चिपळूणला पुरामुळे हाहाकार
-
Friday, July 23, 2010 AT 12:00 AM (IST)
चिपळूण - मुसळधार पावसाने शहर आणि खेर्डी परिसराबरोबरच तालुक्यात अनेक भागात अक्षरशः हाहाकार माजविला. काल (ता. 21) मध्यरात्री पुराचे पाणी शहरात घुसल्याने नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. दुपारपर्यंत पावसाने जोर कायम ठेवल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरले नव्हते.
दुपारी बारानंतर भरती सुरू झाल्याने खाडीचे पाणी शहरापर्यंत पोहचले. दुपारी 12 नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतलेली असताना चिंचनाक्यात पाणी साचले. चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील खेर्डी येथे पुरामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. पाच तासानंतर हा मार्ग खुला झाला आहे.
चिपळूणला दुपारी 4 वाजेपर्यंत 108, तर कोळकेवाडी येथे 251 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. काल (ता. 21) सायंकाळपासून मात्र पावसाने चांगलाच जोर लावला. त्यामुळे शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदी तुडूंब भरून वाहत होत्या. रात्री दीडच्या सुमारास नद्यांचे पाणी शहरात घुसण्यास सुरवात झाली. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना धोक्याची सूचना देणारे सायरन वाजविण्यात आले. नाईक पुलाजवळली परिसर, मच्छीमार्केट, जोगळेकर गादी कारखान्याजवळील परिसर, ओतारी गल्ली, खाटीक गल्ली आणि हळूहळू बाजारपेठ परिसरात नद्यांचे पाणी घुसू लागले. पावसाचा जोर वाढत गेल्याने हळूहळू शहरात घुसलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत गेली.
पहाटे साडेतीन ते चार या अर्ध्या तासाच्या अवधीत मुसळधार पावसामुळे सुमारे एक फुटापर्यंत वेगाने पुराच्या पाण्याची पातळी वाढली. चिंचनाका, मार्कंडी, वडनाका, खेंड परिसर, बाजारपेठेचा काही भाग, भेंडीनाका आदी भाग हळू-हळू पुराच्या पाण्याने वेढला गेला. े. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने
बाजारपूल पाण्याखाली गेला. संभाव्य पुराची कल्पना आल्याने नागरिकांनी
साहित्य सुरक्षित हलवून ठेवले होते.
आज सकाळी 10 वाजल्यानंतर खेर्डीतील रस्ता पाण्याखाली गेल्याने कऱ्हाड मार्ग बंद झाला होता. 5 तासाच्या प्रतीक्षेनंतर दुपारी 2.30 वाजता चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दुपारी 1.30 नंतर पुराचे पाणी ओसरू लागले. त्यामुळे 2.30 नंतर चिपळूण-कऱ्हाड मार्ग वाहतुकीसाठी अंशतः खुला झाला. एसटी महामंडळाच्या काही गाड्याही त्या पाण्यातूनच सोडण्यात आल्या.
एसएमएसची सेवा यशस्वी
यावर्षीच्या पावसाळ्यात काल (21) रात्री प्रथम शहरातील भेंडीनाका परिसरात पाणी भरले. ही माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी आपत्तकालीन विभागातील मोबाईलवरून कर्मचाऱ्यांना एसएमएस करून तत्काळ पालिकेत बोलवून घेतले. केवळ पाच मिनटात सर्व कर्मचारी जमा झाले. पुराच्या पाण्याची तीव्रता वाढली तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी आपत्तकालीन विभागातील कर्मचाऱ्यांसह पालिकेत होते. एसएमएस मिळाल्यानंतर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी वेळेवर हजर राहिल्यामुळे एसएमएस सेवा यशस्वी झाल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. शेट्ये यांनी दिली.
माझा संसारच वाहून गेला - आयशाबी
शिवनदीच्या पात्रालगत झोपडीत राहणाऱ्या आयशाबी शेख हिच्या झोपडीत पाणी शिरल्याने झोपडीतील साहित्य पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. त्यामुळे हतबल झालेली आयशाबी रडत रडत "माझा संसारच वाहून गेला, आता कुठे राहू, कुणाकडे काय मागू असे झोपडीकडे बघत सांगत होती. शिवनदीच्या पात्रालगत आदिवासी समाजातील कुटुंब झोपड्यामध्ये राहत होते. त्यामध्ये 70 वर्षीय आयशाबी शेख यांचीही झोपडी होती. शहरात पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर या झोपड्यांमध्येही पाणी गेले. काही झोपड्या पालिकेने उद्धवस्त केल्या.