Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एकटेपणा...परदेशातला...
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 09:16 PM (IST)
नवा देश. नवा प्रदेश. नवी भाषा. नवी माणसे... परदेशात पोहोचल्यावर पहिल्या काही दिवसांत येतो विलक्षण भांबावलेपणा आणि पाठोपाठ एकटेपणा. परदेशात कोणत्याही निमित्ताने पोहोचल्यानंतर स्थिरावायचे असेल, तर सर्वप्रथम मात करावी लागते, ती एकटेपणावर. सांगतेय परदेशातील मराठी तरूणाई:

शिकण्यासाठी अवघे जग...
यशोधन गोखले (जर्मनी)
(yashodhan_gokhale@yahoo.com)

स. प. महाविद्यालयात असताना मोठमोठ्या शास्त्रज्ञांबद्दल वाचले. त्यांच्या कामाबद्दल वाचले. तेव्हा मनोमन ठरवले, की आइन्स्टाईन, मॅक्‍स प्लॅंक यांसारख्या अनेक थोर व विज्ञानाला वाहून घेतलेल्या महागुरुंच्या मायदेशी जायचे आणि तेथे शिक्षण घ्यायचे. मी एका मध्यमवर्गीय घरातला. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. (फिजिकल केमिस्ट्री) केले. त्यानंतर 'एनसीएल'मध्ये (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) काम केले. परदेशात पीएच.डी. करायची असे ठरविले. मला कर्ज न काढता शिकायचे होते. स्वतःची शैक्षणिक पात्रता सिद्ध करून स्टायपेन्ड किंवा फेलोशिप किंवा स्कॉलरशिप मिळवायची होती. शेवटी एके दिवशी जर्मनीतील मग्देबुर्ग या शहरातून उत्तर आले. मग्देबुर्गमधल्या ओट्टो वॅन शुरीके विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला. पीएच.डी.चा विषयही माझ्या आवडीचा होता, म्हणजे नॅनोपार्टिकल्सचा अभ्यास व त्यांचा उपयोग. शिवाय स्टायपेन्ड मिळणार होते. बस, ठरवले ही संधी घ्यायची.
इथे आलो, तेव्हा मग्देबुर्ग या शहराबद्दल तशी काहीच माहिती नव्हती. पोहोचलो तेच खूप विचित्र अशा वेळी. पुणे ते मग्देबुर्ग हा बदल खूप मोठा होता. मी पोहोचलो तो दिवस होता शुक्रवारचा. त्यात जानेवारीतली प्रचंड थंडी. त्यामुळे दुपारी ३- ४ वाजताच दिवस संपायचा. खरोखर दुपारी चार वाजता अंधार पडायचा. शनिवारी दुकाने संध्याकाळी पाचला बंद व्हायची आणि रविवारी सर्वच बंद. विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये एक महिना राहिलो. आयुष्यात पहिल्यांदा एकटेपणाला सामोरा जात होतो. विलक्षण थंडी आणि अनोळखी शहर. पहिल्या काही दिवसांत हा एकटेपणा खूप जाणवला. मग हळूहळू त्यावर मात करायला शिकलो. भाषेपासून सुरवात झाली.

मग्देबुर्गमध्ये २००६ मध्ये आलो, तेव्हा फारच कमी लोक इंग्रजी बोलायचे. सर्व व्यवहार जर्मन भाषेत. प्रचंड अवघड गेले. एकटेपणा अंगावर येऊ लागला होता. आता आठवले, की गंमत वाटते; पण तेव्हा मात्र डोळ्यात पाणी आले होते. एकदा केस कापायला म्हणून गेलो. पुरेसे जर्मन येत नव्हते. 'मूकाभिनय' करून सांगितले, की कसे व केवढे केस कापायचे. शेवटी पाहिले तेव्हा, 'रूप' पारच पालटून गेले होते! मग एका जर्मन मैत्रिणीने जर्मनमध्ये लिहून दिले. पुढच्या खेपेला तिने लिहून दिलेले घेऊन गेलो, तेव्हा केस मनासारखे कापले गेले! त्यावेळी जाणवले, इथली भाषा थोडी तरी शिकणे गरजेचे आहे. मात्र जसजसा मी मग्देबुर्गमध्ये रमू लागलो, तसतसे जाणवले, की माणूस महत्त्वाचा. थोडे जर्मन, थोडे इंग्रजी असे बोलून मी खूप मित्र मिळवले. अगदी मनापासून मैत्री करणारे मित्र! तेव्हा मैत्रीचा, एकच दुवा होता आमच्यात. अनेक देशांतील मित्र भेटले. तोडकेमोडके इंग्रजी व जर्मन बोलत आम्ही संभाषण साधत असू. मित्रांमुळे एकटेपणा दूर पळायला सुरवात झाली.

शिकण्यासाठी म्हणून तुम्ही परदेशात गेला असाल; तर खूप गोष्टींमध्ये लक्ष घालावे लागते. प्रवास हा त्यापैकी एक. विश्‍वासार्ह आणि स्वस्त प्रवास कसा मिळवावा, हा एक शिकण्याचा मोठा भाग. ट्रामच्या पुस्तिका पाहणे, त्यात लिहिलेल्या वेळेला; अगदी अचूक येणाऱ्या ट्राममधून शहर भटकणे, हा वेळ मजेत घालवण्याचा क्षण. हाती असलेल्या वेळात प्रवासाची इतर साधनेही शिकून घेता येतात. माझ्या भटकंतीत मला आपल्याकडच्या शेअर टॅक्‍सीसारखा प्रकारही मिळाला आणि मुख्यत्वे या प्रवासात कधीही अनुचित प्रकार घडल्याचे ऐकिवात नाही. एकटपेणा वाटू नये म्हणून मी प्रवासाचे असे वेगवेगळे प्रकार अनुभवले !

नवीन शहरात रुळायचे असेल, तर शहर पूर्ण माहिती करून घ्यायला हवे. तुम्हाला हव्या त्या गोष्टी नेमक्‍या कुठे मिळतात; याची माहिती व्हायलाच हवी. ही माहिती घेताना वेळ तर छान जातोच; शिवाय तुमच्या मनासारखी चीज मिळाल्यावर होणारा आनंदही अनुभवता येतो. आपल्या खाण्याच्या सवयी इथल्याहून तशा खूप वेगळ्या. मग्देबुर्गमध्ये बरेच उत्तम मॉल्स आहेत. सर्वांत स्वस्त म्हणजे पेनी. या मॉल्समध्ये भाजीपासून घरातल्या सर्व छोट्या गोष्टी मिळतात. येथे सेकंडहॅंड शॉप्ससुद्धा आढळतात. स्वस्त; तरीही मस्त! हे मॉल्स शोधणे, तेथे शॉपिंग करणे आणि हवी ती चीज मिळवणे हा अनुभव म्हणजे वेळेचा छान सदुपयोग.

एकटे राहत असताना विम्याचे संरक्षण हे हवेच. विशेषतः विद्यार्थी म्हणून राहताना. जर्मनीमध्ये गेल्यावर इन्शुरन्सचे चांगले पर्याय शोधणे हा मोठा प्रश्‍न होता. डीएके, एओके, टीके अशा काही उत्तम इन्शुरन्स कंपन्या मित्रपरिवाराच्या मदतीने शोधून काढल्या. मुख्य म्हणजे तुमच्या आजारपणात वा रुग्णालयात असताना तुम्हाला एक युरोदेखील भरावा लागत नाही. सर्व काळजी इन्शुरन्स कंपनी घेते, हेही वेळोवेळी अनुभवले.

आणखी एक गोष्ट म्हणजे फोन. कोणती सर्व्हिस स्वस्त; तिचे फायदे कोणते, हे ही शोधून काढायला हवे. मी अशीच शोधाशोध केली, तेव्हा फोनकरता 'ओ२' या सर्व्हिसचे प्लॅन सोयीचे पडतात, हे लक्षात आले. 'ओटू' टू 'ओटू' फ्री असल्यामुळे माझा ओळखीचे बरेचजण हीच सेवा वापरत. अशा इतरही असतील. फक्त एवढेच, की जे मी वापरले त्याचा मला अनुभव चांगला आला, म्हणून सांगितला.
(शब्दांकन: अश्विनी देशपांडे-गोखले)
--------------------------------

एकटेपणाचा 'आस्वाद'
ललित महाडेश्‍वर (अमेरिका)
(lalit@saterisystems.com )
न्यूझीलंडने मला प्रथमच एकटे केले, शांत केले आणि मनस्वी केले. मला ज्या अनेक गोष्टी दिल्या, त्यातील सर्वांत सुंदर गोष्ट होती 'एकटेपणा.' नवीन वाचण्याची आणि शिकण्याची ऊर्मी दिली. भारतात लहानाचा मोठा होताना एकटा पडण्याचा प्रसंग सुदैवाने किंवा दुर्दैवाने कधीच आला नाही. आई नेहमी घरी असल्यामुळे व शेजारधर्माच्या अतीव श्रद्धेपोटी मला साधा चहाही कधी करावा लागला नव्हता. मुंबई सोडून हॉंगकॉंगमध्ये राहताना मला फारसा फरक जाणवला नाही; कारण मुंबईसारखेच हॉंगकॉंग हे ब्रिटिशांनी वसवलेले महानगर होते. त्याची नाडी ओळखायला वेळ लागला नव्हता. लवकरच अनेक मित्र मिळवले. हिऱ्याच्या एका जैन व्यापारी मित्राकडे स्वतःचा 'महाराज' होता. त्यामुळे खाण्या- पिण्याची; विशेषतः संकष्टीची सोय व्यवस्थित झाली व नव्याची नवलाई चाखण्यात सहा महिने भुर्रकन उडून गेले.

पण जगाच्या एका कोपऱ्यात एकटे पडलेल्या न्यूझीलंडच्या आकर्षणाने तिथली नोकरी स्वीकारली आणि प्रथमच एकटेपणाचा 'आस्वाद' मिळाला. वेलिंग्टन शहर हे माझ्या तोपर्यंतच्या सर्व कल्पनांना तडा देणारे होते. सगळेच अनुभव पूर्णतः नवीन होते. शहर हे टोलेजंग इमारतींशिवाय छोट्या-छोट्या घरांनीही आणि त्यांच्या भोवतालच्या सुंदर अंगणांनी बनलेले असू शकते, इथून सुरवात होती. माझे सुरवातीचे काही तास आणि दिवस हे त्या अथांग पसरलेल्या हिरव्या कुरणांमध्ये राजधानीचे शहर शोधण्यात गेले. आतापर्यंत केलेल्या विविध विषयांच्या व्यासंगाचा 'अहं' प्रथमच हलला होता. मुंबईशिवाय इतरत्र जगण्याला फारसा अर्थ कसा असू शकेल या प्रत्येक मुंबईकराच्या ठाम समजुतीचा पाया सैल पडू लागला. जबरदस्त मानसिक जेटलॅगमधून बाहेर पडल्यावर तिथल्या निसर्गसान्निध्यात मोठ्या झालेल्या अनेक मोठ्या मनाच्या माणसांशी संपर्क येऊ लागला. 'साधी माणसे' या चित्रपटासारखी खरोखरच माणसे मोकळेपणाने मदतीला तत्पर होती. सावध कोणीच नव्हते. चोहीकडे नैसर्गिक विपुलता होती; पण आर्थिक सूज नव्हती. मध्यमवर्गीयांनी वसवलेल्या या नव्या भूमीत अनेक नवीन प्रयोग साकार होत होते. मतलबी कोलाहलाने कंटाळून त्याच्यापासून जास्तीत जास्त दूर जाण्याच्या मनीषेने अनेक लोक आपला देश सोडून तिथे आली होती. नव्या सामाजिक कल्पनांना आकार द्यायला.

नंतरचे अनेक दिवस ययातीसारखे निसर्गसौंदर्य उपभोगण्यात गेले. शुक्रवारी संध्याकाळी बाहेर पडल्यावर दिशाहीन फिरण्यात गेले. ते रस्ते इतके सुंदर होते, की आम्ही पूर्ण दिवस नुसते नागमोडी रस्त्यांवरून, दऱ्या- खोऱ्यांतून फिरत काढत असू. कुठल्यातरी वळणावर थांबून नजरेने तो नजारा टिपायचा एवढेच काम. सोबत सुंदर कविता आणि गाणी. कुठेतरी थांबून मस्त ताजे गावरान जेवण! तिथे बरेच शिकत होतो. त्या पूर्णपणे अलिप्त असलेल्या अल्लड बाळभूमीने मानवाच्या अनेक ऐतिहासिक वर्णनांचीच पुष्टी केली. धगधगणारे भूकवच, खच्चून भरलेले तारांगण, उत्साहाने वाहणाऱ्या नद्या आणि महाकाय देवमाशाने प्रशांत सागरात मारलेली डुबकी दाखवली. दुसऱ्या महायुद्धावरून परतलेल्यांची मानसिकता त्यांनी साकारलेल्या विश्‍वात डोकावत होती.
--------------------------------

एकटेपणा मानण्यावर आहे
कौस्तुभ सोमण (अमेरिका)
(somankaustubh@gmail.com)
या ऑगस्टमध्ये मला आता अमेरिकेला येऊन चार वर्षे होतील; पण मी खूप एकटा आहे असे मला कधी जाणवले नाही किंवा मी कधी एकटा पडलोच नाही; कारण एकटेपणा हा मानण्यावर आहे आणि मी तो कधी मान्यच केला नाही.

खरे तर, सध्याच्या इन्फोटेक आणि कम्युनिकेशनच्या युगात तुम्हाला एकटेपणा हवा असेल तर त्यासाठी विशेष वेगळे प्रयत्न करावे लागतात, इतके तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकता. मी नियमितपणे माझ्या पुण्यातल्या घरी स्काईपवरून व्हिडिओ चॅट करतो. आई- बाबांनासुद्धा मग मी समोर हलता बोलता दिसत असल्यामुळे, फार लांब गेलोय असे वाटत नाही. रिलायन्स, एअरटेल किंवा अशा अनेक कंपन्यांच्या कॉलिंग कार्डसमुळे भारतात माफक दरात फोन करता येतात. आजकाल सगळे लोक सोशल नेटवर्किंग साईटसचा भरपूर वापर करत असल्यामुळे फेसबुक, ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटरसारख्या वेबसाइट्‌सच्या माध्यमातूनही तुम्ही लोकांच्या संपर्कात राहू शकता. हे सगळे पर्याय आहेतच; पण शेवटी कॉम्प्युटर किंवा टेक्‍नॉलॉजी या निर्जीव वस्तू आहेत, त्यामुळे एक वेळ अशी येते, की एकटेपणा घालवायला आसपास माणसेच लागतात. अर्थात, त्याचीही इकडे काही कमतरता नाही... कोकणाचा कॅलिफोर्निया झाला नाही; पण कॅलिफोर्नियाचा कोकण झाला म्हणतात ते खोटे नाही. कॅलिफोर्नियाच काय तर इकडे टेक्‍सास, शिकागो, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन डीसी; म्हणाल तिकडे भरपूर मराठी माणसे भेटतात. अशा प्रत्येक ठिकाणी अनेक वर्षांपासून चालत आलेली मराठी मंडळे असतात. तिकडचे लोक असतातच की!

स्वतःचे घर सोडले, की एकटेपणा वाटायचाच; पण तो घालवायचे मार्गपण अनेक असतात, कारण एकटेपणा वाटत असलेले आपण एकटेच नसतो. असे अनेक 'एकटे' तुम्हाला इकडे भेटतात. देश असो वा परदेश, ज्याला एकटेपणा घालवायचा आहे, तो कुठेही मार्ग शोधून काढतो आणि ज्याला नाहीच घालवायचाय तो गर्दीत राहूनही एकटाच असतो.
--------------------------------

ब्लॉगिंग आणि ड्रम्स्‌ !
शंतनू देव (कॅनडा)
(shantanu.deo@gmail.com )
'कंटाळ्याचादेखील जेव्हा मला कंटाळा यायला लागला' आणि 'काही बोलायाचे आहे..' म्हणून मी स्वतः:शीच बोलायला लागलो, तेव्हा मी ब्लॉगवर लेखन सुरू केले. विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. एकटेपणा म्हणजे नवीन कल्पनांचे जन्मस्थान आणि त्याला व्यासपीठ मिळाले ब्लॉगचे. कधी कधी खूप निराश वाटायचे; पण मग स्वतःलाच समजवायचो, की हीसुद्धा एक संधी आहे; नवीन काही करायची, काही शिकायची!

बरीच वर्षे 'क्वांटम थिअरी' शिकायची होती. त्यावरची होती- नव्हती ती सगळी पुस्तके वाचून काढली आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ड्रम्स शिकण्याचे माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रम्स घेतले आणि शिकायला सुरवात केली.
--------------------------------

एकटा जीव सदाशिव!
डॉ. भारत करडक (ऑस्ट्रेलिया)
(bharat78@gmail.com)
सन २००० मध्ये एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पूर्ण करून एक-दोन छोट्या मोठ्या नोकऱ्या करून, सिप्ला या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये संशोधन आणि विकास (आर ऍण्ड डी) विभागात मी रुजू झालो. कुशल मार्गदर्शक डॉ. सतीश गौड आणि ज्येष्ठ सहकारी सुर्वेसाहेब, केळकरसाहेब, म्हस्केसाहेब यांच्या हाताखाली, नवीन कामाचे स्वरूप समजावून घेऊन प्रचंड मेहनत केल्याने त्यांनी मला पीएच.डी. करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दीड वर्षे अर्ज- विनंत्या झाल्यानंतर जुलै २००२ ला पीएच.डी.साठी युरोपमधील स्पेनमध्ये, सॅन सेबॅस्टियन शहरात जाणे निश्‍चित झाले.

विद्यापीठात न्यायला प्रोफेसर स्वतः आले. शहराची ओळख अन्‌ सुरक्षिततेसाठी काही नियम प्रोफेसरांनी सांगितल्यानंतर आम्ही विद्यापीठात गेलो. विभागप्रमुख, अन्य प्राध्यापक अन्‌ सहकाऱ्यांची ओळख करून दिल्यानंतर इमारतीतील अन्य विभागांना भेट दिली. प्रयोगशाळा अपेक्षेप्रमाणे सुसज्ज होती. मुबलक रसायने, त्वरित पृथःकरण करण्यासाठी तंत्रज्ञ आणि उपकरणे, ऑनलाइन वाचनालयात संशोधनासाठीची तीनशेहून अधिक नियतकालिके, असा प्रशस्त लवाजमा होता. अपवाद वगळता (सुरक्षेचे नियम/ योग्य प्रशिक्षण प्राप्त केले नसल्यास) सर्व उपकरणे वापरता येत होती. नवीन उपकरणे आणि प्रणाली शिकण्यासाठी सहकारी तत्परतेने मदत करत होतेच. सगळे काही मजेत सुरू झाले होते!

प्रयोगशाळेतील जीवनाखेरीज बाहेरचे 'विकेंड लाइफ' अन 'नाईट लाइफ'शी जुळवून घ्यायला सहकारी मदतीला होतेच! संपूर्ण विद्यापीठात आणि शहरात एकमेव भारतीय असल्याने भयानक एकटा असल्याची जाणीव होत होती; परंतु तेथील एका प्राध्यापकाने सुरवातीला त्याच्यासोबत शहराच्या आसपासची सर्व प्रेक्षणीय स्थळे त्याच्या कुटुंबासोबत फिरवून आणली. प्रयोगशाळेत सात वेगवेगळ्या देशांचे वीस सहकारी होते. त्यातूनच मग, संध्याकाळचे सहभोजन हा एक सोहळा ठरू लागला. अनेकांचे जेवण बनवण्याचे कच्चे-पक्के प्रयोग एकत्रित 'एन्जॉय' करू लागलो. वसतिगृहातील सहकारीदेखील, 'वीकेंड' वा सुटीच्या दिवशी एकत्रितपणे सुटी साजरी करू लागलो. संशोधनामुळे फार शक्‍य झाले नाही; परंतु, अनेक सहकाऱ्यांच्या घरी किंवा शेतावर जाऊन स्पॅनिश लोककला, लोकजीवन आणि शेतीबद्दल माहिती मिळू शकली. तेथील लोककला, खान-पान संस्कृती, शिक्षण, समाज, आरोग्य, वाहतूक, पर्यटन अशा दैनंदिन जीवनातील अनेक पैलू पाहता आले. पाच दिवस काम आणि दोन दिवस धमाल अशा समतोल कार्यपद्धतीने अभ्यास, संशोधन आणि सामाजिक जीवनाचा आनंद लुटता आला. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया, इटली असे आसपासचे देश पाहता आले. अनेक देशांतील विद्यार्थ्यांशी संवाद करता आला आणि त्यातून कायमस्वरूपी मित्र निर्माण झाले. आज आठ वर्षांनंतरही युरोपमधील अनेक मित्र इ-मेलच्या माध्यमातून संपर्कात आहेत.

प्रथम एकटा निघालो तेव्हा मनात शंकांचे काहूर निर्माण होते; पण जसजसे तिथल्या समाजजीवनात रमत गेलो, तसतसे आयुष्य अनुभवसंपन्न होत गेले. दोन भिन्न जीवन-शिक्षण पद्धतींचा अनुभव घेता आला हे सर्वांत महत्त्वाचे. स्वावलंबन, स्वातंत्र्य, साधनांची मुबलक उपलब्धता, सार्वजनिक स्वच्छता, पारदर्शक कारभार अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अडचणींवर मात करत प्रवास करत गेलो म्हणून, तर करडकवाडीसारख्या शंभर लोकवस्तीच्या गावातील एक भारत, एक डझनाहून अधिक देश फिरला हेच नवल!

प्रतिक्रिया
On 7/29/2010 1:22 AM kdchitnis said:
एकटेपणाची वरील उदाहरणे परदेशात करिअर किंवा अभ्यासासाठी जाणारांची आहेत.वयस्कर मंडळींना बहुधा मुलाकडे नातवंडे सांभाळण्यासाठी जाण्याची पाळी येते.जर दोघे असतील तर ठीक पण एकता दुकटा जीव असेल तर त्याची कोंडी होते मग तो पुरुष असो कि स्त्री!परदेशात लादल्या गेलेल्या एकटेपणा बरोबर अवलंबित्व हे जास्त जाचक!पाश्च्यात्य देशात जाणाऱ्यांची व तिथेच स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतीय.तिथेच राहणाऱ्या आईवडिलांना तेथील एकटेपण जाचते कारण भारतीयांना त्याची सवय नाही.मग ये जा करणे हा पर्याय क्रमप्राप्त ठरतो!
On 7/29/2010 12:34 AM sushama Kalyankar said:
परदेशात एकटेपणा जाणवतो ,खरे आहे पण त्यावर मात करणे हेही गरजेचे आहे .माझी दोन्ही मुले अमेरिकेत आहेत ,मला पण भारतात एकटेपणा जाणवतं होता ,आता जाणवत नाही.पाच वर्षे झाली.ही श्रीची इच्छा असे मानते. .. .......एक आई
On 7/29/2010 12:29 AM Raj said:
इथे ग्रीस मध्ये खूप आपुलकी मिळाली भारतापेक्षा जास्त मित्र इथे बनले may be becoz i m very social so it depends on u guys to be alone or to be in the sea...even here i found no-one from india i m still enjoying my life like india the people here r so helping so kind and they respect us if we respect them....I love it here in the friends i dont even miss he family n friends from india.........thanx god
On 29/07/2010 00:29 SAHEB said:
खरच..खूप कठीण आहे परदेशात एकटे राहणे..दर मिनिटाला आपल्या देशाची, गावाची, नातेवायाकांची आठवण येत असते....फ्रोम नॉर्वे
On 7/29/2010 12:22 AM kajal & Vikas, BELGIUM said:
हो मित्रंहो खरच बाहेर विदेशात एक्ठेपणा वाटतो . परंतु इकेदा तरी परदेशात येऊन परदेशी अनुभव घ्यायला पाहिजे....
On 7/29/2010 12:20 AM TUKATAM BODKE said:
कोणीतरी माझ्या मनातले बोलले वाचून आनंद ZHALA पण काहीही JHALE तरी AAY लोवे MY इंडिया
On 7/29/2010 12:06 AM Arun Bagve said:
छान लेख आहे ...:-)
On 7/28/2010 11:51 PM deshpremi said:
परदेशातील एकटेपणा हा खूपच वाईट आहे , अगदी मानसिक विकार उदभवू शकेल येवढा सुद्धा आहे , येथे मानसिक रुग्ण जास्त का आहेत , depression सारख्या समस्या अगदी खूप common आहेत कारण सामाजिक एकटेपणा आणि जीवघेणी थंडीतील एकटेपणा !ब तरी फोन, एमैल , chatting यामुळे संपर्क राहतो पण त्यात जिवंतपणा नाही सर्व रुक्ष , आणि एक विशेष त्यात emotinal देवाणघेवाण होत नाही कि सर्व माणूस नावाच्या प्राण्याला हवी असते
On 7/28/2010 11:36 PM Rupesh said:
@ हनुमंत: खूप छान यार... खरच खूप छान वाटले तुझी प्रतिक्रिया वाचून... कारण मी पण एक BA Graduate आहे.
On 7/28/2010 11:07 PM संजय, कॅनडा said:
अगदी खरे आहे.. परदेशातील एकटेपणा अक्षरश: जीवघेणा ठरतो त्यातून हिवाळ्यात आपणच काय इथले गोरे देखील वैफल्यग्रस्त होतात इकडे येताना मला पूर्ण आत्मविश्वास होता पण हिवाळ्यात तो पूर्ण ढासळला.अशावेळी तुमचे छंदच काय जेवणाची उर्मीही नाहीशी होते आत्महत्येच्या आधीची मनस्थिती अशी असते म्हणतात म्हणूनच येथे मानसोपचार तज्ञांचे ४-५ जणांचे पथक मोफत कौन्सेलिंग करते. आपण मायभूमीत परत जाणे खूपच अवघड आहे हि जाणीव खूप अस्वस्थ करायची पण आता विविध देशातील अनेकांबरोबर चांगली गट्टी जमली आहे.. अगदी भारतातल्या सारखीच...
On 28-07-2010 23:03:20 ek marathi said:
बाहेर जाऊन पण मराठी शी नाळ तोडली नाही छान वाटलं.. मराठी माती ला विसरू नका...
On 7/28/2010 10:49 PM Arun said:
बाहेर राहणारांसाठी लेख चांगला आहे.
On 7/28/2010 10:48 PM hanumant said:
मला अमेरिका मध्ये येवून आत्ता ५ वर्षे झाली. सुरुवातीला bachelors केली आणि नंतर MBA. सुरुवातीला मला इंग्रजी इतके चांगले जमत नवते, मी १२ कला शाकेचा विद्यार्थी, तोही मराठवाडा मध्ये एका छोट्या गावात वाढलेला, त्यमुळे malls, shopping, social networking sites, मध्ये इतकी रुची नसे. परंतु मला इंग्रजी शिकण्याची आणि बोलण्याची खूप इच्छा त्यमुळे मी अमेरिकन मित्रासोबत राजकाराण, चित्रपट, आणि संस्कृती वर तोडक्या इंग्रजीमध्ये गप्पा मारत असे. एक वर्षामध्ये मला उत्तम इंग्रजी जामैला लागले, वेळ पण जावू लागला.
On 7/28/2010 10:45 PM subhash said:
फार समाधान वाटले मी पण उगांडा मध्ये आहे हर्दिंक अभिनंदन.....
On 7/28/2010 10:18 PM Abhi said:
एकटेपणा हा नेहमी चांगला असतो विचार करायला वेळ मिळतो. शिवाय दुसर्याची किमत समजते.जे भारता मध्ये शक्य नाही. २५ वर्ष पर्यंत एकटे राहणे चांगले त्यांत प्रगती होते शिवाय लवकर स्थिरता पुढील आयुष्यासाठी येते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: