नवी दिल्ली - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीला खुद्द कॉंग्रेसमधूनच तीव्र विरोध केला जात आहे. चव्हाण यांनी भविष्यातील परिणामांचा विचार न करता अतिशय उथळपणे व अव्यवहार्यपणे ही मागणी करून एकप्रकारे शिवसेनेची "री' ओढल्याचे कॉंग्रेसचे नेते म्हणू लागले आहेत.
केवळ भाषक बहुसंख्यत्वाच्या मुद्यावरून केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा निकष एकदा का तत्त्वतः मान्य झाला, तर त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईवरही होऊ शकतो, याचा मुख्यमंत्र्यांनी विचार केला आहे का, असा प्रश्नही कॉंग्रेसमधून उपस्थित केला जात आहे. राज्यात विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने सातत्याने हीच मागणी लावून धरली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अचानक शिवसेनेच्या वाटेने जाण्याचे कारणच काय, असा प्रश्न काही कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला.
सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर कॉंग्रेसचे मुंबईतील खासदार एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेची भूमिका अविचारी आणि अदूरदृष्टीची असल्याची टीका केली. त्या पक्षाला या मागणीतले धोके लक्षात येत नाहीत का, असा संतप्त प्रश्नही त्यांनी केला. एकदा का भाषेच्या मुद्यावरून संबंधित भूभाग केंद्रशासित प्रदेश करण्याचे तत्त्व लागू झाल्यास त्याचा त्रासच होणार असल्याने शिवसेनेची मागणी पूर्णतः आततायीपणाची असल्याचा टोला गायकवाड यांनी लगावला.
Follow
Us on
Twitter