Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बाभळीप्रश्‍न पंधरा दिवसांत सोडवा - चंद्राबाबू
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Wednesday, July 28, 2010 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येत्या पंधरा दिवसांत बाभळी प्रश्‍नावर सामंजस्याने मार्ग काढला नाही, तर आम्ही जनआंदोलन करू, असा इशारा तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे. महाराष्ट्रात बाभळीबरोबर इतर सुरू असलेले प्रकल्प अनधिकृत असून, केंद्राने त्यांना लगाम घालावा, बाभळीचे दरवाजे काढून टाकावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

आंध्र प्रदेशच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल (ता. 26) पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, कोणतेही आश्‍वासन न मिळाल्याने चंद्राबाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन आज त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. 10 ऑगस्टपर्यंत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून सामंजस्याने मार्ग न काढल्यास जनआंदोलन उभे केले जाईल. यामुळे होणाऱ्या परिणामांना आंध्रचे मुख्यमंत्री के. रोसय्या जबाबदार असतील, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

बाभळीप्रश्‍नी आतापर्यंत तीन शिष्टमंडळांनी पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबाबत नायडू यांनी नाराजी व्यक्‍त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्टमंडळ भेटायला येत असतानाही पंतप्रधानांना विषयाची पार्श्‍वभूमी माहिती नसल्याबाबतही नायडू यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. याप्रश्‍नी मार्ग काढणे शक्‍य असून, पंतप्रधानांनी आणि वेळ पडल्यास सोनिया गांधींनीही यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र उभारत असलेले बाभळी धरण अनधिकृत आहे. या धरणाचे दरवाजे उद्‌ध्वस्त करण्याची गरज आहे. आतापर्यंत लवादाने दिलेले सगळे निर्णय चुकीचे आहेत. केंद्रीय जलस्रोतमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर अशा प्रकारे मार्ग काढता येणार नाही, असे केलेले वक्‍तव्यही चुकीचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये मार्ग काढण्याची तयारी दाखवावी, असे नायडू यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप नायडू यांनी केला. "आम्ही हस्तक्षेप केला नसता तर तुम्हाला जीव गमवावा लागला असता,' असे मुख्यमंत्री रोसय्या यांनी नायडू यांना सांगितले होते. यावर बाभळीच्या पाण्यासाठी शहीद होण्याची माझी तयारी असल्याचीही मल्लिनाथी नायडू यांनी या वेळी केली.

आंध्र विधानसभा पोटनिवडणुकीनंतरही बाभळीच्या प्रश्‍नावर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय नायडू यांनी घेतला आहे. बाभळी आंदोलनाला आंध्रातील जनतेकडून प्रतिसाद मिळाल्याने हे आंदोलन वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
रोसय्यांचे चंद्राबाबूंवर टीकास्त्र
हैदराबाद - बाभळी बंधाऱ्याच्या मुद्याप्रकरणी थेट पंतप्रधानांवर आरोप केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली आहे. चंद्राबाबूंच्या आरोपांत तथ्य नसल्याचे रोसय्या यांनी म्हटले आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांपुढे आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे नायडू यांनी बाभळी प्रकरणी पंतप्रधांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत काही अर्थ नसल्याचेही रोसय्या यांनी म्हटले आहे.

Follow
Us on
Twitter
प्रतिक्रिया
On 7/28/2010 4:32 PM महेश कुलकर्णी डोंबिवली said:
वाद सुप्रीम कोर्टात आहे,मुळात प्रश्न काहीच नव्हता ,चंद्राबाबू आले आणि राजकरण करून व डिवचून केले,स्वताच्या अस्तीवासाठी त्यांनी प्रयत्न केला एवढेच ,
On 7/28/2010 2:08 PM Mallu said:
आरे चंदू तू कोणता प्रश्न सोडवला आहे काय कधी ??
On 7/28/2010 10:00 AM अतुल जोशी said:
पण मुळात प्रश्न निर्माण केलाच कशाला?...निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच ना?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: