आषाढी दिवशी राजकारण्यांना प्रवेशबंदी असावी
-
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)
पुणे - विठ्ठलाची पूजा वारकरी लोकांच्या हस्ते झाली पाहिजे. राजकारणी लोकांना या दिवशी तरी प्रवेश बंदी असावी, अशा प्रतिक्रिया राज्यातील अनेक वाचकांनी "ई-सकाळ'वर व्यक्त केल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा केली. त्यासंदर्भात "ई-सकाळ'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राजकारणी लोकांना या दिवशी प्रवेशबंदी असावी, असे पांडुरंग व बबन यांच्यासह काही जणांनी केली आहे. तुम्ही आणि तुमची कॉंग्रेस दोन्हीही सेक्युलरवादी आहात ना, असा प्रश्न हेमंत निकम यांनी केला आहे. मुख्यमंत्री निघून गेल्यावर दिवसभर विविध खात्यांतील शासकीय अधिकारी, राजकारणी, बडवे लोकांनी पैसे घेऊन आणलेली माणसे "डायरेक्ट' दर्शन घेत असतात. या लोकांना प्रतिबंध केल्यास वारकऱ्यांची खरी सोय होईल, असे अभय यांनी म्हटले आहे. विठ्ठलभक्त एवढ्या लांबचा प्रवास करून येतात. मग जो पहिला येईल त्याच्या हस्ते का होत नाही पूजा? मुख्यमंत्री रांगेत उभे राहू शकत नाहीत, तर मग कशाला त्यांना पूजेचा मान हवा? असे प्रश्न स्मिता यांनी विचारले आहेत. "विठ्ठला पांडुरंगा, महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळण्यासाठी तरी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कर,' अशी मागणी नवनाथ भगत यांनी केली आहे.
'ई-सकाळ'वरील आणखी काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
भीमाजी ढमाले पाटील - हे राजकारणी देवापुढेही स्वतःचा बडेजाव माजवायला लाजत नाहीत.
सुबोध व विनोद देशपांडे - आधी मंदिर समिती स्वच्छ करा. बेजबाबदार आणि भ्रष्ट सदस्यांना काढून टाका.
सचिन - ढोंगी राजकारणी लोकांना या देशातून हाकलून दिले पाहिजे.
श्रीकृष्ण - दर वर्षी तुझ्या चरणी येऊन खोट्या प्रार्थना करतात आणि एक वर्ष विसरून जातात. हे फक्त टीव्ही व वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर येण्यासाठीच. त्यांना तुझ्यासारखी गरिबांची कीव आहे कुठे? म्हणून म्हणतो यांना व यांच्या चमच्यांना सद्बुद्धी दे.
अंतू बर्वा - उद्धव तारे यांनी 30 तास रांगेत उभे राहून महापूजेचा मान मिळवला. त्यांचे अभिनंदन! गेली 15 वर्षे ते न चुकता वारीला येत आहेत आणि काही न करता मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा मान मिळवला. त्यांच्याबरोबर फुकटचंद लोकांनी विठ्ठलदर्शन मिळवले. महापूजेचा मानकरी होऊनही तारे बाजूला उभे होते आणि मुख्यमंत्र्यांनी प्रथम पूजेचा मान घेतला. वारकऱ्यांचे दुर्दैव आणि दुसरे काय?
व्हेरीहर्ष - राजकारण्यापेक्षा वारकऱ्यांनी निवडलेल्या एखाद्या वारकऱ्याच्या हस्ते महापूजा व्हायला हवी.
संतोष - विठू माउली, राजकारण्यांना जरा कमी खायला सांग.
सीमाप्रश्नासाठी प्रार्थना करण्याचा दिला सल्ला
'मला महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल अभिमान वाटू दे. मी पुन्हा कधी दिल्लीतील हायकमांडपुढे झुकणार नाही. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भले माझी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तरी चालेल,'' अशी प्रार्थना विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून करावी, असा सल्ला नाना या नावाने एका वाचकाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.