महंमद युसूफ अखेर निवृत्ती मागे घेण्यास तयार
यूएनआय
Sunday, July 18, 2010 AT 12:00 AM (IST)
कराची - पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून वारंवार आवाहन करण्यात आल्यानंतर अखेरीस पाकिस्तानचा माजी कर्णधार महंमद युसूफ याने निवृत्तीचा विचार सोडून पुन्हा पाककडून खेळण्यास संमती दर्शविली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनीच ही माहिती दिली.
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या अपयशाच्या गर्तेतून जात आहे. अनुभवी खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे त्यांचा संघ नव्याने उभारी घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यानंतर कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही निवृत्तीचा मार्ग पत्करला. या पार्श्वभूमीवर पाक क्रिकेट मंडळाने पुन्हा एकदा युसूफसमोर निवृत्ती मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
"दी न्यूज' दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी युसूफ पाकिस्तानसाठी उपलब्ध असेल. किमान इंग्लंडविरुद्ध तरी पाकिस्तान संघाची प्रतिष्ठा जपली जावी यासाठी पाक क्रिकेट मंडळाने युसूफला नव्याने विनंती केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केल्यानंतरही फलंदाजांना त्याचा फायदा उठवता आला नव्हता. त्यामुळे पाक क्रिकेट मंडळ चिंतेत होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यातील मानहानिकारक पराभवाचे खापर महंमद युसूफवर फोडून पाक मंडळाने त्याच्या अनिश्चित काळापर्यंत बंदी घातली होती. त्याचवेळी युसूफने कारवाईला आव्हान देण्याऐवजी निवृत्तीचा मार्ग पत्करला होता. आता पाकिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या शाहीद आफ्रिदीने तब्बल तिसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा केली. या वेळी मात्र पाक मंडळाने त्याचा निर्णय स्वीकारला असून, नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला आहे. संघाच्या कामगिरीविषयी बोलताना आफ्रिदीने पाक मंडळाने संघाला सावरण्यासाठी महंमद युसूफ किंवा युनूस खान यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला परत संघात स्थान द्यावे, अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे युसूफचे मन वळविण्यासाठी आफ्रिदीनेही प्रयत्न केल्याचे समजते.
निर्णय लांबणीवर
आफ्रिदीच्या निवृत्तीनंतर नवा कर्णधार नेमण्यासाठी पाक मंडळाची इंग्लंडमध्ये बैठक झाली. युनूस खान आणि महंमद युसूफ यांचा अनुभव विचारात घेऊन त्यांना संघात पाचारण करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला.