नवी दिल्ली - यंदा पाऊस चांगला होईल, असे सरकारी पातळीवरून दिले जाणारे दिलासे आणि पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे या मोसमातील पावसाचे घटलेल्या सरासरीचे प्रमाण 12 वरून 14 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात (जून) सरासरीपेक्षा 16 टक्के पाऊस कमी झाल्याचा अहवाल सात वेधशाळांनी दिला होता. असे असले तरी हवामान खात्याला मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
मॉन्सूनच्या वाहण्याला पुरेसा वेग असला तरी समुद्रात कमी दाबाचा पट्टाच निर्माण होत नसल्याने पाऊस पडण्यात अडचण येत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. शिवाय, या कमतरतेमुळे बऱ्याच भागात पेरण्यांवरही परिणाम झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस पडेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, सद्यःस्थितीत देशाचे तेलबिया क्षेत्र असलेल्या मध्य भारतातच पावसाने पाठ फिरविली आहे. मध्य भारतात पाऊस घटण्याचे प्रमाण तब्बल 30 टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याचे हवामान खात्याच्याच अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पावसाची कमतरता असलेल्या या भागात गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील गंगेचे खोरे आणि ओरिसा या भागाचा समावेश आहे. या भागात सोयाबीन, भुईमूग, भात, कापूस आणि डाळीचे पारंपरिक पीक घेतले जाते.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीची सरासरी 359.5 मिलिमीटर आहे. मात्र, तेथे आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता 44 टक्के पाऊस घटल्याची नोंद आहे. पूर्व राजस्थानात 209.6 मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत 33 टक्के पाऊस घटला आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 34 टक्के घट (सरासरी 305.8 मिलिमीटर), पूर्व मध्य प्रदेशात 26 टक्के घट (सरासरी 392.1), पूर्व उत्तर प्रदेशात 36 टक्के घट (सरासरी 316.8), छत्तीसगडमध्ये 32 टक्के घट (सरासरी 454.1), ओरिसात 31 टक्के घट (सरासरी 442.4), पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खोऱ्यात 35 टक्के घट (सरासरी 464.7) आणि झारखंडमध्ये 415.8 मिलिमीटरची सरासरी असली तरी तेथे तब्बल 45 टक्के पावसाचा तुटवडा आहे. त्यामुळे एकूण देशभरातील पावसाच्या कमतरतेची सरासरी पाहता ते प्रमाण 14 टक्क्यांवर जाते.
जूनमध्ये सरासरीपेक्षा 16 टक्के पाऊस कमी झाल्याचे सात वेधशाळांच्या अहवालानंतर स्पष्ट झाले होते. 1995 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती ओढवली. मॉन्सून सक्रिय झाल्यापासून पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने चिंतेचे वातावरण असताना हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसास प्रारंभ होईल. तसेच जुलै व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होईल असा दावा केला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कमी पावसाचे 16 टक्के प्रमाण 12 टक्क्यांवर आले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता ते वाढून 14 टक्क्यांवर पोहोचले आहे.
Follow
Us on
Twitter