सीमाप्रश्नी शिवसेनेची संसद प्रवेशद्वारावर धरणे
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Wednesday, July 28, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - बेळगाव-कारवार-हुबळीचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत शिवसेनेच्या सात खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर आज धरणे आंदोलन केले. लोकसभा व राज्यसभेतही या मागणीसह बाभळी बंधाऱ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदारांनी घोषणा दिल्या.
सीमाप्रश्नी विविध फलक हाती घेऊन हे खासदार सकाळी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. त्यांनी दणकेबाज घोषणा देऊन संसदेत येणाऱ्या खासदार, मंत्र्यांसह तमाम पत्रकारांचेही लक्ष वेधले. राज्यसभेतील गटनेते मनोहर जोशी, संजय राऊत व चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खासदार गणेश दुधगावकर, आनंदराव अडसूळ, गजानन बाबर, प्रताप जाधव हेही त्यात सहभागी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार समीर भुजबळ हेही आमच्यात सहभागी झाले होते. काही वेळाने ते तेथून लोकसभेत गेल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले.
श्री. जोशी यांच्या नेतृत्वाखाली या खासदारांनी नंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. सीमाप्रश्न व बाभळी बंधाऱ्याच्या मुद्द्यावर संसदेत शिवसेना आवाज उठविणार आहे. "राष्ट्रवादी'नेही त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन श्री. पवार यांना करण्यात आले. श्री. पवार यांनी त्याला तत्काळ पाठिंबा दर्शविला. शिवसेना लोकसभेत जेव्हा हा प्रश्न उपस्थित करेल, तेव्हा कॉंग्रेससह सर्वपक्षीय मराठी खासदारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. सीमाप्रश्नी कॉंग्रेसचे मराठी खासदार राज्याच्या भूमिकेच्या बाजूने राहतील, असे कॉंग्रेस खासदारांचे समन्वयक एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
राऊत यांचा "आवाज'
राज्यसभेत कामकाज सुरू होताच भाजपने महागाईवरून गोंधळ करण्यास सुरवात केली. त्याच वेळी खासदार संजय राऊत यांनी सीमाप्रश्नी जोरदार घोषणा देत हौदात धाव घेतली. बाभळी बंधाऱ्यावरून घोषणाबाजी करीत तेलगू देसमचे खासदारही या वेळी तेथे आले. राऊत यांच्या हाती सीमाप्रश्नावरील फलकही होता. तो उंचावू नका; ते नियमाला धरून नाही, असे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी बजावले. त्यावर राऊत यांनी आंध्रच्या खासदारांकडे बोट दाखवून, यांचे काय?, असा प्रश्न हातानेच केला. मात्र, त्यानंतर काही क्षणातच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा अन्सारी यांनी केली.