Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चंद्रभागेस भक्तीचा महापूर (व्हिडिओ)
-
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)

विनोद कामतकर - सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर - झळझळीत सोमकळा।कळस दिसतो सोज्वळा।। चंद्रभागेत स्नान, वाळवंटात रंगलेल्या दिंड्यांच्या हजेऱ्या आणि कळसाचे मनोभावे दर्शन घेऊन लाखो वैष्णवांनी "देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो' असा भाव मनी बाळगत आज विठुरायाच्या चरणी आपली आषाढी वारी समर्पित केली. वैष्णवांनी स्नानासाठी केलेल्या गर्दीने चंद्रभागेला जणू भक्तीचा महापूर आला होता.

संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराजांसह सर्व संतांच्या पालख्या काल रात्री पंढरीत दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत प्रवचन, हरिपाठ, कीर्तने, भजन आदी कार्यक्रमांनी पंढरी भक्तिरसात चिंब झाली होती. आज पहाटे साडेतीनपासून वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केली. पायी वारी केल्यानंतर चंद्रभागेत स्नान करण्याचा अलिखित नियम वारकरी मोडीत नाहीत. जसजशी सकाळ होत गेली, तसतशी गर्दी वाढत गेली. स्नानानंतर पुंडलिकाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. दर्शनाची रांगही गोपाळपूरच्या पुढे गेली होती. चंद्रभागेला मुबलक पाणी असल्याने भाविकांची चांगली सोय झाली. वाळवंटात उभारण्यात आलेल्या राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन सुरू होते. काही वारकरी होडीत बसून वारकरी पैलतीरावर जात होते. स्नानानंतर नदीकाठी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत होते.

'धरितां पंढरीची वाट, पापे पळाली सपाट,
कळस देखतां नयनी, होय पातकांची धुणी' या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज कळस दर्शन केले. पायी वारी करीत आलेल्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल कळसावर असतो, अशा भावनेतून वारकऱ्यांनी एकादशीला कळसाचे दर्शन घेतले. गावागावातून आलेल्या दिंड्यांनी मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गावरून दर्शन फेरी पूर्ण केली. प्रदक्षिणेदरम्यान पालखी चौपाळ्याजवळ आली. तेथून दिसणाऱ्या सोनेरी कळसाला हात जोडून वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या चरणदर्शनाचा आनंद घेतला. या चौकात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. "झळझळीत सोनकळा, कळस दिसतो सोज्वळा' हा अभंग म्हणत आपली वारी जणू विठुरायाचरणी रुजू केली.

सकाळी पडलेल्या उन्हातही "विठ्ठलमय' झालेले अवघे वैष्णव प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंद्रभागा स्नान, कळस दर्शन, प्रदक्षिणा केलेल्या वैष्णवांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. दुपारी बाराच्या दरम्यान पावसाला सुरवात झाल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला अधिकच उधाण आले.
"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' चा गजर करीत वैष्णवांच्या मेळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केली. दर्शनानंतर खरेदीसाठी वारकऱ्यांचे जथ्थे बाजारपेठेत दाखल झाले. काहींनी शहरातील मठ, मंदिर पाहण्यासाठी गर्दी केली. सायंकाळी विठ्ठलाची रथ मिरवणूक काढण्यात आली. रथामध्ये ठेवण्यात विठ्ठलासह राही व रुक्‍मिणी मातेच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. रथाचे दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठलभक्तांनी रस्तादुतर्फा गर्दी केली.

उद्धव ठाकरेंनी केले हेलिकॉप्टरमधून छायाचित्रण
शिवसेनेचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी दहाच्या दरम्यान मंदिर परिसराचे हेलिकॉप्टरमधून छायाचित्र काढले. प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागेत स्नानासाठी झालेल्या वारकऱ्यांच्या गर्दीचे अनेक छायाचित्र त्यांनी टिपले. मंदिर परिसरातून उडणारे हेलिकॉप्टर वारकरी कुतूहलाने पाहत होते. छायाचित्र टिपणारे ठाकरे वारकऱ्यांना सहज दिसत होते.

वारकऱ्यांचा आजचा वाढला मुक्काम
दरवर्षी विठुरायाच्या दर्शनानंतर दुपारपासून वारकरी परतीच्या प्रवासाला लागतात. वारकऱ्यांचे पंढरपूर हे माहेरघर मानण्यात येते. माहेरवासीण बुधवारी माहेर सोडत नाही, अशी परंपरा आहे. बुधवार पांडुरंगाचा वार असून त्याच दिवशी मोठी एकादशी आल्याने काही वारकरी पंढरीत थांबले.
प्रतिक्रिया
On 7/22/2010 9:03 AM shailu said:
पुंडलिक वर देव हरी विठ्ठल...श्री ज्ञानदेव तुकाराम..
On 7/22/2010 7:23 AM sanjeevan said:
देवाने रस्ते साफ करणेसाठी बुद्धी द्यावी परतीचा प्रवास नाम घेत रस्ते साफ करत करावा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: