Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा!
वृत्तसंस्था
Monday, July 26, 2010 AT 12:00 AM (IST)

हॉकी सेक्‍स स्कॅंडल

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकीपटूंची लैंगिक छळवणूक केल्याबद्दल हॉकी इंडियाने प्रशिक्षक महाराज कुमार कौशिक यांच्याबरोबर नाते तोडले, त्याचबरोबर या प्रकरणी पोलिस कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही कौशिक यांच्याविरुद्धच्या चौकशी अहवालाची प्रत दिल्ली पोलिसांना पाठवली असल्याचे हॉकी इंडियाचे सचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले होते, पण या अहवालाची प्रत अद्याप दिल्ली पोलिसांना मिळालेली नाही.
हॉकीतील लैंगिक छळवणुकीच्या अहवालाची कोणतीही प्रत आम्हाला मिळालेली नाही. या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त वाय. एस. दाडवाल यांनी सांगितले. प्रशिक्षक कौशिक यांनी आपली लैंगिक छळवणूक केली असल्याचा आरोप रंजिता देवीने केला होता. तिने केलेल्या तक्रार पत्रावर संघातील सर्व 32 खेळाडूंनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानुसार हॉकी इंडियाने चौकशी समिती नेमली होती. समितीचा अहवाल; तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही ही केस दिल्ली पोलिसांकडे सोपवत आहोत, असे बात्रा यांनी सांगितले होते. पण, अहवाल अद्याप दिल्ली पोलिसांना पाठविण्यात आलेला नाही. ""हॉकी इंडियाचे पत्र मिळाल्यावर या प्रकरणी आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याचा अभ्यास केल्यावरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल,'' असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्रीडा मंत्रालय संतप्त
कौशिक यांच्याविरुद्धच्या आरोपाचे प्रकरण हॉकी इंडियाने योग्य प्रकारे हाताळले नाही, असे केंद्रीय क्रीडा खात्याचे मत आहे. अर्थातच, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालय नव्याने समिती नियुक्त करण्याची शक्‍यता आहे. हॉकी इंडियाने कौशिक यांच्याबरोबर संबंध तोडले आहेत, असे सांगितले जाते. पण, तसा निर्णय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. हॉकी इंडियाची समितीच हंगामी आहे. त्यामुळे ते या प्रकारचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे क्रीडा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आचारसंहितेनुसार चौकशी समिती नियुक्त करण्यात येईल. अर्थात, याबाबतचा निर्णय हॉकी इंडियाकडून या सर्व प्रकरणाचा अहवाल आल्यानंतरच घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

समिती सदस्यही नाराज
हॉकी इंडियाने राजीव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती, पण या समितीने केलेला अहवाल बाजूला ठेवून हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला अहवाल तयार केला व त्यानुसारच निर्णय घेतला. ""जर हॉकी इंडियाचे पदाधिकारीच निर्णय घेणार होते, तर चौकशी समिती कशाला नियुक्त केली,'' अशी विचारणा सदस्यांनी केली असल्याचे वृत्त आहे.

नियमाचा भंग
दिल्ली महिला आयोगाने यापूर्वी हॉकी इंडियावर टीका केली होती. कौशिक यांच्यावरील आरोपांबाबतची चौकशी करण्यात आलेल्या समितीत पुरुषांची संख्या जास्त असल्याची टीका आयोगाने केली होती. त्याचबरोबर यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असल्याचेही आयोगाने नमूद केले होते. ""एखाद्या महिलेने लैंगिक छळवणूक झाल्याचा आरोप केल्यास त्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी महिला असणेच योग्य आहे. त्याचबरोबर या समितीत किमान पन्नास टक्के महिलांना स्थान असावे; तसेच या समितीत स्वयंसेवी संस्थेत कार्यरत असणाऱ्या महिलांचाही समावेश असणे योग्य होते. असे केल्यासच संबंधित महिलेस योग्य न्याय देता येईल,'' असे आयोगाच्या प्रमुख बरखा सिंग यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.
 
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: