
पुणे - येथील कॅंप भागातील रोझरी शाळेने केलेल्या वाढीव शुल्काबाबत रोझरी पालक संघातर्फे बुधवारी (ता. १४) पालकांची सभा घेण्यात आली. शाळेने वाढीव शुल्क आठ दिवसात मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पालकांची सभा घेण्यात आली, यावेळी सुमारे पाचशे पालक उपस्थित होते.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रारी पालकांनी यावेळी मांडल्या. शिवाय पालकांना विश्वासात न घेता अचानक शुल्क वाढ केल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शाळा वेगवेगळी कारणे दाखवून शुल्काची मागणी करत आहे, सांगितलेल्या दिवशी शुल्क न भरल्यास दंडही आकारला जातो. शाळेत अनेक समस्या असल्याच्या तक्रारी पालकांनी यावेळी निदर्शनास आणून दिल्या. पालकांनी वाढीव शुल्क भरू नये, तसेच येत्या आठ दिवसात वाढीव शुल्कवाढ मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय पालक संघातर्फे घेण्यात आला.

शाळेनी केलेली शुल्कवाढ विरोधात पालकांनी गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. चर्चेसाठी संघातर्फे मुख्याध्यापिकेंना पत्र देण्यात आले आहे, तरीही शाळेकडून कोणत्याही स्वरूपाचे उत्तर आलेले नाही. पालक संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव शुल्कवाढ मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पालकांवर शुल्कवाढीचा कोणताही भर न लादता गेल्यावर्षीप्रमाणेच शालेय शुल्क आकारावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही शाळा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत असल्याची माहिती पालक संघटनेचे अध्यक्ष अजय साठे यांनी दिली.
यावेळी अनेक पालकांनी आपल्या तक्रारी पालक संघाकडे लेखी स्वरूपात दिल्या आहेत. शनिवारी (ता. १०) शाळेतील शिक्षकांनी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याच्या पालकाने बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे.