Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पालिका अधिकाऱ्यांच्या मणक्‍यांना जयंतरावांचे दणके
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 29, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - स्थळ मंत्रालय... वेळ दुपारी 1 वाजताची... लाल दिव्याची गाडी घेऊन मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील सुसाट वेगाने निघतात... सोबत महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारी... अधिकाऱ्यांना काहीच सुचत नसते... गाडी मंत्रालयाबाहेर पडता क्षणीच एका खड्‌ड्‌यात दाणकन आदळते... अधिकाऱ्यांच्या तोंडून सावकाश असा अगदी अदबीने आवाज येतो... तर जयंतराव हसत हसत म्हणतात एक... असे करत करत गाडी एकही खड्‌डा न चुकवता.. एक.. दोन.. तीन.. अशा कित्येक खड्‌ड्‌यांतून धावत असते... प्रत्येक खड्‌ड्‌याच्या दणक्‍याने मणक्‍याला इजा होण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांना सतावत असते... चित्रपटातल्या प्रसंगाला साजेसा हा प्रसंग आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना दाखवून दिला.

मुंबईतल्या रस्त्यात पडलेल्या खड्‌ड्‌यांची जयंतरावांनी पालिका अधिकाऱ्यांना आज प्रत्यक्ष झलकच दाखवून दिली.

त्यांनी मंत्रालयात मुंबईच्या समस्यांबाबत बैठक बोलावली होती. मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव यावर महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर जयंतरावांची गाडी रस्त्यावरील खड्‌ड्‌यांकडे वळली. नेहमीप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्‌ड्‌यांची माहिती देत, सर्व काही सुरळीत असल्याचा दावा अगदी सहजपणे केला; मात्र जयंतरावांना तो पटला नाही. बैठकीतून उठत त्यांनी अधिकाऱ्यांना सोबत येण्याची विनंती केली. मंत्रालयाच्या पायऱ्यावर आल्यानंतर, त्यांनी ड्रायव्हरला खाली उतरण्यास सांगितले. पालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त मनीषा म्हैसकर, आशीषकुमार सिंग व आसिमदास गुप्ता या अधिकाऱ्यांना लाल दिव्याच्या गाडीत घेऊन जयंतरावांनी मरीन ड्राईव्ह रस्त्यावरून अधिकाऱ्यांना "खड्‌डा सफर' घडविली. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यात मुद्दाम गाडी घालत, अधिकाऱ्यांना खड्‌डयांची गंभीरता त्यांनी दाखवून दिली. मंत्रिमहोदयांचा हा पवित्रा पालिका अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आणि साहेब आम्हाला रस्त्यातील खड्‌डे कळले हो, आता दुसऱ्या खड्‌ड्‌यात गाडी घालू नका, अशी विनंती अधिकाऱ्यांनी जयंतरावांना केली.

मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी रस्त्यावरील खड्‌ड्‌यातून धावताना, परदेशातील रस्ते कसे गुळगुळीत असतात याचे किस्सेही जयंतरावांनी अधिकाऱ्यांना ऐकवले. महापालिकेने 30 कोटी रुपयांचा निधी खड्‌डे बुजविण्यास दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील 18 कोटी रुपये खर्चही झाले, असे सांगताच जयंतरावांची गाडी पुढच्या भल्या मोठ्या खड्ड्यातून गेली. यामुळे 18 कोटी खर्चून कुठले खड्‌डे बुजवले, या जयंतराव यांच्या खोल प्रश्‍नाला मणक्‍याला दणका बसलेल्या अधिकाऱ्यांकडे उत्तरच नव्हते.
Follow
Us on
Twitter
 
प्रतिक्रिया
On 7/30/2010 6:36 AM बाजीराव पाटील said:
पाटील साहेब अतिशय चांगले काम केले. आता आणखी एक काम करा ....आमदारांना मिळणारा निधी त्याचे काय केले आणि मंत्र्यांनी ५ वर्ष्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात काय दिवे लावले ते आम्हा भोळ्या जनतेला माहित होऊ द्या.
On 7/30/2010 3:50 AM NATWARLAL R JAIN USA said:
चांगले काम केले अभिनंदन
On 7/29/2010 10:44 AM Deepak Badgujar said:
सर्वांचे लागेबध्ये असल्यामुळे असे खडे पडतात, त्यांचे parcentage बाद करा मंजे सर्व सुरळीत होईल. याला राजकारणी आणि अधिकारी जबादार आहेत. अधिकार्याला घरी बसवा माजणे सर्व कामाला लागतील.
On 7/29/2010 10:15 AM ram said:
गुड.......................................इकदम चांगले काम केले....
On 7/29/2010 9:58 AM sv said:
सर्व मंत्र्यांनी खड्ड्यातून प्रवास करावा म्हणजे कळेल.अधिकाऱ्यांकडून कामे तुम्ही करवून घेणे महत्वाचे आहे. जर ते कामे करत नसतील तर त्यांना नोकरीवरून काढून टाका. जर तुम्ही काहीच करत नसाल तर त्या प्रमाणात जनतेने जो कर दिला आहे तो परत करा. कसे!
On 7/29/2010 8:40 AM arun said:
पाटील साहेबांचे मनापासून अभिनंदन. सरकारी अधिकार्यांना धडा शिकवण्याची जनतेच्या मनातली इच्छा आपण पूर्ण केलीत.मंत्री येतात, जातात, बदलतात, पण या अधिकार्यांना कुठलीच शिक्षा होत नाही.नोकरीवर गदा येत नाही. हे. खड्डा-तंत्र सर्वच मंत्र्यांनी अमलात आणावे .म्हणजे माजलेले हत्ती माणसाळतील.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: