Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मलिंगाच्या पुनरागमनाने समीकरणे बदलली!
सुनील गावसकर
Monday, July 26, 2010 AT 12:00 AM (IST)

श्रीलंकेचा संघ गेल्या वर्षी भारतात आला होता. त्या वेळी त्यांनी पहिल्या कसोटीत 750 धावांचा डोंगर उभारला होता. जयवर्धनेने चमकदार द्विशतक केले होते. भारताने पहिल्या डावात चारशे धावा केल्यानंतर लंकेने हे प्रत्युत्तर दिले होते. भारताने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करून कसोटी अनिर्णीत राखली होती; पण फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर श्रीलंकेचे फलंदाज भारतीयांपेक्षा सरस कामगिरी करतात हे दिसून आले होते.

अर्थात, त्यानंतर मालिकेतील पुढील दोन कसोटीत मुरलीधरन पूर्णपणे निष्प्रभ ठरला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीयांनी धावांचा डोंगर रचला होता, तर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत लंका फलंदाजांवर वर्चस्व राखले. श्रीलंकेकडे नव्या चेंडूवरील चांगले गोलंदाज आहेत. ते वेगवान नसले तरी नव्या चेंडूवरील लकाकीचा, तसेच चेंडू जुना झाल्यावर त्यातील टणकपणाचा योग्य प्रकारे फायदा घेतात. अर्थात, त्या वेळी लंकेकडे लसिथ मलिंगाही नव्हता. तो त्या वेळी पूर्ण तंदुरुस्त नव्हता.

मलिंगाने संघात पुनरागमन केल्यावर सर्व समीकरणे बदलली. सलामीवीरांच्या क्षमतेचा कस पाहण्यात तो वाक्‌बगार आहे. त्यानंतर जुन्या चेंडूवरही तो प्रभावी ठरतो. पहिल्या कसोटीत तो चांगलाच प्रभावी ठरला. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या फलंदाजांना जम बसल्यावरही बाद केले. ते मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच मलिंगाने त्यांना टिपले. तेंडुलकर व द्रविडने त्या वेळी चांगली भागीदारी केली होती. मलिंगा गोलंदाजीस आला, त्या वेळी शतक त्यांना खुणावत होते. त्याच वेळी मलिंगाच्या दोन अप्रतिम चेंडूंनी दोघांना बाद केले आणि श्रीलंकेची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

पहिल्या दिवशी केवळ दोघांना बाद करण्यात यश आल्यावर भारतीयांनी चांगला प्रतिकार केला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, त्या वेळी पहिल्या दिवसाचा एक शतकवीर खेळत होता. नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या भारतीयांनी सात विकेट्‌स घेतल्या. भारताने जोरदार प्रतिकार केला असे वाटले त्या वेळीच मलिंगा आणि हेराथ ही जोडी अनपेक्षितपणे चांगलीच जमली. त्यांनी आपला डाव लांबविताना भारतीयांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ मैदानात ठेवले. त्याचबरोबर संघासाठी महत्त्वाच्या धावाही केल्या.

गॉलमधील लढत ही मुरलीधरनची अखेरची कसोटी होती. सामना सुरू झाला त्या वेळी त्याचे 792 बळी होते. भारतातील कामगिरी पाहता तो आठशे बळींचा टप्पा गाठेल, असे वाटत नव्हते. मात्र, प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्याची कामगिरी उंचावली. कारकिर्दीची सांगता स्पेशल कामगिरीने करण्याचे त्याचे लक्ष्य होते. त्याने खरोखरच स्पेशल करताना भारताचा निम्मा संघ बाद केला. त्याचा चेंडू त्याच्या लौकिकानुसार कमालीची फिरकी घेत होता. धोनीला त्याने अप्रतिम चेंडूवर बाद केले. त्या चेंडूचा टप्पा पडला तेथून तो सरळ बाहेर गेला असता, तर तो नक्कीच वाईड ठरला असता. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची स्वप्नवत सांगता करताना भारताच्या दुसऱ्या डावातील अखेरचा फलंदाज बाद करीत कसोटीतील बळींची आठ शतके पूर्ण केली.

ही कसोटी सुरू असतानाच ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान ही कसोटीही रंगत होती. पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा पाकला त्यांच्या निष्प्रभ फलंदाजीचा फटका बसला. आश्‍चर्य म्हणजे कांगारूंच्या "कामचलाऊ' गोलंदाजांनी पाकला हादरवले. पहिल्या डावात शेन वॅटसनसमोर, तर दुसऱ्या डावात मार्क्‍स नॉर्थच्या ऑफ स्पिन गोलंदाजीसमोर पाक फलंदाजांनी नांगी टाकली. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजी तसेच गोलंदाजीत चमक दाखविल्यामुळे लसिथ मलिंगाच या आठवड्याचा "सीएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ दी वीक' आहे. (पीएमजी)


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: