मुंबई - महाराष्ट्रात सध्या सुरू असेल्या कॉंग्रेसअंतर्गत निवडणुकांमध्ये गटबाजीने डोके वर काढले आहे. विशेषतः काही जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकांमध्ये खासदार विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष सुरू आहे. पुणे जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळी काल झालेल्या हाणामारीमुळे कॉंग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पुण्यातील प्रकरणात मार देणाऱ्याला आणि मार खाणाऱ्याला दोघांनाही निलंबित केले आहे, त्याबद्दलही पक्षात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेपासून जुन्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, नेत्यांमधील गटबाजीचेही त्यात पडसाद उमटल्याचे बोलले जात आहे. पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या निवडणुकीपासून आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे या केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या समर्थकांना दूर ठेवल्याची चर्चा आहे. कोल्हापूर जिल्हा व रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या बहुमताने निवडी होऊनही या दोन्ही ठिकाणी फेरनिवडणुका घेण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत गेल्याचे समजते. विदर्भातील नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आपापल्या समर्थकांना पदे मिळण्यासाठी खासदार, आमदार, माजी पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरू आहे. मीरा-भाईंदर, नवी मुंबई ठाण्याचेही वाद उफाळून आले आहेत.
मुंबईत सहापैकी खासदार मिलिंद देवरा यांच्या दक्षिण मुंबई व खासदार एकनाथ गायकवाड यांच्या दक्षिण-मध्य जिल्हा अध्यक्षांच्या निवडी झाल्या आहेत. अजून तीन जिल्ह्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. मुंबईतही अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा गट विरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांचा गट असा संघर्ष सुरू आहे. गटबाजी, हाणामाऱ्या, चुरस यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता पक्षातील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
Follow
Us on
Twitter