मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला
-
Friday, July 23, 2010 AT 12:30 AM (IST)
रत्नागिरी/राजापूर - सलग चौथा दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वे मार्गावर राजापूरच्या गोपाळवाडीत दरड कोसळल्याने सुमारे तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. निवसर (ता. लांजा) येथे पुन्हा यावर्षी शंभर मीटर रेल्वे मार्ग खचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. तेथे रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 10 किमी ठेवला आहे. दरम्यान, पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला असून गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीनंतर निवसर रेल्वेस्थानकाजवळील जमीन खचण्याचा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे रेल्वे रूळ एक ते दीड फूट खचले आहेत. गतवर्षी खचलेल्या फलाटाच्या ठिकाणी मोठी भेग गेली आहे. आजपर्यंत सुमारे 8 ते 10 कोटी रुपये खर्च करूनही निवसरचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हळूहळू भेगा पडण्यास सुरवात झाली. दुपारी भेगा मोठ्या होत गेल्या.
या भागात तत्काळ गाड्यांचा वेग ताशी 10 ते 30 किमी ठेवण्यात आला आहे. रेल्वे मार्ग खचला असून रूळ वेडेवाकडे झाले आहेत. तिसऱ्या लाईनच्या बाजूचा भागही एक फुटाने खचला आहे. खचलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. चार डबे खडी निवसर येथे पाठविण्यात आली होती. दुपारपर्यंत हे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
कोकण रेल्वेने दोन कोटी रुपये खर्च करून चौथी रेल्वे लाईन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. 60 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्य मार्गापर्यंत लाईन जोडण्याचे काम शिल्लक आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम उशिरा सुरू झाले. सध्या पाऊस सुरू असल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे स्टेशनजवळील भाग खचत असल्याने निवसरवासीयांनी शंभर मीटरच्या या भागात पूल बांधण्याची मागणी केली होती. त्याला अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. मे महिन्याच्या अखेरीस रत्नागिरीत आलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाची पाहणी करणाऱ्या समितीनेही निवसरच्या अडचणीविषयी सूचना केलेल्या नव्हत्या. यावर्षी पुन्हा भाग खचल्याने कोकण रेल्वेसमोर हे आव्हानच ठरणार आहे.
दरम्यान, आजही दिवसभर संततधार सुरूच होती. पावसाचा जोर वाढल्याने खेड तालुक्यात जगबुडी नदीजवळील झोपडपट्टीतील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील खोपी येथे एका घराचे अंशतः नुकसान झाले. नाणीज (रत्नागिरी) येथील संभाजी भानूराव पाटील (वय 47) यांचा काल (ता. 21) दुपारी नदीत वाहून बुडून मृत्यू झाला. जयगड-गणपतीपुळे मार्गावर चिपळूण-कऱ्हाड मार्ग पाच तासांनी सुरू झाली. शिवनदीच्या पात्राजवळील झोपड्यात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात पावस येथे सत्तार रहिम इनामदार यांच्या घरावर दरड कोसळून 12 हजारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे कोतवड्यात तीन घरांचे दहा हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे 32 घरांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. घरे, गोठे आणि अन्य मिळून जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा पाच लाखांवर पोचला आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी रस्ता असलेला तुळशी विन्हेरे येथे दरड कोसळल्याने रस्ता पूर्ण बंद झाला आहे.
दिवसभरात पाऊस
* चिपळूण, खेडमधील पाणी दुपारनंतर ओसरले
* राजापुरातील बाजारपेठ सायंकाळीही पाण्याखाली
* तुळशी-विन्हेरेत दरड कोसळून वाहतूक बंद
* तीन दिवसांत जिल्ह्यात सहा लाखांचे नुकसान
* जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ
* नाणिज येथील एकाचा बुडून मृत्यू
बुधवारी सकाळी साडेआठच्या नोंदी
(कंसात मोसमातील एकूण पाऊस)
* मंडणगड- 152.2 (1388.3)
* दापोली- 186.6 (2127.4)
* खेड- 164 (1709)
* गुहागर- 95 (1894)
* चिपळूण- 108 (1453)
* संगमेश्वर- 211 (2601.5)
* रत्नागिरी- 83 (1820)
* लांजा- 104 (1797.4)
* राजापूर- 98 (1645).
सरासरी 133.5 (1825.3)