Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चिंतेचे कारण नाही, भरपूर पाऊस पडेल
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Tuesday, July 13, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: rain,  shortage,  imd,  prithviraj chavan,  new delhi,   national,   snn

नवी दिल्ली -  हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे अंदाज वर्तवूनही पावसाने हुलकावणी दिल्याने देशाच्या बहुतांश भागांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑगस्टपर्यंत व्यवस्थित पाऊस होईल, असे भाकीत वर्तविले आहे. येथील एका कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी "चिंतेचे कारण नाही, भरपूर पाऊस पडेल,'' अशा शब्दांत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा 16 टक्के पाऊस कमी झाल्याचे देशभरातील सात वेधशाळांनी दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले होते. 1995 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती ओढवली. त्याचप्रमाणे मॉन्सून सक्रिय झाल्यापासून पावसाचे प्रमाण फारसे समाधानकारक नसल्याने चिंतेचे वातावरण असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसास प्रारंभ होईल. तसेच जुलै व ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होईल, असा दावा केला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कमी पावसाचे 16 टक्के प्रमाण 12 टक्‍क्‍यांवर आले आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्या संदर्भात विचारले असता चव्हाण म्हणाले, ""पावसाचे दैनंदिन आणि साप्ताहिक अंदाज दिले जातात. साप्ताहिक अंदाजांनुसार पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल.'' सद्यःस्थितीत पावसाच्या सरासरीमध्ये तूट दिसत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की पाऊस उशिरा आल्यामुळे ही तूट दिसत आहे. परंतु देशभरात पाऊस सरासरी गाठेल. मात्र, या चांगल्या पावसामुळे अन्नधान्याचे उत्पादनही विक्रमी होईल काय, असे विचारले असता त्यांनी त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

उपग्रह प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन
दरम्यान, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज "कार्टोसॅट- 2 बी' या उपग्रहाच्या केलेल्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल चव्हाण यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. "इस्रो'चे हे पंधरावे यशस्वी उपग्रह प्रक्षेपण असून, पीएसएलव्ही सी-15 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे केलेले हे प्रक्षेपण अत्यंत अचूक व वैज्ञानिक भाषेमध्ये "टेक्‍स्टबुक परफेक्‍ट' असे झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला. या उपग्रहाद्वारे उच्च दर्जाची चित्रे घेता येणार आहेत. शिवाय नकाशाशास्त्र (कार्टोग्राफी) क्षेत्रात भारताचा दबदबाही वाढेल, असा विश्‍वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
 
Follow
Us on
Twitter
 
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: