नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसदरम्यान टीकायुद्ध चांगलेच रंगले असून, कॉंग्रेसने या साऱ्या प्रकरणाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. गडकरी यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल कॉंग्रेसने "ही असभ्य भाषा, ते ज्या संघटनेशी संबंधित आहेत त्या संघटनेची वर्तणूक, चारित्र्य आणि चेहरा दर्शविणारी आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता टोला लगावला आहे.
कॉंग्रेस आणि भाजपदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, नितीन गडकरी यांनी दिग्विजयसिंह हे मोगल बादशहा औरंगजेबाचे की पृथ्वीराज चौहानांचे पुत्र आहेत, असा सवाल केल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्या संदर्भात कॉंग्रेसच्या दैनंदिन वार्तालापात प्रवक्ते मनीष तिवारी यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ""अभद्र, असभ्य भाषेवर प्रतिक्रिया देऊन सुशोभित करण्याची गरज नाही,'' असा टोला लगावला. राजकारणाची एक भाषा आहे, तिची वेगळी शैली आहे. मात्र कोणी उल्लंघन करत असेल तर तो ज्या संघटनेशी संबंधित आहे, त्या संघटनेची वर्तणूक, चारित्र्य आणि चेहरा दर्शवितो, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता त्यांनी केली.
Follow
Us on
Twitter