हॉकी इंडियाची निवडणूक पुन्हा वादात
-
Tuesday, July 20, 2010 AT 12:00 AM (IST)
वय आणि कालमर्यादा स्पष्ट करण्याचे क्रीडा मंत्रालयाचे आदेश
नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पुन्हा एकदा संघटकांच्या वय आणि काल मर्यादा स्पष्ट करण्याचे आदेश दिल्यामुळे 28 जुलैस होणारी "हॉकी इंडिया'ची निवडणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आली आहे.
अनेकदा विविध कारणाने पुढे ढकलण्यात आलेल्या "हॉकी इंडिया'च्या निवडणुकीला एकदाचा मुहूर्त लागला होता. मात्र, क्रीडा मंत्रालयाने आज स्पष्ट केलेल्या भूमिकेने या निवडणुकीवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. कारण, सध्याच्या हंगामी समितीचे सचिव नरेंद्र बत्रा यांनी सरकारचा आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला.
निवडणुकीसाठी सरकारी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या एस. के. मेंडिरत्ता यांनी वय आणि काल मर्यादा स्पष्ट असणे आवश्यक असल्याचे निवडणूक अधिकारी निवृत्त न्यायाधीश आर. सी. चोपडा यांना पत्राद्वारे कळविले आहे. हा निर्णय अमलात आणण्यात आल्यास अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्या स्टोक्स यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागेल.
हॉकी इंडिया ठाम
सरकारचा आदेश न पाळण्याचा विडाच हॉकी इंडियाने उचलला आहे. हंगामी समितीचे सविच नरेंद्र बत्रा म्हणाले, ""हॉकी इंडियाची स्थापना ही नोंदणीकृत संस्था म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक त्यांच्या नियमानुसार होणार. सरकारी आदेश आम्हाला बंधनकारक नाही. त्यामुळे स्टोक्स आणि परगटसिंग यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणारच.''
या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडून कुठलेच पत्रा आम्हाला मिळाले नसून, ते मिळाल्यानंतर आम्ही आमची निश्चित भूमिका करू, असे सांगन बत्रा म्हणाले, ""त्यानंतरही निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट आल्यास आम्ही न्यायालयाचा रस्ता धरू.''