असायची. अशा झडीत कुणाची घराबाहेर पडायची टाप नव्हती. वाढत्या प्रदूषणामुळे झडीचे दिवस हरवले आहेत.
 
Follow
Us on
Twitter



आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: