नवी दिल्ली - अफजल गुरू हा कॉंग्रेसचा जावई लागतो काय, असा सवाल करून भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पुन्हा खळबळ उडवली आहे. मात्र, बॉंबस्फोटांबाबत पकडले गेलेले संघ कार्यकर्ते व त्यामुळे संघात आलेली अस्वस्थता पाहता गडकरी यांना अचानक गुरूची आठवण येण्याचे कारण स्पष्ट असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. गुरूच्या फाशीची फाइल हलायला लागली असतानाच भाजपने पुन्हा त्या विषयाला "बत्ती' देण्यामागे हिंदुत्ववादी अतिरेक्यांची ताजी धरपकड, हेही पडद्यामागचे कारण असू शकते, असे राजधानीत मानले जात आहे.
गडकरींच्या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाली असली, तरी त्यांनी मात्र माघार घेण्यास व माफी मागण्यास स्वच्छ नकार दिला आहे. "मी चुकीचे बोललेलो नाही. मग माफी का मागावी?' असा सवाल त्यांनी केला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गडकरींचा गेल्या सहा महिन्यांतील कारभार पाहता त्यांच्यात इतकी हिंमत येण्यामागे कोणीतरी भक्कम शक्ती असणार.
गडकरींच्या वक्तव्याबाबत भाजपचे मित्र व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही नाराजी व्यक्त केली. "सत्य हे सभ्य आणि मर्यादित भाषेतच अधिक सुंदर भासते,' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. कॉंग्रेसनेही गडकरींच्या ताज्या शेरेबाजीची संभावना "अभद्र, असंस्कृत आणि अश्लील' अशा प्रकारे केली. मुलायमसिंह व लालूप्रसाद यांना काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी जाहीर शिवीगाळ केली होती. त्यानंतर आजच्या त्यांच्या उद्गारांनी पुन्हा खळबळ उडवून दिली व गडकरींच्या विरोधात गेलेल्या काही माध्यमांच्याही हाती कोलीत मिळाले.
मात्र, गडकरींचे "ते' वक्तव्य व आताचे वक्तव्य यात मूलभूत फरक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे व गेल्या काही दिवसांतील घडामोडींचा आधार त्याला आहे. कानपूर येथील स्फोटांबद्दल दोन संघनेत्यांना काही दिवसांपूर्वीच चौकशी संस्थांनी ताब्यात घेतले होते. यात संघाच्या केंद्रीय समितीचे सदस्य अशोक बेरी व प्रांत प्रचारक अशोक वर्षने यांचा समावेश आहे. या दोघांचीच धरपकड झाल्याने संघपरिवारात अस्वस्थता आहे. त्यातूनच संघाने भाजप नेत्यांसह दिल्लीत गुप्त बैठकी घेतल्या. या बैठकींनंतरच गडकरी यांना अफजलची "उचकी लागली.' त्यांच्या स्वभावाप्रमाणे कॉंग्रेसवर टीका करताना जिभेचा लगाम सुटला. हे खरे असले, तरी गुरूचा मुद्दा भाजप अध्यक्षांच्या तोंडून अशा पद्धतीने पुन्हा वदविण्यामागेही संघपरिवाराची निश्चित काही रचना असल्याची दाट शक्यता व्यक्त होते.
गुरू याच्या फाशीच्या प्रकरणाला खुद्द केंद्र सरकारतर्फेही गती मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यावेळीच अफजल गुरूची फाइल, हा चर्चेचा विषय ठरू शकतो, असे संकेत खुद्द गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिले होते. खुद्द गुरूनेही "एकदाचे मला फाशी देऊन टाका' असे वक्तव्य यापूर्वी अनेकदा केले आहे. त्यामुळे गुरूच्या फाशीची फाइल हलू लागली असताना भाजपने पुन्हा त्या विषयाला "बत्ती' देण्यामागे हिंदुत्ववादी अतिरेक्यांची ताजी धरपकड हेही कारण असू शकते, असे राजधानीच्या राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
Follow
Us on
Twitter