हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी परगत सिंग यांचा अर्ज
वृत्तसंस्था
Sunday, July 18, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार परगत सिंग यांनी शनिवारी "हॉकी इंडिया'च्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. अनेक अडथळ्याच्या शर्यती पार करून 28 जुलै रोजी हॉकी इंडियाची निवडणूक होईल.
सध्या भारतीय हॉकीची स्थिती अत्यंत खराब असून, गेलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्यामुळेच आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याचे परगत सिंग यांनी सांगितले. परगत सिंग यांच्याबरोबर कर्नाटक हॉकी संघटनेचे सचिव कृष्णमूर्ती यांनी सचिव, अरुणाचल प्रदेशाच्या गुम झून यांनी खजिनदारपदासाठी अर्ज भरला. यापैकी आपल्याबरोबर कोण असल्याचे हे मात्र सांगण्यास परगत यांनी नकार दिला.
हॉकी इंडियाच्या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करण्याचा अजून विचार नसल्याचे स्पष्ट करून परगत म्हणाले, ""अजून काहीच चित्र स्पष्ट झालेले नाही. अजूनही काही व्यक्तींच्या वैधतेविषयी न्यायालयीन लढाई चालू आहे. त्यामुळे पॅनेलविषयी अगदी अखेरच्या क्षणी विचार करू.'' हॉकी खेळाच्या प्रसाराविषयी बोलताना परगत म्हणाले, ""हॉकीचा प्रसार हे एकट्याचे काम नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. मी कदाचित अध्यक्ष बनणारही नाही; पण म्हणून हॉकीच्या प्रसारासाठी जबाबदारी निश्चित झटकणार नाही. सर्वांच्या बरोबरीने काम करत राहणार.''
...