Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आकाशभरारी...भारत करडक
भारत करडक (ऑस्ट्रेलिया) bharat78@gmail.com
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)
आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...


माझे नाव भारत गंगाधर करडक. मु. पो. करडकवाडी (मुकिंदपुर), ता-नेवासा, जि- अहमदनगर.  वडिल रयत शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक असल्याने शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील अनेक खेडेगावांमधील शाळांमध्ये झाले. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी येथे पदवी अन् बोरावके महाविद्यालयात रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी) घेतली. सुरुवातीला पुणे आणि जालना इथे चाटे कोचिंग क्लासेसमध्ये चार महिने अन नंतर पुण्यात एका छोट्या रसायन कंपनीत दोन महिने नोकरी केली आणि मग जगप्रसिद्ध 'सिप्ला' (Cipla) कंपनीत फेब्रुवारी २००१ मध्ये दाखल झालो. येथे डॉ. सतीश गौड याच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अन विकास विभागामध्ये काम करु लागलो. डॉ. गौड सरांनी माझ्या कामावर खुष होऊन मला कंपनीत बढती दिली, पण त्याचवेळी मोठ्या पदावर जायचे अस्ले तर पीएचडी पूर्ण करणे किती गरजेचे आहे हे ही समजावले. त्यांनी नेहमीच पीएचडी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी पी.एच.डी. साठी अर्ज कसे करावेत, कुठे करावेत, माहिती कुठे मिळेत अशी खुपच महत्वाची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे, मग सुटीच्या दिवशी आय.आय.टी. पवईच्या केंद्रीय वाचनालयामध्ये दिवस दिवस बसून संशोधन क्षेत्रातील सध्याचे संशोधन, संशोधक अन त्यांचे संपर्काची माहिती मिळवणे सुरु झाले.

ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने येथील सर्वच विद्यार्थ्यांप्रमाणे एम एस्सी नंतर एक नोकरी मिळवणे, हेच एकमेव लक्ष्य समोर ठेवले जाते. शहरी भागात विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे माहितीचे स्त्रोत उपलब्ध असतात, परदेशातील उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी जितक्या सहजतेने उपलब्ध होतात, तितक्या ग्रामीण भागात आजही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना/विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाणे आजही अशक्य वाटते. पंचक्रोशीत एखाद-दुसरे असे उदाहरण आढळून येते.

अखेर जुलै २००२ मध्ये मला स्पेनमधील बास्क प्रदेशाचे विद्यापीठ, सॅन सेबास्टीयन येथे प्रवेश मिळाला. परंतू आता अडचण मोठी होती. नोकरीमध्ये दीड वर्षे झाल्यानंतर वडिल पुन्हा शिक्षणासाठी नोकरी सोडायला नकार देत होते. कुटुंबातील आणि पूर्ण गावातील इतर कुणीही यापूर्वी परदेशी शिक्षणासाठी गेलेले नसल्याने या 'प्रकारावर' कुटुंबातील अनेकाचा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे नोकरी सोडून परदेशी जाण्याला सर्वांचा विरोधच झाला. परंतु माझा निश्चय पक्का झालेलाच होता. दुसरी अडचण होती ती पैशाची. नोकरीतील बरेचसे पैसे पीएचडी अर्ज करण्यासाठीच खर्च झाल्याने जवळ शिल्लक अशी नव्हतीच. त्यावेळी पनवेलला एक तास इंटरनेटचा दर चाळीस रुपये इतका होता. अर्ज केवळ इंटरनेटवरुनच पाठवले जाऊ शकत होते. अनेकदा इंटरनेट स्पीड इतका कमी असे की एका तासात एखादाच मेल पाठवला जाऊ शकत असे! म्हणून मग पुण्याला जाऊन दिवसभर नेट कॅफेमध्ये बसून अर्ज पाठवायला लागत असे. रविवारी सकाळी सहाला पनवेलहुन निघायचे, सहकारनगरला दिवसभर सायबर कॅफेमध्ये बसायचे आणि संध्याकाळी पुन्हा पनवेल! दुसर्‍या दिवशी कामावर हजर...असे तब्बल एक वर्षे चालले. त्यामुळे व्हिसा, विमानप्रवास यांना पैसे आणायचे कुठून?, हा प्रश्न उभा राहिला...! त्याबद्दल मी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असेलेले माझे मित्र संजय म्हस्के आणि मनोहर सुर्वे ह्यांना बोललो. दुसर्‍या दिवशी सुर्वे साहेबांनी पंचवीस हजारांची रोकड माझ्या हाती दिली. म्हस्के साहेबांनी दहा हजारांची रक्कम दिली....त्यातूनच व्हिसाची फी अन् विमान तिकिटाचे पैसे भागले.

व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीला जावे लागले. स्पेनची मुंबई मधील वकीलात विसाची कामे करत नाही. दिल्लीत प्रथमच जाणे, तिथे जवळपास एक महिना राहाणे आणि व्हिसासाठी स्पॅनिश वकिलातीच्या चकरा मारणे हे मोठे दिव्यच होते. पण तत्कालीन अवजड उद्योग मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांचे दिल्ली येथील कार्यालय आणि त्यांचे तत्कालीन सचिव अविनाश ढाकणे यांच्या सहकार्यामुळे दिल्लीतील कामांना खूपच मदत झाली. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच गेलेलो असताना, राहण्याचा ठिकाणा नसताना, महाराष्ट्र सदनात 'चिठ्ठी' शिवाय जागा मिळू शकत नसताना, अक्षरशः रडकुंडीला आलेलो मी, जेव्हा उद्योग मंत्रालयात कुठलीही ओळख नसूनही श्री. ढाकणे यांना भेटलो, तेव्हा आवश्यक त्या सर्व मदतीसाठीचे आश्वासक शब्द मला खुपच धीर देऊन गेले..!

एक महिन्याच्या प्रयत्नांनंतर मला व्हिसा मिळाला. कुटुंबात आणि बहुतेक मित्र परिवारात पहिलाच पासपोर्टधारक असल्याने व्हिसा ही खूपच मोठी लढाई होती! एक वेळ तर, कागदपत्रांच्या जंजाळात अडकल्याने 'नको ते परदेशी शिक्षण' असा विचार करत दिल्लीच्या रायसीना हिल अर्थात संसद भवन परिसरात फिरत असायचो!
 
त्यानंतर मुळ गावी येउन स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, शाखा नेवासा इथे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला. ही प्रक्रिया खूपच किचकट आहे. पंधरा दिवस, दिवस अन् रात्र, योग्य कागदपत्रे, त्यावर योग्य ते अटेस्टेशनचे शिक्के, इतर कुठल्याही बँकेचे कर्ज नाही असे ना हरकत प्रमाणपत्र (नेवासा शहरात चार बँका वगळता २० पतसंस्था आहेत, हे प्रथमच कळाले!) अशी कागदपत्रे जमा केली. ३० सप्टेंबरला मला स्पेनला जायचे होते. पण २२ सप्टेंबरला शेवटी विमा पॉलीसी, मुंबईला जाऊन 'नोंदवून' या असे बँक मॅनेजरनी फर्मान सोडताच, मी तर कर्ज मिळण्याचे आशाच सोडून दिली...शेवटी बँकेच्या साहेबांनी इतर कागदपत्रे पूर्ण असल्याने, विमा पोलीसी नंतर नोंदवून दिली तरी चालेल असा शेरा मारुन कर्ज रक्कम माझ्या खात्यावर जमा केली. मग २५ सप्टेंबरला मुंबईला विमा पॉलीसी नोंदवली.

शेवटच्या दोन दिवसांत आवश्यक ते कपडे/वस्तू यांची खरेदी झाली. आणि ३० सप्टेंबर २००२ ला रात्री दोन वाजता विमानाने मुंबई विमानतळाहुन इटलीतील मिलानमार्गे स्पेनमधील बार्सिलोनाकडे प्रयाण केले! १ ऑक्टोबरला मी स्पेनमधील सॅन सेबास्टीयन शहरात पोहचलो. तिथे माझे पीएचडीचे
प्राध्यापक विमानतळावर घ्यायला आले होते. संध्याकाळी नऊ वाजता होस्टेलवर पोहचलो. तिथे माझी स्वतंत्र खोली आणि वरच्या मजल्यावर असलेले एकत्रीत स्वयंपाकघर दाखवले. पहिल्यांदाच युरोपात आल्याने आणि भारतीय विद्यार्थी जीवनामध्ये 'जेवण बनवणे' कधीच घडलेले नसल्याने मी स्वयंपाकघराकडे लक्ष दिले नाही! पण याच स्वयंपाकघरात नंतर मात्र कित्येक तास 'प्रयोग' करावे लागले. सुरुवातीची फेलोशिप तुटपुंजी असल्याने दोन वेळ कॅन्टीनचे जेवण परवडत नव्हते. त्यामुळे दुपारी कॅन्टीन आणि संध्याकाळी भाजलेले-जाळलेलेच्या सीमारेषेवरील खिचडीचे प्रकार खाल्ले जात! अनेकदा दुध, फळे, ब्रेड, अंडी यांवरच समाधान मानावे लागे. संशोधनासाठी/ अभ्यासासाठी द्यावा लागणारा वेळ आणि खाण्याची आबाळ यांचा योग्य परिणाम पुढील चार वर्षे तब्येतीवर होत राहिलाच! स्पेनमधील युरोपीयन विद्यार्थी मात्र अंमळ स्वावलंबी होते. खाण्याच्या पद्धती अन् प्रकार वेगळे असल्याने २० मिनिटांपेक्षा जास्त काळ ही मुले स्वयंपाकघरात थांबत नसत. मी मात्र दोन-तीन तास भांडी आणि गॅसशी कबड्डी खेळत असे!

युरोपातील विद्यापीठ खुपच समृद्ध वाटले. पुस्तके, प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे, नवीन केमीकल्स आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, ती उपकरणे, पुस्तके आणि केमीकल्स नवीन, अगदी बी.एस.सीच्या मुलांना देखील वापरण्याचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन! याउलट, भारतात तेव्हा आणि आज २०१० साली देखील नवीन केमीकल्स, उपकरणे आणि पुस्तके ही केवळ 'दाखवायला' ठेवली जातात. विद्यार्थ्यांना वापरणे खूप दूर, अनेक शिक्षक/प्राध्यापकांना ही ती पाहायला/हाताळायला मिळत नाहीत. यामागे कदाचीत युरोपातील साधनांची उपलब्धता आणि हाताळणार्‍यांची कमतरता हा भाग आहे. तोच मोठा फरक भारत आणि युरोपमध्ये जाणवला.

मी Organic chemistry---Asymmetric synthesis या विषयावर पीएचडी केली आहे!

या विषयाचा आपल्या दैनंदिन जीवनात प्रचंड वापर होतो. साधे उदाहरण द्यायचे तर दोन जण जेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन करतात, तेव्हा ते आपआपला उजवा हात समोरच्या हातात देतात. पण समजा त्या पैकी एक डावखुरा आहे...! काय गंमत होते ते बघा...तो चुकून त्याचा डावा हात पुढे करतो....!! आणि मग mis-match होते!

उपलब्ध वा आपल्याला माहीती असलेल्या organic molecules पैकी बहुतेक molecules हे असे डावे किंवा उजवे असतात. महत्वाचे म्हणजे की आपल्या शरीरातील Amino acids, carbohydrates / Sugars हे पण एका अर्थी असेच एक कल्ली असतात. म्हणजे सगळे amino acids हे L- म्हणजे उजवे तर sugars या D- म्हणजे डावर्‍या असतात. त्यामुळे एखादे नविन रसायन जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा ते जर डावे वा उजवे असेल त्या नुसार ते amino acid वा sugar शी react होते.

दुसरे उदा. म्हणजे लिंबू! लिंबामध्ये असलेले molecule आणि सन्त्र्यामध्ये असलेले molecule हे एकच organic molecule चे डावे वा उजवे रुप आहेत. त्यामुळे मुळ molecule जरी Limonine हे असले तरी, त्यांचे दोन वेग-वेगळे वास आणि चव असतात.

या शास्त्राचा म्हणजेच chirality- the greek word which means Handedness , चा शोध मानवाला १८१५ म्ध्ये लागला होता, पण त्याचा सामान्य माणसाला जबरदस्त भयानक अनुभव मात्र १९५०-१९६० ला आला. झाले असे की, अमेरिका आणि युरोपामध्ये गरोदर स्त्रियांना दिले जाणारे एक औषध, ज्याचे नाव Thalidomide (http://en.wikipedia.org/wiki/Thalidomide) होते, त्याचे असे डावे आणि उजवे असे दोन प्रकार होते. परंतु ते विकताना डावे आणि उजवे अशा मिश्र स्वरुपात विकले जाई. त्या perticular औषधाचे आपल्या शरीरामधील रसायनांमुळे डाव्या चे उजव्यात वा vice versa रुपांतर होणे खूप शक्य असते, त्यामुळे ते वेगळे करता येत नाहीत. या औषधाने गरोदर स्त्रियांच्या morning sickness वर इलाज केला जाई. पण जेव्हा हे औषध दिले गेलेल्या स्त्रिया अधू-अपंग आणि व्यंग असलेल्या बाळांना जन्म देउ लागल्या, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. एकूण १०,००० अपंग बाळं जन्माला आली. कित्येक हजार जन्मण्यापूर्वीच जग सोडून गेली.

त्यानंतरही मेडिकल क्षेत्रात अशी अनेक औषधे आली कि जी डावे अन उजवे ह्या दोन प्रकारात असल्याने, पेशंटना त्रास झाला. उदा. सेलाडेन नावाच्या anti-histamine ड्रगने काही पेशंटना heart disease झाले आणि ते प्राण गमावून बसले.

यामुळे जगभरातील drug administrations नी अशा डावे आणि उजवे असणार्‍या औषधांच्या दोन्ही रुपातील biological activity तपासण्याचे बंधन कंपन्यांवर टाकले, जेणे करुन आपल्याला फक्त उपयुक्त असणाराच molecule बाजारात विकला जाईल. सध्या पूर्ण बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपैकी ३० टक्के हे अशा फक्त एकाच प्रकारच्या molecules असतात. बाकीच्यांचे दोन्ही पण प्रकारातील biological acticity माहिती असते.

असे एकाच प्रकारचे म्हणजे केवळ डावे वा केवळ उजवे molecule बनवणे हे कष्टप्रद असते! ते अनेक प्रकारे साध्य केले जाऊ शकते.
१) नैसर्गिकरित्या उपलब्ध डाव्या वा उजव्या molecule पासून आपल्याला हवा तो औषधी molecule मिळवणे.
२) डाव्या अन् उजव्याच्या मिश्रणातून ते वेगवेगळे करणे...हे जिकरीचे असते.
२) अशी एक methodology बनवणे की जिथे एक symmetrical precursor पासून फक्त डावा वा फक्त उजवा असा molecule बनवणे....मी या तिसर्‍या भागात काम करतो.!

दैनंदिन जीवनामध्ये स्पेनमधील अडचणी या अमेरिका/इंग्लंड/कॅनडा/ऑस्ट्रेलिया या इंग्रजी भाषक देशांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहेत. सर्वात मोठा अडसर आहे तो भाषेचा. इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यानेच स्पेन देशाबद्दल इतर जग अनभिज्ञ आहे. चांगली लोक, भारतीयांप्रमाणेच कुटुंबव्यवस्थेवर विश्वास असणारी समाजव्यवस्था मुलभुत संशोधनामधील चांगली कामे, याबद्दल जगाला फारशी माहिती नाहीच. मी जेव्हा एक वर्षांनंतर भारतात परत येत होतो, तेव्हा एका विमानतळ अधिकार्‍याने स्पेनला शिकायला जाणारा तू पहिलाच विद्यार्थी भेटलास, असे बोलून दाखवले. बार्सीलोना आणि माद्रीद येथे काही भारतीय विद्यार्थी आहेत, पण इतर इंग्रजी भाषक देशांच्या मानाने अगदीच कमी...सॅन सेबास्टीयन या साठ हजार लोकसंख्येच्या गावात मी एकमेव भारतीय होतो. २००८ ला पुन्हा काही कामासाठी तिथे जाणे झाले तेव्हा तिथे अजून पाच नवीन विद्यार्थी आल्याचे कळले. आता तिथे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय हे पाहून आनंद वाटला.

त्यामुळे इथे प्रथम स्पॅनिश भाषा शिकावी लागली. तीन महिने अजिबात इंग्रजी न येणार्‍या एका शिक्षिकेने आम्हा सात विद्यार्थ्यांना बर्‍यापैकी बोलता येईल, अशी स्पॅनिश शिकवली! विद्यापीठात काम करित असताना सर्वांनाच इंग्रजी येत असल्याने फारशी अडचण येत नसे, पण दुकाने, बस, नवीन घर शोधताना येणार्‍या अडचणी, प्रवासात भेटणारी स्पॅनिश लोकं, स्पॅनिश लोकजीवनात असणारे महत्वाचे सण-उत्सव यांत सहभागी होण्यासाठी स्पॅनिश भाषा येणे खूपच गरजेचे आहे. स्पॅनिश भाषा शिकल्यानंतर मात्र स्पॅनिश जीवन समरसून जगता आले. स्पॅनिश लोकनृत्य, संगीत, बैलांच्या झुंजी, स्पेनमधील अनेक शहरांतील प्रवास हा प्रचंड माहितीचा खनिजा मला मिळाला. स्पेनबरोबरच फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रीया, इटली या देशांना भेटी देता आल्या. पाश्चात्य जीवनमान, तेथील सामान्य जनतेला उपलब्ध सोयी सुविधा, राहनीमानाचा दर्जा याबद्दल खूपच चांगली माहिती मिळाली.

स्पेन आणि पाश्चात्य जगात, दुसर्‍या व्यक्तीला त्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा एक माणूस म्हणून दिली जाणारी समतेची वागणूक प्रकर्षाने जाणवते. माणसाच्या प्रगतीचा वेग कमी असला तरी त्याची हेटाळणी केली जात नाही. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अत्यंत जबाबदारीने वागणे, देशाप्रती आपली कर्तव्ये चोख बजावणे, पर्यावरण रक्षण आणि पुढील पिढीला समृद्ध वारसा हस्तांतरीत करणे या गोष्टी ते कटाक्षाने पाळतात! पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आमच्या रिसर्च ग्रुपमध्ये आम्ही सात देशांतील एकूण २० जण होतो. सर्व जण एकाच होस्टेलला राहत असू. एकत्र लॅबला जाणे-येणे, वीकेंडला फिरणे, यश-अपयश एकत्र साजरे करणे यामुळे चार वर्षे कशी निघून गेली कळले ही नाही! अनेक देशाचे नवे मित्र मिळाले. जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये संशोधनाचे निबंध प्रसिद्ध झाले...आणि चार वर्षानंतर पीएचडी पूर्ण करुन भारतात परत आलो.

भारतातील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यावर काही कारणास्तव पुन्हा परदेशात जावे लागले. आता जुन २००९ पासुन मी सहकुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये आलेलो आहे. येथील वास्त्व्य स्पेनच्या मानाने खूपच सोयीचे आहे. कारण इथे भरपूर भारतीय आहेत आणि येथील यंत्रणा ही परदेशी लोकांनी/विद्यार्थ्यांनी/कामगारांनी येऊन स्थायिक व्हावे यासाठी मदत करणारी आहे.

गेली पाच-सहा वर्षे परदेशात राहिल्यानंतर मनात असलेली खंत म्हणजे निसर्गाचे वरदान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा असूनही आपले देशबांधव 'एकी'च्या अभावामुळे पाश्चात्यांपेक्षा कमी दर्जाच्या सोयी सुविधा अनुभवतात. शिक्षण, संशोधन, क्रीडा, शेती, आरोग्य यांचा आलेख दर्शवणारा मानवी विकासाचा निर्देशक पाहिला असता ही बाब प्रकर्षाने जाणवते. यामध्ये येथून पुढे बदल घडवण्यासाठीच सुशिक्षित भारतीय युवकांचे संघटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.  (www.kardakwadi.org -Live from July 15)

('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)
प्रतिक्रिया
On 9/17/2010 9:09 AM B.B. TUPE said:
छान! जिथे इच्छा तिथे मार्ग, अभिनंदन!! I i am interested in your project. I am from Pathardi & wish to join your group. Please send me details on my mob 9049787209
On 8/21/2010 8:18 PM vicky said:
तुमच्या जिद्दीचा तसेच कामाचा अभिमान वाटतो .
On 8/13/2010 10:44 PM sanjay dahatonde (newasakar) said:
Dr.bharat abhiman watato tumacha newasahaa matit hira janmala, khup motthe va newasa talukachy vatine hardik subhecha
On 7/30/2010 10:55 AM vivek shinde said:
भारत भाऊ, खूप खूप आनंद झाला वाचून . मनपूर्वक अभीनंदन
On 29/07/2010 10:16 AM bharat Kardak said:
धन्यवाद मित्रहो. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नक्कीच बळ देतात अन असे मित्र लाभले म्हणूनच इथवर येऊ शकलो. @ ओर्गानिक... इंग्रजी भाषा येणे हा गुणवतत्तेचा निकष असू नये. स्पेन च्या पंतप्रधानाना देखील इंग्रजी येत नाही. ते नेहमी 'दुभाषा' वापरतात. जो विद्यार्थी ज्या क्षेत्रात अभ्यास करतो आहे, त्याच क्षेत्रात त्याने ज्ञान मिळवावे. म्हणूनच मातृभाषेत शिक्षण घेणे अतिशय उत्तम. इंग्रजी येणे हा एक 'जास्तीचा गुण असावा, इतकेच. स्पेन मध्ये हे खूप जवळून अनुभवता आले. माझे स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमातच झालेले.
On 7/28/2010 2:23 PM Prasad Kamat said:
खूप मोठा हो मीत्रा, हीच मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना.
On 7/28/2010 4:08 AM Pankaj Dhepe said:
चांगला वाटते जेवा आपला मित्र अशी भरारी मारतो. अभिनंदन.
On 7/27/2010 8:17 PM navnath said:
SIR..खरोखर मला तुमचा आदर्श घेऊन पुढे जाएचे आहे.तुम्ही ग्रेअत आहात सर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 7/27/2010 6:59 PM sudheer pawade said:
बेस्ट अंड congrates
On 7/27/2010 6:27 PM Jalindar said:
Inspiring story, thanks for sharing it. I hope that by reading this few of up cpmeers will be inspired/encouraged to go for advanced studies abroad.
On 7/24/2010 6:39 PM pallavi said:
agadi muddesud lekh लिहिला आहे. tumchya blog war jarur wachu , bharat mahan karnyasathi shubhechcha.
On 7/24/2010 3:33 PM Parikshit said:
अभिनंदन भारत,तुझ्या मताशी मी सहमत आहे. तू भारतात आल्यावर भेटण्याची इच्छा आहे.
On 24-07-2010 10:34 गुंडोपंत said:
वा! काय प्रेरणादाई लेख आहे. आम्हाला अशा प्रयत्नांचीच गरज आहे. मराठी माणूस जगभर पोहोचू शकतो हेच तुम्हे सिद्ध केले आहे.
On 7/23/2010 11:36 AM Anita said:
सही...... आपल्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या.....
On 7/23/2010 8:54 AM ravindra Adhikari ,sydney said:
भारत, तुमचे मनपूर्वक अभिनंदन !!!!! तुमचे अनुभव अतिशय प्रेरणादायी आहेत.!!!!
On 7/22/2010 11:55 PM Punekar said:
खरच उत्तुंग आकाश भरारी आहे. अभिनंदन! भारताला अश्या लोकांची फार गरज आहे. असे पंत प्रधान डॉ सिंग ह्यांनी आव्हान केले (जे स्वतः एक उदाहरण आहेत) होते. विद्यार्थ्यांनी अश्या आवाहनांना आव्हान म्हणून का होईना प्रतिसाद द्यावा. भारतीय विद्यार्थ्यांच्या आकाश भरारी चा शेवट परदेशात होतो. हाच आपला देश आणि इतर देश ह्यांच्यात फरक आहे. आपले देशप्रेम राजकारण, जातीभेद वगैरेमध्ये हरवून जाते. ह्यात करडक साहेबांबद्दल पर्सनल काहीही नाही. त्यांचे प्रयत्न आणि रिझल्ट्स खरच उत्तुंग आहेत.
On 7/22/2010 11:28 PM Deepak Patil said:
अभिनंदन भारत..:)
On 7/22/2010 10:28 PM organic said:
congrats Dr. Kardak. पण आजकाल फक्त PhD पाहिजे म्हणून हजारो मुले US, Europe la applications पाठवतात , त्यांचे CV पाहून MSc ५०% ५५% असे मार्क्स , काही lucky होवून इकडे येतातही . वर त्यांची English chi बोंबा बोंब . such candidates ruin reputation of really good indian students who are abroad. तुम्हाला हि याची कल्पना / अनुभव असेलच. माझ्या मते, अश्या students नि स्वतः ची ability पाहून मग परदेशात ( किवां भारतातही ) PhD करावी कि नाही हे ठरवावे. या बद्दल तुमचे काय मत आहे??
On 7/22/2010 7:39 PM gajanan patil said:
firstlly, congratulations.. and hats off too. you are the person who increase my confident by 200%. but only one request that, till you are on earth at least 50 indians will become ph.d. by your advice & coaching. best of LUCK. GOD bless you DEAR. can YOU plz tell me ur email adress.
On 7/22/2010 7:37 PM Vijay D. Lanekar said:
तुझे मना पासून अभिनंदन !!!!! तुझे अनुभव मला तरी खूप खूप प्रेरणादायी वाटले.!!!! मी तुला नमन करतो..
On 7/22/2010 7:19 PM Avinash L said:
अप्रतिम.. भारत सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.. अत्यंत कष्टाने तुम्ही यशाचा मार्ग गाठलात.. तुमची हि आकाश भरारी पाहून आमच्या सारख्या अनेकांना स्पुर्ती मिळेल.. हे सदर सुरु केल्याबद्दल सकाळचे आभार!!
On 7/22/2010 7:04 PM jhakkI said:
चंपक, सर्वप्रथम अभिनंदन. तुमची जिद्द, व मेहेनत कौतुकास्पद आहे. पण ऑस्ट्रेलियात का? भारतातच का नाही? <"गेली पाच-सहा वर्षे ............. निर्देशक पाहिला असता ही बाब प्रकर्षाने जाणवते."> अरेरे, अजूनही भारतात असेच? वाईट वाटते! आता तरी बॉलीवूड नि क्रिकेट मध्ये वेळ नि पैसा कमी करा!! शरद पवार ला म्हणावे, क्रिकेटपेक्षा इकडे लक्ष दे! .
On 22-07-2010 18:29 Anupama Katyare said:
Bharat, tuze yash kharokharach preranaadayee aahe! pudheel vaatchaaleesathee anek shubhechchhaa!
On 7/22/2010 4:16 PM उर्मिला अशोक शहा said:
करंडक साहेब. आता मी अंतर्मुख झाले आहे. कस काय हो जमत तुम्हाला सगळ? माझा उर तर प्रचंड भरून आला आहे. अभिनंदन करू कस हेच कळेनास झाल आहे. तरी सुद्धा करते. जमल्यास एक पुस्तक लिहा चित्रांसकट. मी नक्की वाचीन आणि प्रतीकीरीया देईन. धन्य वाद माझा तुम्हाला.
On 22.07.2010 12:16 Ramchandra Kandre said:
khup chhan watle tuza lekha wachun...Bhetu Indiat kadhitari
On 7/22/2010 11:58 AM Rajendra pagire said:
Best of luck ,My family & me. For your bright futur.
On 7/22/2010 11:42 AM nilesh sapate said:
बेस्ट ऑफ luck
On 22-07-2010 11:24:49 Meenakshi Hardikar said:
अभिनंदन भारत.
On 7/22/2010 10:53 AM Anand D said:
भारत साहेब very best luck for your future.
On 7/22/2010 10:51 AM Pramod Bhosale said:
खूप चंगला प्रयत्न आहे . खूपच ग्रेअत .
On 7/22/2010 10:43 AM Ashish said:
तुझे यश पाहून अनेक तरुण अशीच प्रेरणा घेतील. जय महाराष्ट्र...!!
On 7/22/2010 10:43 AM sunil k ( PUNTAMBA A.NAGAR said:
अभिनंदन.मित्रा तुझ्या प्रयत्नांना यश मिळाले.मराठी मुलांनी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यावर उर बहरून येतो आणि एक प्रेरणा मिळते ( मी पण आर बी एन बी कॉलेज ला होतो १९९४)
On 7/22/2010 9:59 AM marathi said:
अभिनंदन.मित्रा तुझ्या प्रयत्नांना यश मिळाले.मराठी मुलांनी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यावर उर बहरून येतो आणि एक प्रेरणा मिळते
On 7/22/2010 8:11 AM गंगाधर मुटे said:
जिद्द आणि मेहेनतीने तुम्ही एकएक अडथळा पार केला. अभिनंदन..!! अनेक होतकरूंना तुमच्यापासून निसंशय प्रेरणा मिळेल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गंगाधर मुटे
On 7/22/2010 7:08 AM Shilpa said:
All the Best मी तुमच्याशी अगदी सहमत. आकाश भरारी चा अर्थ या लेखात आकाशा एवढी भरारी तर या आधीच्या लेखात विमानातून परदेशात भरारी असा होतो... प्रामाणिक मताबद्दल दिलगिरी.
On 7/22/2010 7:06 AM Jag said:
खरोखर कौत्कास्पद आहे हे सगळे , बर्यच लोकांना म्हजे माझ्य सारख्याना बरेच काही माहित असते पण काय करयचे सुचत नाही . तुम्हाला मनाचा मुजरा ..............
On 7/22/2010 6:40 AM Satej Prabhu said:
छान post आहे. निव्वळ मी भारतीय आणि मी महान ह्या चाकोरीतून बाहेर पडून युरोपिअन लोकांचे गुणधर्म योग्य तर्हेने न्याहाळून आपण कुठे कमी पडतो ह्याचा सुंदर लेखाजोखा आहे.
On 7/22/2010 5:44 AM ranjana dinkar kumbhar said:
झक्कास .....................................................
On 7/22/2010 5:14 AM Prabodhan Joshi said:
कर्डक साहेब..ऑस्ट्रेलिया मध्ये आपले स्वागत करतो. तुमचे ऑस्ट्रेलिया मधले गाव नाही समजले. पुढे कधीतरी भेट होईलच. आपल्या भावी आयुष्याकरता शुभेच्चा.
On 22/07/2010 03:52 RD said:
गेली पाच-सहा वर्षे परदेशात राहिल्यानंतर मनात असलेली खंत म्हणजे निसर्गाचे वरदान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा असूनही आपले देशबांधव 'एकी'च्या अभावामुळे पाश्चात्यांपेक्षा कमी दर्जाच्या सोयी सुविधा अनुभवतात.....हि बाब खरी आहे. भारतात सगळे आहे पण एकी जरा कमी पडते.... पण हा लेख वाचून भारत गंगाधर करडक चे कवतुक करावे वाटते..
On 7/22/2010 3:06 AM Baapoo said:
अभिनंदन, तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. अशीच प्रगती करा. गौड,सुर्वे, म्हस्के,ढाकणे,व बँकेचे मनेजर या पंच्च्मुखी ईश्वराला विसरू नका. त्यांच्या नेहमी संपर्कात रहा. तुम्हाला आशीर्वाद.
On 22/07/2010 01:54 Nagesh said:
छान! जिथे इच्छा तिथे मार्ग, अभिनंदन!!!
On 7/22/2010 1:06 AM All the best said:
अतिशय जिद्दिच्या जोरावर तु हे उल्लेखनिय यश मिळवले आहेस, पुढे आयुश्यात तुला असेच यश मिळो. केसकर साहेब ह्याला म्हणतात आकाश भरारी


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: