अडीच वर्षांच्या चिमुकलीसह मातेची आत्महत्या
-
Friday, July 23, 2010 AT 12:00 AM (IST)
नागपूर - कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या एका विवाहितेने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसह पाटणा-सिकंदराबाद एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज (ता. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास काटोल परिसरात घडली.
मीना रोशनसिंग चव्हाण (30) रा. वॉर्ड क्रमांक 22, काटोल आणि तन्नू रोशनसिंग चव्हाण ही अडीच वर्षांची चिमुकली असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. मीना हिचे लग्न तीन वर्षांपूर्वी नात्यातीलच युवकाशी झाले होते. नागपूर येथे राहत असलेला मीनाचा पती खासगी काम करून उदरनिर्वाह चालवीत असे. सुरवातीपासून आपल्याला चांगली मिळकत असलेला पती मिळेल, अशी इच्छा असलेल्या मीनाला पतीच्या अल्प मिळकतीत कधीही समाधान लाभले नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमीच खटके उडत. काही दिवसांपूर्वी त्यांचा वाद विकोपाला गेला आणि मीनाने पतीचे घर सोडून काटोलला आईवडिलांच्या घरी आसरा घेतला. काही दिवस राग शांत झाल्यानंतर मुलगी निघून जाईल, असे तिच्या आईवडिलांना वाटले. परंतु, ती परत जायचे नाव घेत नसल्याचे पाहून त्यांनी तिला परत पतीकडे जाण्याचा अट्टहास धरला. आधीच मानसिक स्थिती व्यवस्थित नसलेल्या मीनाने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि आज (ता. 22) सकाळी साडेसातला ती आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसह घराबाहेर पडली. आठला तिने काटोल यार्डातील किलोमीटर क्रमांक 982 येथे एका रेल्वेखाली येण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे उपस्थित काही लोकांनी तिला तेथून हाकलून लावले. परत गेल्याचे दाखवीत पुन्हा ती नऊला त्या ठिकाणी पोचली आणि आपल्या चिमुकलीसह तिने भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडी क्रमांक 2295 पाटणा-सिकंदराबाद एक्स्प्रेसखाली येऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक श्री. निनावे आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले. लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.