कर्नाटकात आता अटकसत्र
-
Wednesday, July 14, 2010 AT 12:11 AM (IST)
बेळगाव - मराठी भाषकांच्या विराट मोर्चाची धडकी भरल्याने कर्नाटक पोलिसांची तारांबळ उडाली आहे. अमानुष लाठीमार करून मोर्चाला बिथरवण्याची कृती करूनही मराठी भाषकांची एकजूट कायम राहिली आहे. त्यामुळे आता पोलिसच बिथरले आहेत. त्यांनी पध्दतशीरपणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि या मोर्चात पुढाकार घेणाऱ्यांचे अटकसत्र आज सुरू केले आहे. सायंकाळी उशिरा खानापूरचे माजी आमदार आणि सीमालढ्यातील सक्रीय कार्यकर्ते मनोहर किणेकर यांच्या अटकेसाठी कर्नाटक पोलिस त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे समजते. पोलिसांच्या या अटकसत्राच्या यादीत माजी महापौर शिवाजी सूंडकर, विजय मोरे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार वसंतराव पाटील आणि दिगंबर पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या अटकसत्रामुळे सीमाभागात पुन्हा संतापाची लाट पसरली आहे.