वारीने घडवले भक्तिरसातील एकीचे दर्शन
-
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)
प्रदीप कुलकर्णी - सकाळ वृत्तसेवा
जत - बेळगाव जिल्ह्यातील तीस हजारांहून अधिक वारकऱ्यांनी जत तालुक्यातून पंढरी गाठली. वारीत कुठेही सीमावादाच्या भिंती आडव्या आल्या नाहीत. वारकऱ्यांनी दाखवले ते फक्त भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या एकीचे दर्शन.
बेळगाव कुणाचे, यासाठी चाललेल्या वादामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात सध्या तणाव आहे. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पोहोचलेल्या सीमावादाचा प्रश्न सुटो अगर न सुटो; मात्र विठ्ठलाच्या भक्तिरसात महाराष्ट्र-कर्नाटकातील वारकऱ्यांनी उभारलेला समानतेचा सेतू क्षुद्र राजकारण्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरत आहे.
कर्नाटकातून दरवर्षी 50 हजार वारकरी पंढरीला येतात. गोकाक, बेळगाव, जमखंडी, झुंजरवाड, मुधोळ, सावळगी, बागलकोट, तेरदाळ, गुलबर्गा, तेलसंग, फडतरवाडी, उंडी, हारुगिरी, मुत्तूर, विजापूर, व्हसपेठ आदी ठिकाणांहून दिंड्या एकोप्याने पंढरीकडे जातात.
जत तालुक्यात उमराणी, बिळूर, गुगवाड, जत, शेगाव, निगडी, येळवी, सोन्याळ, उमदी आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने दिंड्यांचे स्वागत केले जाते. मुक्कामी ठिकाणी, भजन-कीर्तनाचा नाद घुमतो तर भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच याच दिंड्या या गावातील वारकरी सहभागी होतात.
जमखंडी दिंडीतील वारकरी भगवंतराय्या कन्नाळ म्हणाले, 'गेल्या 25 वर्षांपासून मी पायी येतो. ऊन असो पाऊस याची तमा बाळगली जात नाही. आम्हाला सीमावादाची भीती नाही. महाराष्ट्रातील संस्कृती वारकरी सांप्रदायातील आहे. जगाला हेवा वाटावा असा सोहळा पंढरपुरात विनाविघ्न पार पाडतो.''''
25 वर्षांपेक्षा जास्त वर्षे वारकऱ्यांची सेवा करणारे जत पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष कुलकर्णी म्हणाले, ""देवाच्या भक्तीत कोणताही भेदभाव नसतो. विठ्ठल हा सर्वसामान्यांचा, वर्ण, जात, प्रांत भेद न मानणारा देव आहे. कोणत्याही प्रांतातून आलेले वारकरी विठ्ठलाचे भक्त आहेत. सीमावाद हा तत्त्वासाठी सुरू असलेला वाद आहे. आम्ही वारकऱ्यांची सेवा करून पुण्याची अनुभूती मिळवत आहोत.''
कानडा हो विठ्ठला !
पंढरपूरचा विठ्ठल हा मूळचा कर्नाटकाचा आहे, असे म्हटले जाते. व्हसपेठ जिल्ह्यातील हंपी (पूर्वीचे विजयनगर) येथे विठ्ठलाचे विलोभनीय मंदिर आहे; मात्र या मंदिरात मूर्ती नाही. पूर्वी विजयनगर साम्राज्यावर झालेल्या हल्ल्यात शत्रूंनी हिंदू देवतांची विटंबना केली. त्या वेळी विठ्ठलाची विटंबना होऊ नये म्हणून एका भक्ताने मूर्ती घेऊन पंढरपूरला आणल्याची आख्यायिका आहे. आजही येथील मंदिर विजय विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी येथील भक्त पायी पंढरपूरला येतात.''