मुंबई - डॉन अबू सालेमने स्वतःच धारदार चमच्याने स्वतःवर वार केले आणि मला मात्र नाहक अडकविले, असा दावा आज गॅंगस्टर मुस्तफा डोसाने किल्ला न्यायालयात केला.
ऑर्थर रोड कारागृहात झालेल्या चमचा हल्ल्याच्या प्रकरणानंतर आज पोलिसांनी डोसाला ठाणे कारागृहात अटक केली. यानंतर त्याला महानगर दंडाधिकारी पी. भांबार्डे यांच्यापुढे रिमांडसाठी हजर करण्यात आले. डोसा व त्याचा साथीदार अब्दुल कय्यूम शेख यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कारागृहात चमचा कसा आला? त्याला धार कशी काढली गेली? हल्ला पूर्वनियोजित होता का? आदी तपास पोलिसांनी करायचा आहे. सालेमवर आपण हल्ला केला नसून, त्याने आपल्याला यामध्ये अडकविले आहे. त्याने स्वतःहूनच त्याच्या साथीदाराकडून चमच्याने हल्ला करवून घेतला आणि माझ्यावर आरोप ठेवला, असे डोसाने न्यायालयाला सांगितले. सालेमला लोणावळ्यात एक जमीन खरेदी करायची आहे. यासाठी त्याला 30 कोटी रुपये हवेत. त्याने ही रक्कम माझ्याकडे मागितली होती; पण मी नाही म्हणालो. याचा आकस ठेवून सालेमने मनीष ठाकूर व उस्मान मेहंदी या त्याच्या साथीदारांच्या साह्याने जखमा करून घेतल्या आणि माझ्यावर आरोप ठेवले, असे डोसा म्हणाला. जर त्याच्यावर हल्ला झाला, तर तो भारतामध्ये सुरक्षित नाही, असे कारण देऊन पोर्तुगाल सरकार पुन्हा त्याचा ताबा घेऊ शकते आणि सालेमला हेच हवे आहे, असा युक्तिवाद डोसाचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला. तसेच सालेमला झालेल्या जखमाही किरकोळ असून, डोसावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप का लावला हे कळत नाही, असेही मर्चंट म्हणाले. सालेम सध्या तळोजा कारागृहात आहे.
Follow
Us on
Twitter