
पुणे - रोझरी शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पालकांनी मंगळवारी बेमुदत उपोषणाला सुरवात केली. एकूण पाच पालक येथील माध्यमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, शाळेने केलेली शुल्कवाढ योग्य आणि कायदेशीर असून, उपोषणकर्त्यांना परवडत नसेल, तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना शाळेतून काढून टाकावे, असे रोझरी शाळेचे वरिष्ठ व्यवस्थापक अश्विन कामत यांनी "ई-सकाळ'शी बोलताना सांगितले. रोझरी शाळेच्या शुल्कवाढीवरून निर्माण झालेला वाद पुढील काळात चिघळण्याची शक्यता आहे.
रोझरी पालक संघटनेचे अध्यक्ष अजय साठे, दत्तात्रेय पवार, श्रीकांत बराटे, अविनाश शिळमकर, प्रशांत डिकोळे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी १०० हून अधिक पालक मंगळवारी उपस्थित होते. यावेळी पालकांनी रोझरी व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी साठे म्हणाले, ""गेल्या सव्वा महिन्यांपासून वाढीव शुल्कवाढीविरोधात आम्ही न्याय मागत आहोत, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही, त्यामुळेच आम्हाला आज उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. जोपर्यंत शुल्कवाढ रद्द होणार नाही, तोपर्यंत उपोषण थांबविणार नाही.''
राज्याचे शिक्षण संचालक भालचंद्र देसले याबाबत म्हणाले, ""रोझरीतील पालकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत, त्या विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे कार्यवाहीसाठी पाठविल्या असून, त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार, शैक्षणिक विकासाची कामे करण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत शाळांना फी वाढ करण्याचा अधिकार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा, शुल्क ठरविण्याचा व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार शाळेला आहे. पण एखादी शाळा जर नफेखोरी करत असेल, नियमांचे पालन करत नसेल, तर शाळेची मान्यता रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. सर्व बाबी तपासून विभागीय शिक्षण उपसंचालक निर्णय घेतील.''
शाळेने केलेल्या शुल्कवाढीविरोधात पालकांनी शाळेमध्ये पालक संघ (नियोजित) स्थापन केला. शुल्कवाढीविरोधात संघटनेने गेल्या सव्वा महिन्यांपासून आंदोलन सुरू केले. चर्चेसाठी संघातर्फे मुख्याध्यापिकांना पत्र देण्यात आले, तरीही शाळेकडून कोणत्याही स्वरूपाचे उत्तर आले नव्हते. पालक संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव शुल्कवाढ मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पालकांवर शुल्कवाढीचा कोणताही भर न लादता गेल्यावर्षीप्रमाणेच शालेय शुल्क आकारावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही शाळेने शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ नोटिसा पाठविल्या. शुल्क न भरल्यामुळे शिक्षकांनी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याच्या पालकाने बंडगार्डन पोलिसांकडे दिली होती.
Follow
Us on
Twitter