राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची "गळती' कायम
-
Wednesday, July 21, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची "गळती' कायम राहिली असून, मंगळवारी यात ब्रिटनची ऑलिंपिक आणि विश्वविजेती धावपटू व्हिक्टोरिया पेंडलटेन हिची भर पडली.
याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या कालावधीतच युरोपियन स्पर्धा होत असल्याने तिने आपला सहकारी ख्रिस हॉय याच्याप्रमाणे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली. ती म्हणाली,""राष्ट्रकुल स्पर्धेला ऑलिंपिक पात्रतेचा दर्जा नाही. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेचे निकष पार करण्यासाठी युरोपियन स्पर्धेत उतरणे मला महत्त्वाचे वाटते.'' व्हिक्टोरियाने चार वर्षांपूर्वी मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
ब्रिटनची 29 वर्षीय चॅंपियन सायकलपटू व्हिक्टोरिया म्हणाली, ""राष्ट्रकुल स्पर्धेचा आम्ही आदर करतो; पण शेवटी ऑलिंपिक स्पर्धेला कधीही महत्त्वाचे स्थान असते. त्याचबरोबर एकाच वेळी दोन स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे मी युरोपियन स्पर्धेला अधिक महत्त्व दिले.''
दोनच दिवसांपूर्वी भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी अव्वल खेळाडूंच्या माघारीच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली होती. ""आम्हाला दर्जेदार स्टेडियमबरोबर दर्जेदार खेळाडूही हवे आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेला ऑलिंपिक पात्रतेचा दर्जा नसल्याचे ऐकून आश्चर्य वाटले.'' गिल यांनी या संदर्भात राष्ट्रकल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांच्याशी चर्चा करण्याचीही तयारीही दर्शविली होती. मात्र, अजून या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही.
दरम्यान, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी मात्र अव्वल खेळाडूंच्या माघारीचा स्पर्धेवर काही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "एखाद दुसऱ्या खेळाडूच्या माघारीमुळे स्पर्धेवर परिणाम होत नसतो. अन्य खेळाडूही दर्जेदार आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे ही स्पर्धा संस्मरणीय ठरेल.''