मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा विध्वंसक नव्हे, तर विधायक कामावर लक्ष केंद्रित करणारा पक्ष आहे. त्यामुळे भावना भडकवून राजकारण करणाऱ्या 'मनसे'चे आव्हान राष्ट्रवादी मानत नाही, असे मत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज व्यक्त केले. पक्षाच्या मुख्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सूत्रे घेतल्यानंतर दोन महिन्यांत पक्षसंघटनेच्या कामकाजाचा आढावा त्यांनी आज घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकांच्या विकास आणि प्रगतीला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्यामुळेच राज्याने युवा धोरण घोषित करावे यासाठी गेली दोन वर्षे राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी राज्यभर प्रचार व प्रसार केला. एवढेच नाही, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा धोरणाचा स्वतंत्र मसुदाही राज्य सरकारला सादर केला. त्यामुळे राज्याचे युवा धोरण अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात ते घोषित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
युवक राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त
दरम्यान, आज युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीसोबत प्रदेश कार्यकारिणीही बरखास्त करीत असल्याची घोषणा आमदार सामंत यांनी केली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच, पात्रतेच्या निकषावर नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत नव्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Follow
Us on
Twitter