महिला संघासाठी प्रशिक्षकही महिलाच असाव्यात
वृत्तसंस्था
Monday, July 26, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - देशातील महिला खेळाडूंवरील लैंगिक छळवणुकीच्या घटना समोर येत असताना "खेलरत्न' पुरस्कारविजेती मुष्टियुद्ध खेळाडू एम. सी. मेरी कोम हिने महिला संघासाठी महिला प्रशिक्षकच नियुक्त केल्या जाव्यात, असे आवाहन केले आहे.
आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना मेरी म्हणाली, ""या सगळ्या घटना दुर्दैवी आहेत. संघातील खेळाडूंशी अशा पद्धतीने वागणाऱ्या प्रशिक्षकांवर कडक कारवाई व्हायलाच हवी. महिला प्रशिक्षकांची निवड झाल्यास खेळाडू अधिक मोकळेपणाने खेळू शकतील.''
महिला खेळाडूंना आधीच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असतो, अशा वेळी प्रशिक्षकच असे वर्तन करणार असतील, तर महिला खेळाडूंनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित करून मेरी म्हणाली, ""देशातील ग्रामीण भागातून आलेल्या एखाद्या महिला खेळाडूवर असा प्रसंग ओढवला, तर ती बोलूही शकत नाही. चार लोकांसमोर आपली समस्या मांडतानाही तिला लाज वाटेल. म्हणूनच प्रशिक्षकाची नियुक्ती करतानाच काळजी घ्यायला हवी.''
महिला खेळाडूंसाठी महिला प्रशिक्षक नियुक्त करण्यावर जोर देताना मेरीने संघ हितापेक्षा महिला खेळाडूंच्या दृष्टीने ते अधिक सयुक्तिक असल्याचे सांगितले. निवृत्तीनंतर आपण प्रशिक्षक होण्याचा निश्चित विचार करू, असेही तिने स्पष्ट केले.
मुष्टियुद्ध खेळात तरी असे प्रकार घडलेले नाहीत. मेरी म्हणाली, ""प्रत्येक खेळात असे प्रकार घडतीलच असेही नाही. पण, अशा समस्यांचा खेळाडूंचा सामना करावा लागणार. त्यामुळे महासंघाने याविषयी आचारसंहिता आखावी. जणेकरून प्रशिक्षकांवरही अंकुश ठेवता येईल.''