Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बाभळीच्या पाण्यावर राजकारणाचा तवंग
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Tuesday, July 20, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली -  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी आज कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन बाभळी धरणाचा मुद्दा व त्यावरून निर्माण झालेल्या तणावाची त्यांना माहिती दिली. या संदर्भात श्रीमती गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या विषयावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना केल्याचे समजते.

कॉंग्रेसचे सरकार असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचा उपक्रम श्रीमती गांधी यांच्याकडून सध्या सुरू आहे. आंध्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी वीरप्पा मोईली आणि रोसय्या हे या बैठकीत उपस्थित होते. आंध्रासंबंधीच्या चर्चेनंतर रोसय्या यांनी श्रीमती गांधींकडे महाराष्ट्रातील बाभळी धरणाचा उल्लेख केला. आंध्राचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू यांनी महाराष्ट्रात जाऊन केलेल्या आंदोलनाची माहितीही त्यांनी श्रीमती गांधी यांना दिली. यावर श्रीमती गांधी यांनी चव्हाण यांच्याशी तत्काळ संपर्क साधून या विषयाबाबत माहिती विचारली. चव्हाण यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्याच्या निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांना सांगितले. परंतु श्रीमती गांधी यांनी नायडू प्रकरणातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना केल्याचे समजले. याप्रश्‍नी कदाचित चव्हाण यांनी मुंबईत मंत्रिमंडळातील प्रमुख व वरिष्ठ मंत्री सहकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्‍यता असल्याचे समजले.

दरम्यान, बाभळीच्या मुद्‌द्‌यावरून महाराष्ट्र-आंध्र सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी दोन्ही राज्यांना सबुरीचा व तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

चंद्राबाबूंचे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली होती, तर चंद्राबाबूंवर रोसय्या यांनीही टीका केली आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद म्हणाले, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे अवघड आहे. मात्र, निर्माण झालेला तणाव कमी करण्याठी दोन्ही राज्यांनी एकत्र यावे, असा सल्लाही कॉंग्रेस प्रवक्‍त्याने दिला.

राजकीय स्वार्थासाठी आंदोलन
चंद्राबाबू बाभळी धरणाच्या मुद्याचा राजकीय लाभ उठवू इच्छित आहेत, अशी टीका वीरप्पा मोईली यांनी येथे केली. मात्र, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबतही मतप्रदर्शनास नकार दिला.

आंध्रासाठी व तेथील कॉंग्रेससह सर्व राजकीय पक्षांसाठी बाभळी धरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. रोसय्या यांनी आंध्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी 23 जुलैचा दिवस तात्पुरता निश्‍चितही करण्यात आला होता. या संदर्भात रोसय्या स्वतः नायडू यांच्याशी बोलले होते. परंतु त्याची वाट न पाहता नायडू यांनी परस्पर यात्रा काढली. तेलंगणातील 12 जागांसाठी पोटनिवडणुका असल्याने त्यांची कृती ही शुद्ध राजकीय हेतूने आहे हे कोणाच्याही लक्षात येईल, असेही मोईली यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा नव्याने तोंड फुटले आहे. बेळगावसह कर्नाटकातील 835 मराठी भाषिक गावे या वादाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित करावीत, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. त्या संदर्भात विचारणा केली असता मोईली यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्याबाबत मतप्रदर्शन करणे उचित होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 
Follow
Us on
Twitter

प्रतिक्रिया
On 7/20/2010 11:15 AM Sandy said:
ह्यापेक्षा इंग्रज राजवट चांगली होती का?
On 7/20/2010 11:06 AM sharad raut said:
उत्तर आणि दक्षानेतील राज्य मराठी जनता व महारास्त्राची सहश्नुताची गैरफायदा घेत आहेत दुसरे काय!
On 7/20/2010 9:31 AM rb said:
कुठेचालला आहे भारत? 1)उत्तरेकडे काश्मीर पेटलाय2)पश्शिमेकडे महारष्ट्र-कर्नाटकाबोर्डर प्रश्न पेटलाय३)दक्षिणेकडे तेलंगाना प्रश्न आहेच ४)पूर्वेकडे बांगलादेशी गुस्खोरी, माओवादी प्रश्न आहेत ५)मध्य भारतात नक्षलवाद चालू आहे.ह्या सर्वगंभीर प्रश्ना बरोबर सीमावाद,भाषावाद , धर्मवाद फोफावतआहे. गरिबी,महागाई,भ्रष्टाचार,देशद्रोह वाढत आहे.सर्व शेजारी देशांची आपले वाईट संबंध आहेत.देशालावाहूनघेणार नेते किवाजनता कुठे राहिलेआहेत? हेसर्व पाहून असे वाटतेदेशहाविघटनहोण्याच्यादिशेनवाटचाल करत आहे.तुम्हाला कायवाटते?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: