Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राजकीय अपेक्षाभंगामुळे काश्‍मिरी तरुण निराश
-
Friday, July 09, 2010 AT 11:45 PM (IST)
Tags: youth,  education,   politics,   pune

पुणे - 'दीड वर्षापूर्वी मतदानात सहभागी झालेल्या तरुणांनी आता हातात दगड का घेतले, हा अशांत झालेल्या काश्‍मीरचा मुख्य मुद्दा आहे. निवडणुकीच्या कालावधीत त्यांच्या अपेक्षा खूप वाढविण्यात आल्या होत्या. मात्र, त्या पूर्ण होण्याच्या दिशेने काहीच वाटचाल होत नसल्याने आम्हाला संधी कधी मिळणार, या भावनेतून या तरुणांमधील निराशा बाहेर येत आहे,'' असे जम्मू-काश्‍मीरमधील कम्युनिस्ट पक्षाचे आमदार युसूफ तारिगामी यांनी शुक्रवारी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

काश्‍मीरमधील सद्यस्थितीबाबत सरहद संस्थेतर्फे येत्या रविवारी आयोजित व्याख्यानासाठी तारिगामी पुण्यात आले आहेत. काश्‍मीरमधील पहिला आत्मघाती हल्ला 2005 मध्ये त्यांच्यावर झाला होता. त्यात, त्या राज्याचे शिक्षणमंत्री गुलाम नबी व सचिव ठार झाले होते. मात्र, सर्व राजकीय पक्षांनी इच्छाशक्ती दाखविल्यास या अशांततेतून काश्‍मीर बाहेर पडेल, असा तारिगामी यांना विश्‍वास आहे. ते म्हणाले, ""काश्‍मीरमध्ये उद्योगधंदे नाहीत. रोजगार सरकारी नोकरीपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे काश्‍मिरी तरुणांना त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होत नसल्याची निराशा आली आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने त्यात भर पडली. या स्थितीचा फायदा फुटीरतावादी घेत आहेत. अनेक जण आपले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अनेकांचे हात आहेत. त्यामुळे सध्या काश्‍मीर हितसंबंध जोपासणाऱ्यांचा अड्डा झालेला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काश्‍मीरमधील सर्व घटकांशी चर्चा झाली पाहिजे. तेथील राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप थांबविले पाहिजेत. राज्य सरकारने कारभारात सुधारणा केली पाहिजे. चर्चेद्वारे मार्ग निघू शकतो. मग, सर्वांशीच चर्चा करण्यात काय हरकत आहे? पाकिस्तानशीही पुन्हा चर्चा झाली पाहिजे. तसे झाल्यास दहशतवादी वेगळे पडतील. ''

देशातील जनतेकडून हवी आपुलकी
काश्‍मिरी जनतेने जिनांना नाही तर महात्मा गांधींना स्वीकारले होते, हे लक्षात घेऊन देशातील जनतेने काश्‍मीरकडे पाहिले पाहिजे. केंद्र सरकार काश्‍मीरमध्ये पैसा अक्षरश: ओतते, हा प्रचार खोटा आहे. काश्‍मिरी युवकांना देशातील जनतेकडून आपुलकी हवी आहे. मात्र, अन्य राज्यांतील विशिष्ट पक्ष, नेत्यांकडून काश्‍मीरबाबत द्वेष, तिरस्काराची भावना व्यक्त झाल्यास काश्‍मीरमधील आग आणखी भडकते. ती विझविण्यासाठी देशातील प्रत्येकाकडून सहकार्य मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा तारिगामी यांनी व्यक्त केली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: