Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महागाईवरून अधिवेशनाचा आठवडा जाणार वाया?
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Thursday, July 29, 2010 AT 12:52 AM (IST)

नवी दिल्ली -  महागाईच्या, विशेषतः गॅस आणि रॉकेलच्या दरवाढीवरून स्थगन प्रस्तावांतर्गत चर्चेची मागणी सरकारने ठामपणे फेटाळल्याने चिडलेल्या डावी आघाडी व भारतीय जनता पक्षासह सर्व विरोधकांनी आजही प्रचंड गोंधळ सुरूच ठेवला. सलग दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. विरोधी पक्ष उद्या (ता. 29) आणखी आक्रमक होतील, असा इशारा भाजपचे संसदीय उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला. त्यामुळे या आठवड्यातील उर्वरित तीन दिवस संसदेचे कामकाज चालण्याची शक्‍यता अत्यंत अंधूक असल्याचे स्पष्ट संकेत भाजप गोटातून मिळाले आहेत.

महागाईच्या विरोधात वातावरण तापविण्याचा विरोधकांचा निर्धार आहे. 5 जुलैच्या भारत बंदच्या यशानंतर विरोधकांना आणखी बळ प्राप्त झाले. संसदेत यावर स्थगन प्रस्तावांतर्गत तर राज्यसभेत नियम 168 अंतर्गतच चर्चा झाली पाहिजे या मागणीवर विरोधक आडून बसल्याने अधिवेशनाचे पहिले दोन दिवस पाण्यात गेले आहेत. सरकारची चर्चेला ना नाही. मात्र, ती स्थगन प्रस्तावांतर्गत करण्यास सरकार बिलकूल तयार नसल्याने विरोधक जाम चिडले आहेत. विरोधक आणखी आक्रमक होणार म्हणजे संसदेची बिहार विधानसभा होणार काय, असा प्रश्‍न मुंडे यांना विचारला असता त्यांनी संसदेची बिहार विधानसभा होणार नसली तरी विरोधकांचे रौद्ररूप सरकारला झुकवेल, असे सांगितले.

डाव्या आघाडीतर्फे उद्या सकाळी संसदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन होणार आहे. लोकसभेत लालूप्रसाद व मुलायमसिंह यांनीही स्थगन प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने भाजपचा हुरूप वाढला आहे. भाजप आघाडीतर्फे डाव्या पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी शरद यादव यांच्यावर टाकण्यात आली असून, आज त्यांनी डाव्यांसह मुलायम व लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली. उद्या कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यासह सर्व पक्षनेत्यांची चर्चा होईल व रणनीती आखली जाईल, असे मुंडे यांनी सांगितले. स्थगन प्रस्ताव नाकारण्याचा लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांचा निर्णय अतिशय दुर्दैवी होता, अशा शब्दांत मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार विरोधक उद्याही संसदेचे कामकाज चालू देणार नाहीत. शुक्रवारी खासगी विधेयकांचा आणि आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने बहुतांश खासदारांना घरी पळण्याचे वेध लागले आहेत. साहजिकच शुक्रवारीही संसदेचे कामकाज चालण्याची शक्‍यता अंधूक मानली जाते. म्हणजेच महागाईच्या मुद्यावरून अधिवेशनाचा पहिला संपूर्ण आठवडा वाया गेल्यात जमा आहे. पुढच्या आठवड्यात सरकार व विरोधक हट्टांवरच ठाम राहिले तर? राजकीय वर्तुळातील कानोसा घेता अंतिमतः विरोधकांना आपल्या हट्टाला मुरड घालावी लागेल व सरकारला त्यात यश येईल, असेही मानले जाते.

राज्यसभेतही गोंधळ

राज्यसभेत आज भाजपचे नंदकुमार साई यांचा शपथविधी होताच गोंधळाला प्रारंभ झाला. भाजपचे सदस्य महागाईविरुद्ध घोषणा देत वेलमध्ये धावले. त्यांना समाजवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांनीही साथ दिली. "कृपा करून सारे जण एकाच वेळी बोलू नका,' असे सांगून थकलेले अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी भाजप नेते अरुण जेटली यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. मात्र, विरोधकांचा प्रचंड गोंधळ सुरूच राहिला. गोंधळात बोलण्याची सवय नसल्याने जेटलीही पार गोंधळून गेले. सभागृहाचे कामकाज प्रथम 12पर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या तरी कामकाज चालू द्यावे यादृष्टीने अन्सारी व उपाध्यक्ष रहमान खान यांनी सरकार व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. तथापि, दोन्हीही पक्ष आपापल्या मुद्यावर ठाम राहिल्याने उद्याचे कामकाज चालण्याबाबत शंका व्यक्त होत आहे.

Follow
Us on
Twitter

 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: