नवी दिल्ली - अफजल गुरू प्रकरणी कॉंग्रेसवर भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेमुळे कॉंग्रेस-भाजपमधील शाब्दिक खडाजंगीनंतर कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही यात उडी घेतली आहे. "राजीव गांधींच्या मारेकऱ्यांविरुद्ध भाजपच्या सरकारने कारवाई केली नव्हती. हे मारेकरी भाजपचे कोण लागत होते,'' असा पलटवार दिग्विजयसिंह यांनी केला आहे.
संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख दोषी असलेल्या अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल गडकरी यांनी केला होता. तसेच अफजलला मिळणाऱ्या विशेष वागणुकीमुळे तो कॉंग्रेसचा जावई आहे काय, असे विधान नुकतेच केले होते. या विधानामुळे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी गडकरींना मानसिक उपचारांची गरज आहे, असा टोला लगावला होता. तसेच त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला होता. पाठोपाठ दुसरे प्रवक्ते शकील अहमद यांनी या वक्तव्याबद्दल गडकरींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. तसेच या प्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्ते पुढे सरसावले तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, असा इशारा दिला होता. गडकरींची भाषा अश्लाघ्य असल्याने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जावा, असे आवाहनही कॉंग्रेस प्रवक्त्याने केले होते. कॉंग्रेस पाठोपाठ समाजवादी पक्षानेही गडकरींवर टीका केली होती.
कॉंग्रेस, "सप'कडून झालेल्या प्रतिटीकेनंतरही गडकरी आपल्या विधानावर ठाम आहेत. भाजपनेही गडकरींच्या वक्तव्याच्या आधारे सत्ताधारी कॉंग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यापार्श्वभूमीवर सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेल्या दिग्विजयसिंह यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असताना राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. ते लालकृष्ण अडवानी आणि गडकरी यांचे नातेवाईक होते काय, असा टोला दिग्विजयसिंह यांनी लगावला. तसेच इंदिरा गांधी यांचे खुनी असलेल्यांचे वकीलपत्र घेणाऱ्यांशी भाजपच्या संबंधांवरही दिग्विजयसिंह यांनी राम जेठमलानी यांचे नाव न घेता टीका केली.
Follow
Us on
Twitter