Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आगळगावच्या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 12:01 AM (IST)

सांगली - स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अंजली मधुकर पवार (वय 27 ) यांचा काल रात्री येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा जिल्ह्यातील हा पहिला बळी आहे. आज आणखी एक संशयित महिला रुग्ण आढळली आहे.

श्रीमती पवार तापाने आजारी होत्या. त्यांना येथील भारती इस्पितळात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नुमने पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचार सुरू होते; पण काल रात्री त्यांचे निधन झाले.
पवार यांच्या निधनामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये म्हणून आगळगाव आणि कुची येथील लोकांवर उपचार केले. दरम्यान येथील हरिपूर रस्त्यावरील काळ्या वाट परिसरातील एका महिलेलाही स्वाईन फ्लू झाल्याचा संशय आहे. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या वर्षी जिल्ह्यात स्वाईन फ्लुचे नऊ बळी झाले होते. पुण्या-मुंबईत स्वाईन फ्लुचे थैमान सुरू असताना आपल्याकडे मात्र स्वाईन फ्लुचा विषाणू तग धरू शकला नव्हता. आढळलेले रुग्ण स्थलांतरीत होते. यंदाही आत्तापर्यंत सहा रुग्णांचा पुर्वेइतिहास पुण्या-मुंबईच्या संपर्काचा आहे. तथापि सांगली, मिरजेत रुग्ण आढळल्याने साथीच्या फैलावाची शक्‍यता आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे साथीला अनुकूल स्थिती आहे. रुग्णसंपर्कात आलेल्या सुमारे 1200 जणांना आत्तापर्यंत टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ.शेखर राजदेरकर यांनी केले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: