शतकवीर सचिनला रैनाची साथ
वृत्तसंस्था
Thursday, July 29, 2010 AT 01:15 AM (IST)
99 वर सेहवागने पत्करला धोका, लंकेने साधला मोका
कोलंबो - "टीम इंडिया'मध्ये कितीही "आकर्षक' फलंदाज असले तरी "तारणहार' सचिन तेंडुलकर हाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील, मालिकेतील आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान राखण्याचे आव्हान पणास लागले असताना सचिनच्या कारकिर्दीतील 48व्या शतकामुळेच भारताला दिलासा मिळाला. पदार्पण करणाऱ्या रैनाने सचिनपासून प्रेरणा घेतली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 4 बाद 382 अशी मजल मारली आहे.
भारताला आणखी 260 धावांची पिछाडी भरून काढायची आहे, पण 60 धावा करून फॉलोऑन टाळण्याचे प्राथमिक उद्दिष्ट पार केल्यास सिंहलीज स्पोर्टस क्लबच्या खेळपट्टीवर भारताने पराभव जवळपास टाळला असेल. लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना पायचीतच्या सापळ्यात पकडण्याचा सपाटाच लावला. विकेट फेकलेल्या सेहवागचा अपवाद सोडल्यास तिन्ही बळी पायचीतवर घेत लंकेने आव्हान कायम ठेवले.
दिवसअखेर रैना 66 धावांवर नाबाद होता. तो आणि सचिनने पाचव्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी रचली आहे. तिसऱ्या सत्रात लंकेला यश नाकारत या जोडीने मानसिक वर्चस्व मिळविले आहे.
सचिनची खेळी त्याचा लौकिक आणि दर्जाला साजेशी होती. 29 धावांवरील जीवदानाचा अपवाद सोडल्यास त्याने लंकेचे आक्रमण थोपवून धरले. खेळपट्टी फलंदाजीला अजूनही अनुकूल आहे. अशा खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली; पण लंकेच्या गोलंदाजांनी वेग, दिशा आणि टप्प्यात वैविध्य राखत संधी निर्माण केल्या. दिल्शानच्या सरळ चेंडूवर रैनाविरुद्ध पायचीतचे जोरदार अपील फेटाळण्यात आले. यामुळे "टीम इंडिया'चा जीव भांड्यात पडला.
सचिनने दडपणाखाली धीरोदात्त खेळ केला. डाव सावरण्याच्या आशा त्याच्यावरच होत्या. चेंडू वळत नसले तरी लंकेचे फिरकी गोलंदाज ते उसळवीत होते. अशा वेळी सचिनने तमाम अनुभव पणास लावत परिस्थितीशी जुळवून घेतले. चांगले चेंडू पडल्यानंतर सावधपणे बचाव करायचा आणि खराब चेंडू सीमापार पिटाळायचे असे साधेसोपे धोरण त्याने अवलंबिले. त्याने रणदीवला पॉइंट, कव्हर, स्लीप अशा क्षेत्रांतून सात चौकार मारले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने पुढे सरसावत निर्दोष फटका मारला. खेळपट्टी संथ असल्यामुळे सचिनने चेंडू पडल्यानंतर अचूक अंदाज आल्यावरच फटके मारले. शतकाजवळ आल्यानंतर त्याने रणदीवला लक्ष्य केले. त्याने एक षटकार रणदीवलाच मारला. रणदीवलाच स्क्वेअर लेगला स्वीपचा चौकार मारत सचिनने शतक पूर्ण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे आकाशाकडे पाहात बॅट हळुवार उंचावत प्रेक्षकांना अभिवादन केले.
रैनाच्या चेहऱ्यावर पदार्पण करणाऱ्या खेळाडूवरील दडपण जाणवत होते; पण समोर "मास्टर ब्लास्टर' असणे त्याचे सुदैव ठरले. याचा फायदा घेत रैनाने जम बसविला. सचिननेसुद्धा एकेरी धावा काढून रैनाला "स्ट्राईक' सातत्याने मिळेल, याची दक्षता घेतली. मेंडीस आणि रणदीवने "राउंड दी विकेट' मारा करीत रैनाला सुरवातीला अडचणीत आणले. जम बसल्यानंतर मात्र रैनाने या दोघांना पुढे सरसावत मिडॉनला शैलीदार ड्राईव्ह मारले.
सेहवागची निराशा
पहिले सत्र भारतासाठी धक्कादायक ठरले होते. बिनबाद 95 अशा उत्तम सुरवातीनंतर सेहवाग आणि विजयकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. सेहवागने फर्नांडोलो दोन चौकार मारून सुरवात चांगली केली. त्यामुळे विजयलाही आत्मविश्वास आला. या जोडीने 165 धावांची भक्कम सलामी दिली. तेव्हा लंकेवर प्रथमच दडपण आले होते. सेहवाग शतकाच्या उंबरठ्यावर होता. त्यासाठी त्याला एकच धाव हवी होती; पण "बचाव' हा शब्द नसलेली "डिक्शनरी' सेहवागकडे आहे, याची प्रचिती आली. रणदीवच्या पहिल्याच चेंडूवर उंच आणि आक्रमक फटका मारण्याचा धोका सेहवागने पत्करला. त्याचा अंदाज चुकला आणि पुढे सरसावलेल्या सेहवागला प्रसन्न जयवर्धनेने चपळाईने यष्टिचीत केले. वास्तविक त्याआधीच सेहवागला समरवीराकडून जीवदान मिळाले होते, पण त्यातून सेहवागने बोध घेतला नाही.
सेहवागसारखा जम बसलेला फलंदाज अशा पद्धतीने बाद होणे धक्कादायक ठरले. विजयने अर्धशतक पूर्ण केले, पण मेंडीसच्या गुगलीने त्याला चकविले. बॅकफूटवर जाऊन बचावात्मक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचीत झाला. द्रविडच्या खेळात सुरवातीपासूनच शैथिल्य जाणवत होते. पहिल्याच चेंडूवर तो चकला होता, पण रणदीवने त्याला लवकरच बाद केले. आखूड टप्प्याचा चेंडू टाकत त्याने द्रविडला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडले. वळलेला चेंडू मिडविकेटला मारण्याचा द्रविडचा अंदाज चुकला आणि तोसुद्धा पायचीत झाला.
बिनबाद 165 वरून भारताची तेव्हा 3 बाद 173 अशी दुरवस्था झाली होती. आठ धावांत तीन मोहरे गारद झाले होते. साहजिकच सारी मदार लक्ष्मण-सचिन जोडीवर होती. त्यांनी दुसऱ्या सत्रात बचावावर भर दिला. हे सत्र त्यांनी जवळपास खेळून काढले होते; पण लक्ष्मणला पायचीतच्याच सापळ्यात पकडत लंकेने आव्हान निर्माण केले. चहापानाला दहा मिनिटे बाकी असताना मेंडीसने लक्ष्मणचा प्रतिकार संपविला. रणदीव आणि प्रसाद यांना लक्ष्मणचे काही मारलेले फटके सुदैवी ठरले. चेंडू क्षेत्ररक्षकांपासून थोडाच लांब पडला, अन्यथा लक्ष्मणला एवढीही मजल मारता आली नसती.
लक्ष्मण-सचिनने 68 धावांची भागीदारी केली, तरीही भारत 399 धावांनी मागे होता आणि फॉलोऑन टाळण्यासाठी 199 धावांची गरज होती. सचिनला रैना कशी साथ देतो, यावर पुढील भवितव्य अवलंबून होते. सचिनला 29 धावांवर फर्नांडोच्या गोलंदाजीवर प्रसन्न जयवर्धनेने जीवदान दिले होते. चहापानाला सचिन 39 वर खेळत होता, तर रैनाचे खाते उघडले नव्हते.
धावफलक
श्रीलंका - पहिला डाव - 4 बाद 642 घोषित
भारत - पहिला डाव -
विजय पायचीत गो. मेंडीस 58 (194 मिनिटे 124 चेंडू, 8 चौकार)
सेहवाग यष्टिचीत जयवर्धने गो. रणदीव 99 (186 मिनिटे, 101 चेंडू, 15 चौकार)
राहुल द्रविड पायचीत गो. रणदीव 3
सचिन खेळत आहे 108 (181 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार)
लक्ष्मण पायचीत गो. मेंडीस 29 (116 मिनिटे, 98 चेंडू, 2 चौकार)
रैना खेळत आहे 66 (133 चेंडू, 8 चौकार)
अवांतर 19 (बाइज 5, लेगबाय 1, वाइड 4, नोबॉल 9)
एकूण 108 षटकांत 4 बाद 382
बाद क्रम - 1-165, 2-169, 3-173, 4-241.
गोलंदाजी -
धम्मिका प्रसाद 10-0-53-0
दिलहारा फर्नांडो 21-0-83-0
अँजेलो मॅथ्यूज 9-1-24-0
सूरज रणदीव 35-11-108-2
अजंता मेंडिस 26-2-92-2
तिलकरत्ने दिल्शान 7-1-16-0
सचिनच्या शतकांचा बहर
- सचिनची ही 168 वी कसोटी, सर्वाधिक कसोटी खेळण्याच्या स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी.
- सचिनचे हे 48 वे कसोटी शतक, तर 94 वे आंतरराष्ट्रीय शतक.
- श्रीलंकेविरुद्धचे हे नववे कसोटी शतक, यापेक्षा जास्त शतके केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध.
- श्रीलंकेतील हे पाचवे कसोटी शतक, तर आशियाई भूमीतील 32 वे शतक.
- सचिनचे या वर्षातील हे पाचवे कसोटी शतक, एका वर्षात सर्वाधिक पाच शतके करण्याच्या (1999) आपल्या सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी.
- सचिनचे परदेश भूमीतील 27 वे कसोटी शतक.
- सचिनचे सामन्याच्या दुसऱ्या डावातील हे सोळावे शतक. त्याने सर्वाधिक 20 शतके संघाची प्रथम फलंदाजी असताना केली आहेत.
- भारतावर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची वेळ आल्यावरचे सचिनचे हे 15 वे शतक.
- सचिनची एखाद्या मालिकेतील ही 54 वी दुसरी कसोटी, त्यात त्याने 18 शतके केली आहेत. त्याची एखाद्या मालिकेतील सर्वाधिक शतके दुसऱ्याच कसोटीत आहेत. पहिल्या कसोटीत 17, तर तिसऱ्या कसोटीत त्याने आठ शतके केली आहेत.
- सचिनची श्रीलंकेविरुद्धच्या एकंदर 102 सामन्यांत 17 शतके व 21 अर्धशतके.
- सचिनची श्रीलंकेतील एकंदर 55 सामन्यांत 10 शतके व 20 अर्धशतके.