मुंबई - कुख्यात गुन्हेगार अबू सालेमवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार मुस्तफा डोसाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोर्तुगाल सरकार त्याचा ताबा भारताकडून कधीही घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सालेमला भारताच्या ताब्यात देतानाच भारतीय तुरुंगात त्याला कसलीही इजा होणार नाही, याची दक्षता घेण्यास पोर्तुगाल सरकारने बजावल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेचे पोलिस सालेम आणि डोसाची स्वतंत्र चौकशी करणार आहेत.
कधी काळी दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा सालेम कॅसेटकिंग गुलशनकुमार यांच्या हत्येनंतर टोळीतून विभक्त झाला. यानंतर त्याने स्वतःची नवी टोळी सुरू करून दाऊदच्या साम्राज्यालाच आव्हान दिले. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासह खून व खंडण्याच्या गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना हवा असलेला सालेम त्याची मैत्रीण मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये काही वर्षे वास्तव्याला होता. पोर्तुगालसोबत भारताच्या असलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यानुसार इंटरपोलच्या मदतीने सीबीआयने नोव्हेंबर -2005 मध्ये अबू सालेमचा ताबा घेतला. त्या वेळी पोर्तुगाल सरकारने सालेमला फाशीची शिक्षा होणार नाही तसेच, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास दिला जाणार नाही, अशी अट घातली होती. शनिवारी सकाळी अबू सालेमवर तुरुंगात झालेल्या हल्ल्यानंतर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असतानाच मुंबई पोलिसही पोर्तुगाल सरकारने ठेवलेली अट मोडल्याच्या भीतीने गोंधळले आहेत. सालेमवर झालेल्या हल्ल्यानंतर पोर्तुगाल सरकार कोणत्याही क्षणी त्याचा ताबा मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पोलिस या प्रकरणाचा अतिशय गांभीर्याने तपास करणार आहेत. सध्या सालेमला तळोज्यात, तर डोसाला ठाणे कारागृहात हलविण्यात आले आहे. मात्र या घटनेमागील कारण शोधण्यासाठी दोघांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाच्या तपासाकरिता सुरवातीला डोसा याचा गुन्हे शाखेचे पोलिस कारागृहातून ताबा घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Follow
Us on
Twitter