लाल दिव्याच्या गाड्या गर्दीत घुसल्याने पंढरपुरात चेंगराचेंगरी
-
Thursday, July 22, 2010 AT 12:15 AM (IST)
पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्या निघालेल्या असताना लाल दिव्यांच्या दोन इनोव्हा गाड्या प्रचंड गर्दीत घुसवण्यात आल्याने चेंगराचेंगरी झाली. सकाळी पावणेदहा ते साडेदहा या दरम्यान पाऊणतास शिवाजी चौक ते चौफाळा या भागात त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. शेकडो वारकरी गर्दीत अडकल्याने चेंगराचेंगरी होऊन दोन, तीन लोक जखमी झाले तर अनेकांच्या चपला तुटून पडल्या. त्यामुळे या रस्त्यावर चपलांचा ढिग जागोजागी पडला होता. यात्रेत शिवाजी चौकाच्या पुढे कोणाच्याही गाड्या सोडायच्या नाहीत असे ठरलेले असताना मग या गाड्या गर्दीत कोणी सोडल्या, त्या कोणत्या मंत्र्यांच्या होत्या याची चौकशी करण्याची मागणी वारकऱ्यांमधून होत आहे.
आषाढी एकादशी दिवशी पहाटेपासून दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. त्यावेळी रस्त्यावर एकच गर्दी होत असते. महाद्वार घाट, चौफाळा, नाथ चौक, भजनदास चौक आदी भागात दरवर्षी गर्दीमुळे ढकलाढकली होत असते. दिंडी पुढे गेली की पुन्हा वारकऱ्यांचे लोंढे जात असतात. आज मात्र सकाळी पावणेदहा ते साडेदहा या दरम्यान चौफाळा ते शिवाजी चौक या रस्त्यावर गर्दी प्रचंड वाढली. दिंड्या क्रॉस करून लोकांना पुढे जाता येत नव्हते. त्यातच लाल दिव्याच्या दोन इनोव्हा (एम.एच.13 बी 2838 आणि एम.एच.13 बी 2930) गाड्या अशा प्रचंड गर्दीत घुसवण्यात आल्याने गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत काही महिला जखमी झाल्या परंतु त्यांची नावे समजू शकली नाहीत. सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.
तिथे चालणे देखील मुश्कील होत होते. जीव मुठीत घेऊन वारकरी कसबसे गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत असताना लाल दिव्याच्या गाड्या तिथे घुसलेल्या पाहून वारकरी चिडले. गर्दीत गाड्या अडकल्यानंतर त्यातील मंडळींना नाईलाजास्तव गाडीतून खाली उतरुन चालत जावे लागले. शेवटी या गाड्या गर्दीतून प्रयत्न करून बाहेर काढण्यात आल्या. सुरवातीला पाच ते सहा पोलिसच होते. वारकऱ्यांचा दबाव वाढल्याने गर्दीत घुसवण्यात आलेल्या लाल दिव्यांच्या गाड्या बाहेर काढण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. वाहनांभोवती दोरीचे सुरक्षाकडे करून पोलिसांनी ती वाहने बाहेर काढताना वारकऱ्यांनाच अरेरावी केली. पोलिसांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आषाढी यात्रा काळात गर्दीमुळे शिवाजी चौकाच्या पुढे मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या वेळी जाणाऱ्या गाड्या वगळता अन्य कोणाच्याही गाड्या सोडायच्या नाहीत असे प्रशासनाने ठरवलेले असताना मग या दोन गाड्या का सोडल्या , त्या कोणाच्या होत्या याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
अतिक्रमणांच्या विरोधात कडक कारवाई न झाल्याने त्याचा फटका वारकऱ्यांना बसला. अनेक व्यापाऱ्यांनी दोन, तीन फूटापेक्षा जास्त अतिक्रमणे केलेली आहेत. सध्याचे रस्ते रुंद आहेत नियोजित विकास आराखड्यात आता हे रस्ते आणखी रुंद करू नका अशी स्थानिक लोकांची मागणी आहे परंतु परगावच्या विक्रेत्यांनी रस्त्यावर जागा मिळेल तिथे दुकाने थाटली आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या पुढे दोन, तीन फुटापेक्षा जास्त अतिक्रमणे केल्याने आज रस्ते रुंद असूनही कमी पडत होते. त्याचा त्रास आज वारकऱ्यांना झाला.