कौशिक हॉकी इंडियाविरुद्ध न्यायालयात जाणार
-
Tuesday, July 27, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले हॉकी प्रशिक्षक एम. के. कौशिक यांनी अखेरीस मौन सोडले असून, त्यांनी सोमवारी हॉकी इंडियाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
महिला हॉकीपटू रंजिता देवी हिने कौशिक यांच्याविरुद्ध लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यानंतर गेले तीन दिवस हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले. हॉकी इंडियाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचा दावा देत कौशिक यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिस चौकशीची शिफारस केली. त्यानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कौशिक यांनी आपले मौन सोडले. ते म्हणाले, ""माझ्याशी असलेले संबंध सोडण्याच्या आणि पोलिसांना कारवाई करण्याची विनंती करण्याच्या हॉकी इंडियाच्या निर्णयाला माझा आक्षेप आहे. हॉकी इंडियाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने कुठल्याही प्रकारची शिफारस केली नव्हती. असे असताना ते असा निर्णय घेऊ शकत नाहीत. आता मी न्यायालयात जाणार.''
कौशिक यांनी तीन दिवसांनंतर घाईगडबडीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले. ते म्हणाले, ""हॉकी इंडियाने नियुक्त केलेल्या चौकशीत महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपांची पडताळणी झालेली नाही. असे असताना केवळ सकृतदर्शनी पुराव्यावर ते मला कसे दोषी धरू शकतात? माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.'' कौशिक यांनी या वेळी मनिंद्रा मित्रा आणि प्रवीण अग्रवाल या आपल्या वकिलांची ओळख करून दिली. मित्रा म्हणाले, ""कौशिक पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर न्यायालयात जाण्याविषयीच्या निर्णयाचा विचार करतील. अर्थात, त्यापूर्वी आम्ही हॉकी इंडियाने पाठविलेल्या पत्राला उत्तर देऊ.''