आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...
पाहातोय स्वत:लाच पुन्हा डोळे भरून! एकटाच बसलोय मी सांताक्रूझ विमानतळावरच्या पार्कींगच्या कट्ट्यावर! कपडे आहेत साधे आणि पायात आहेत साध्याच वहाणा. कुठूनतरी स्वस्तात विकत घेतलेल्या. पण नजर आहे खिळलेली आकाशात झेपावलेल्या एका विमानावरती. ते धावपट्टीवरून नुकतच झेपावलंय. गुरुत्वाकर्षणाची महाकाय शक्ती खोटी ठरवत झेपावलंय अगम्य अशा एका धुंदीत ! हळूहळू ते लहान होत चाललयं. पण माझी नजर अजूनही खिळलेली! विमानाकडे वळलेली! एक दिवस मी सुद्धा...
अंधार पडतो तसा मी मोजून बघतो खिशातली नाणी. बससाठी तितकेसे पैसे पुरेसे नाहीत हे ध्यानात केव्हाच आलयं. मग पार्ल्यापर्यंत चालत. घामाने चिंब भिजलेला शर्ट काढून नीट वाळत घालतो आणि थोडासा अस्वस्थच झोपी जातो. काहीही असू दे. उद्या पुन्हा माझी भेट ठरलेली!
हे सगळं असंच घडलंघरची परिस्थीती बेताचीच; पण आई-वडीलांनी दिली जिद्द, स्वाभिमान आणि स्वप्न पहाण्याची १०० टक्के सूट. मॅट्रीक पास झाल्यावर एका ऍप्टीट्यूड केंद्रात ऍडमिशन घेतली. म्हटलं आपला 'कल' कुठे आहे ते पाहूयात? तिथे माझ्या बुद्धीची क्षमता सामान्य म्हणुन अधोरेखीत झाल्यावरती बरेच विषय आपोआप सुटले आणि मी वाणिज्य शाखेकडे प्रस्थान केलं. पण १२वी नंतर मनातली अस्वस्थता शांत बसू देईना. सीएस, सीए, आयसीडब्ल्यूए या शब्दांचं पूर्वीचं वलय फिकट होत गेलं. हा काळ प्रचंड मेहनतीचा. आयटीत करीअर करायचं हे पक्कं मनाशी ठरवलं. कित्येक जणांना भेटलो. कॉम्प्यूटर बेसिक्स शिकलो. पदवीचा अभ्यास होताच. पूर्वी आलेली निराशा साफ झटकून टाकली आणि पदव्यूत्तर कॉम्प्यूटर्स मास्टर्सला प्रवेश घेतला. त्यासाठी वडीलांनी एफ.डी. मोडली होती हे फार वर्षांनंतर कळलं. चांगले गुण मिळवायचे तर घरी कॉम्प्यूटर हवाच. त्यासाठी पैसे? ज्या दिवशी घरी कॉम्प्यूटर आला त्या दिवशी आई-बाबा कौतुकाने माझा आनंद न्याहाळत होते. पण त्या दिवसापासून बाबांचा गळा सुना दिसायला लागला? त्यांची सोन्याची चेन? मला जाणून घ्यायचं नाही. पण मला जाणीव आहे.
मास्टर्सनंतर जॉब शोधण्याची धडपड कित्येक तास रांगांमध्ये उभं रहाणं. एक रांग. ५००-६०० माणसं. ते किचकट फॉर्मस्. कुठल्यातरी अनोळखी माणसासमोर जाऊन इंटरव्ह्यू देत खच्ची होत घरी परतणं. सारं सवयीचं झालं. पण या सार्या अशाश्वत दुनियेत एकच गोष्ट प्रकर्षाने शाश्वतपणे स्मरत राहीली. स्फुरत राहीली. या सगळ्यांतून बाहेर पडायचंय आणि या विचारामागील सारी प्रेरणा माझ्या आईची!

आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. मी सॉफ्ट्वेअर-इंजिनिअर म्हणून एका मल्टिनॅशनल कंपनीत अपॉईंट झालो. सोपं काहीच नव्हतं. मी फ्रेशर म्हणून माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरने मला नितांत छळलं. रॅगींगच म्हणा. एकटा मी कंपनीमध्ये पहाटे ३-४ पर्यंत बसलेलो. मग काम संपलं की उठायचं, शिवाजीनगरच्या बस-स्टॅंडवरची भुर्जी-पाव खायचा. उद्या पुन्हा नेहमीच्या वेळेला कंपनी. माझ्या तुटपुंज्या अनुभवाकडे पहात मला खोडून काढणारी माणसं खूप भेटली. आत्मविश्वास खच्ची करून टाकणारे अनेक महाभाग! जवळ जवळ वर्षभर हेच. अन् एके दिवशी एका जपानी डेलिगेशनने माझ्या कंपनीमधल्या निवडक आठ जणांतून मला टोकीयोला जाण्यासाठी नियुक्त केलं. तो दिवस. तो क्षण. सार्या अणूरेणूत चैतन्य भरून राहीलयं असं वाटत राहिलं. निघतांना आई-बाबांच्या पाया पडलो. एकदम उमाळा असह्य झाला आणि डोळे पाणावले. ते काय होतं हे सांगण्यासाठी शब्द कशासाठी? विंदाच्या ओळी आठवल्या 'एक दिवस असा येईल, घाणीचेच खत होईल...'
माझा पहीला विमानप्रवास! पहीलं परदेशगमन! उराशी बाळगलेल्या स्वप्नांना मिळालेलं गाव! आज जग फिरतोय. परिस्थिती बदललीय. पण अजूनही दर वेळेस विमानात बसताना आठवतो तो पार्कींगचा कट्टा ज्यावरती बसून मी एक स्वप्न पाहिलं. अजूनही उंच आकाशात भरारी मारणारं विमान दिसलं की काळजात एक क्षण निखारा फुलतो. तो निखारा फुलवत ठेवण्याचं काम प्रामाणिकपणे आणि सार्या शक्तीनिशी करणं यालाचं आयुष्य म्हणतात? माझ्यासाठी तरी उत्तर 'हो' असचं आहे.
आकाशभरारी! बघायला गेलं तर हा एक शब्द! पण तो ही एकाच वेळेला आकाश व्यापून उरणारा आणि तरीही मातीशी ईमान राखणारा! एक शब्द जो मातीची नाळ न तोडता आकाशाशी नातं घट्ट जोडतो कारण विमानाला काय किंवा माणसाला काय, भरारी घेण्यासाठी आधी खूप धावावं लागतं. खूप धावावं लागतं!
---------------------------------
('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)